कोणत्याही रोगाची चिकित्सा करताना औषधांच्या निवडी इतकेच औषध घेण्याच्या वेळेला महत्त्व आहे. त्यालाच ‘औषध सेवन काल’ किंवा ‘भेषज काल’ असे संबोधले जाते. आयुर्वेदातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह, शारंगधर संहिता  या सर्वांमध्ये भेषज सेवन कालाचे वर्णन आले आहे.

चरक संहितेत म्हटल्याप्रमाणे एखाद्या रोगाची चिकित्सा करताना चिकित्सेचे यश हे अनुक्रमे देश, काल, प्रमाण, सात्म्य, असात्म्य, पथ्य, अपथ्य या सर्वांच्या योग्य प्रमाणावर अवलंबून असते. यामध्ये काल हा दुसऱ्याच क्रमांकावर असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे हे लक्षात येते.

काळ हा कार्याचा निमित्त कारण आहे. परिणामी योग्य काळात सेवन केलेले औषध उत्तम कार्य घडवून आणते. योग्य वेळी न मिळणारे अथवा योग्य वेळ उलटून गेल्यावर मिळणारे औषध उपयोग करण्यास योग्य नसते. औषधांचा विविध व्याधींमध्ये उपयोग करण्याचे निरनिराळे कालप्रकार सांगितले आहेत.

चरक, सुश्रुत, वाग्भट यांनी (अष्टांग हृदय ग्रंथामध्ये) १० औषध सेवन काल वर्णन केले आहेत; तर, शारंगधर संहितेमध्ये ५ औषध सेवन कालांचे वर्णन आढळते. अष्टांग संग्रहामध्ये ११ औषध सेवन काल सांगितले असून ते पुढीलप्रमाणे आहेत —

(१) जेवणाआधी : औषध सेवनानंतर लगेच भोजन घेतल्यास त्यास ‘प्रागभक्त’ म्हणतात. त्याची योजना अपान वायूचे विकार, शरीराच्या कमरेपासून खालच्या भागात बल उत्पन्न होण्यासाठी व तेथील व्याधींचे शमन करण्यासाठी तसेच स्थूलतेचा नाश करण्यासाठी केला जातो.

(२) जेवणामध्ये : भोजनामध्ये घेतल्या जाणाऱ्या औषधाला ‘मध्यभक्त’ असे म्हणतात. समान वायूची विकृती, कोष्ठागत व्याधी व पित्त व्याधी इत्यादींसाठी याची योजना करावी.

(३) जेवणानंतर : भोजनोत्तर सेवन केलेल्या औषधाला ‘अधोभक्त’ असे म्हणतात. याचे सेवन व्यान वायूच्या विकृतीमध्ये सकाळच्या जेवणानंतर, तर उदान वायूच्या विकृतीमध्ये रात्रीच्या जेवणानंतर करावे. याचा उपयोग हृदयाच्या वरील शरीर भागात बल उत्पन्न करण्यासाठी होतो. कफज व्याधींच्या शमनासाठी व लठ्ठ होण्यासाठी या काळाचा उपयोग करावा.

(४) अभक्त : काहीही सेवन न करता दिलेल्या औषधाला ‘अभक्त’ असे म्हणतात. बलवान रोगी आणि बलवान रोगासाठी सकाळच्या पहिल्या प्रहरानंतर हे देतात. अन्नाचा संसर्ग न आल्याने हे बलवान असते. कफ उत्कलेश होऊन (कफ मोकळा किंवा सुटा होणे) आमाशयातील सर्व स्त्रोतसे मोकळी झाली आहेत, अशा बलवान रुग्णालाच या बलवान औषधाची योजना करावी.

(५) जेवणाबरोबर : औषधाने अन्न सिद्ध करणे अथवा अन्न शिजल्यानंतर त्यात औषध मिसळून ते सेवन करणे यास ‘सभक्त’ असे म्हणतात. सुकुमार बालकांना, औषधांचा द्वेष तसेच सार्वदेहिक व्याधी असणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे औषध द्यावे.

(६) सामुद्ग : भोजनाच्या आधी आणि नंतर औषध देणे याला ‘सामुद्ग’ असे म्हणतात. हे औषध लघू व अल्प भोजनाच्या सुरुवातीला व शेवटी पचन, अवलेह, चूर्ण इत्यादी स्वरूपात उचकी, कंप, आक्षेप, शरीराच्या कमरेपासून वरील किंवा खालील किंवा दोन्ही भागांतील दोषांसाठी द्यावे.

(७) सग्रास : प्रत्येक घासात मिसळून औषध दिल्यास त्याला ‘सग्रास’ असे म्हणतात. चूर्ण, अवलेह, गुटी इत्यादी औषध सग्रास स्वरूपात अग्नी प्रदीप्त करण्यासाठी व वाजीकरणार्थ (शुक्र धातू तसेच कामेच्छा वाढवण्यासाठी) द्यावे. वाताच्या प्रकारांपैकी प्राणवायूच्या विकृतीमध्ये या स्वरूपात औषध द्यावे.

(८) ग्रासांतर : दोन घासांच्या दरम्यान घेतलेल्या औषधाला ‘ग्रासांतर’ असे म्हणतात. ग्रासांतर औषध हृदय रोगासाठी द्यावे. वमन आणि धूमपान उर्ध्व जतृगत (खांद्याच्या वरच्या भागातील) रोगांच्या शमनासाठी रात्री द्यावे.

(९) वारंवार : भोजन केल्यावर अथवा न करता जे औषध क्षण प्रतिक्षण असे सतत दिले जाते त्यास ‘मुहूर्मुहु’ असे म्हणतात. श्वास, कास, उचकी, तहान, उलटी आणि विषजन्य व्याधी इत्यादींमध्ये हा औषध प्रकार व्याधी शांत होईपर्यंत वापरावा.

(१०) दोन जेवणामध्ये : प्रथम घेतलेला आहार पचल्यानंतर दुपारी औषध घेणे व त्याचे पचन झाल्यावर पुन्हा संध्याकाळी भोजन करणे याला ‘अंतरभक्त’ औषध म्हणतात. संध्याकाळचे जेवण पचल्यानंतर औषध घेणे व ते औषध पचल्यावर दुसऱ्या दिवशी भोजन करणे अशाही प्रकारे हे औषध देता येते. त्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो. व्यान वायू प्राकृत होतो. याचा उपयोग दिप्ताग्नी अवस्थेत व्यान वायूच्या विकृतीत करावा.

(११) रात्री : उर्ध्व जतृगत विकारांमध्ये तसेच शिरोविकारात पोषण करण्यासाठी, पाचनासाठी, शमनासाठी रात्री झोपण्यापूर्वी औषध घ्यावे.

शारंगधर संहितेमध्ये औषध सेवनाचे ५ काल सांगितले असून ते पुढीलप्रमाणे आहेत —

(१) प्रथम काल : पित्त किंवा कफ दोषांची वृध्दी झाली असल्यास वमन अथवा विरेचन करण्यासाठी, दोषांना विशेषेकरून कफाला त्याच्या स्थानातून खेचून बाहेर काढण्यासाठी सकाळी ही औषधे द्यावीत.

(२) द्वितीय काल : अपान वायू विकृतीमध्ये भोजनापूर्वी औषध सेवन करावे. तसेच भोजनात अरुची असताना विविध रुचकर परंतु, पथ्यकारक पदार्थांत मिसळून औषध द्यावे. समान वायू विकृतीमध्ये मंदाग्नी असताना जेवणामध्ये औषधांचा वापर करावा. व्यान वायू विकृतीमध्ये जेवणानंतर औषध सेवन करावे. कंपवात, उचकी, आक्षेपक यांमध्ये भोजनानंतर औषध सेवन करावे.

(३) तृतीय काल : स्वरभंग, श्वास, कास, हिक्का इत्यादी उदान वायू विकृतीमध्ये संध्याकाळच्या जेवणात प्रत्येक घासाबरोबर औषध द्यावे. प्राणवायू विकृतीमध्ये संध्याकाळच्या भोजनानंतर औषध द्यावे.

(४) चतुर्थ काल : तहान, उलटी, उचकी, श्वास तसेच विष विकारात वारंवार अथवा जेवणात मिसळून औषध प्रयोग करावा.

(५) पंचम काल : खांद्याच्या वरच्या भागात असणाऱ्या डोळे, कान, नाक, तोंड, डोके ह्यांचे व्याधी असता त्यात पोषण, पाचन तथा शमन करण्यासाठी द्यावयाच्या औषधांचा प्रयोग रात्री करावा.

पहा : अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय, असात्म्य, कफदोष, चरक संहिता, पित्तदोष, वातदोष, शारंगधर संहिता, सात्म्य, सुश्रुत संहिता.

संदर्भ :

  • चरक, चरक संहिता, चिकित्सा स्थान, अध्याय ३०, वैद्यमित्र प्रकाशन, २०१३.
  • सुश्रुत, दृष्टार्थ सुश्रुतचिंतन, उत्तर तंत्र, गोदावरी पब्लिशर, २००८.
  • वाग्भट, अष्टांग हृदय, सूत्रस्थान, अध्याय १३, महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, १९८६.
  • वाग्भट, अष्टांग संग्रह, सूत्रस्थान, अध्याय १३, अनमोल प्रकाशन, १९८६.
  • शारंगधर, शारंगधर संहिता, पूर्वखंड अध्याय २, चौखंबा सुरभारती प्रकाशन, २०१३.
  • https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3764882/

समीक्षक : कौस्तुभ चौंडे