अपरापतनानंतर म्हणजेच वार पडून गेल्यानंतर प्रसव प्रक्रिया पूर्ण होते, त्यानंतर त्या स्त्रीला सूतिका असे संबोधले जाते. पूर्वी योग्य प्रसव होण्यासाठी तसेच प्रसावानंतर बाळ व बाळंतिणीला राहण्यासाठी २-३ खोल्यांचे विशेष आगार म्हणजेच ‘सूतिकागार’ बांधण्यास सांगितले जात असे. हे सूतिकागार कसे असावे याचे विशेष विस्तृत वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितले आहे.

सूतिकागार निर्माण करताना दगड, वाळू, खापरे नसलेली, सपाट जमीन निवडावी. पूर्वी घराभोवतीची मोकळी जागा यासाठी वापरीत असावेत. तेथे पाणी चांगले असावे. वातावरण प्रसन्न असावे. कोणतीही दुर्गंधी येणार नाही याची दक्षता घ्यावी. सूतिकागार बांधण्यासाठी बेल, टेंटू, हिंगण, भल्लातक, वायवर्ण, खैर यांची लाकडे वापरावीत. सूतिकागाराचे दार पूर्वेस किंवा उत्तरेस असावे. ते शौचकूप, स्नानगृह, स्वयंपाकघर याने युक्त असावे. पिण्याच्या पाण्याची तसेच सांडपाण्याची योग्य सोय असावी. अग्निसंरक्षणाची तरतूद असावी. सूतिकागार सर्व ऋतुमध्ये सुखकर होईल असे असावे. तेथे सामान ठेवण्यासाठी कपाटे असावीत.

सूतिकागाराच्या भिंतीला गिलावा चांगला केलेला असावा. छत वरून स्वच्छ असावे. सूतिकागारातील प्रसवाची खोली आठ हात लांब व चार हात रुंद (१२’×६’) असावी. सूतिकेला निवांतपणा मिळावा तसेच स्वच्छता चांगली राखली जावी यासाठी ही खोली लहान सांगितली असावी. सूतिकागाराच्या भूमी सारवलेली असावी. खोलीमध्ये धुपादि योजना असावी. सूतिकागारात तूप, तेल, मध, सैंधव, पादेलोण, वावडिंग, देवदार, पिंपळी, पिंपळमुळ, गजपिंपळी, मदुकपर्णी, वेलदोडा, कळलावी, वेखंड, च्यवक, चित्रक, चिरफळ, हिंग, मोहोरी, लसूण, निवळी, जिरे, कळंब, भूर्जपत्र, हुलगे अशा औषधोपयोगी वस्तूंचा संग्रह असावा. दोन चांगले दगड, उखळ, मुसळ, तीक्ष्ण अशा सोन्याच्या किंवा चांदीच्या सुया, तीक्ष्ण पोलादी शस्त्रे असावीत. बाळ व बाळंतिणीसाठी २ चांगल्या शक्यतो बेलाच्या लाकडाच्या खाटा असाव्यात, आग पेटविण्यासाठी टेंटू किंवा हिंगण यांचे इंधन तयार ठेवावे.

पांढरी शुभ्र, स्वच्छ, मऊ वस्त्रे किंवा वस्त्राचे तुकडे,  पटबंधनासाठी वस्त्रे, स्वच्छ निवडलेला पिंजलेला कापूस, बळकट दोरा, वारा घालण्यासाठी पंखा, कळा देताना प्राणप्रबोधनासाठी हुंगण्यास देण्याकरिता कांदा, चुना, नवसागर, मध, सैंधव असावे.

प्रसूतीच्या वेळेस तेथे चार परिचारिका असाव्यात. त्या वयाने प्रौढ, अनुभवी, मुले झालेल्या, निरोगी, प्रेमळ स्वभावाच्या, चतुर, कर्तव्यदक्ष, स्वच्छ, प्रसवाच्या वेळी करावयाच्या कर्माचे ज्ञान असलेल्या असाव्यात. त्यांचे वागणे, बोलणे आश्वासन देणारे, जिव्हाळ्याचे असावे. त्यांचे कपडे नीटनेटके, स्वच्छ असावे, नखे काढलेली असावीत. परिचारिका स्वभावाने अतिशय शांत, सोशिक असावी कारण प्रसूती जवळ आलेली स्त्री अतिशय हळवी झालेली असते, तिचे मन व शरीर नाजूक स्थितीत असते. अशा वेळेस तिला धीर येईल चिंता वाटणार नाही असे वर्तन परिचरिकेचे असावे.

अशा प्रकारचे सुसज्ज सूतिकागार सूतिकेसाठी तयार करावे. नववा महिना लागताच गर्भिणीने सूतिकघरात प्रवेश करावा.

संदर्भ :

  • निर्मला राजवाडे, कौमारभृत्यतंत्र, सूतिकाविज्ञानीय, कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे, १९७४.
  • ब्रह्मानंद त्रिपाठी, चरकसंहिता, शारीरस्थान, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००२.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे