लिंबू वर्गातील एक वनस्पती. मोसंबे वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस लिमेटा आहे. तो मूळचा आशियातील असून भूमध्य समुद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आहे. त्याच्या फळांना सामान्यपणे मोसंबी म्हणतात.
स्वीट लाइम किंवा सिट्रस लिमेटा या जातीचा सदापर्णी वृक्ष सु. ८ मी. उंच, पसरट, गुळगुळीत आणि राखाडी फांद्यांचा असतो. त्याला १·५–७·५ सेंमी. लांबीचे अनेक काटे असतात. पाने संयुक्त असून पर्णिका लंबाग्र, ५–१७ सेंमी. लांब व २·८–८ सेंमी. रुंद असतात. पानांचे देठ अरुंद व लहान पंखयुक्त असतात. फुले पांढरी, २-३ सेंमी. व्यासाची व सुगंधी असतात. फुले फुलताच कळ्या गळून पडतात व फलधारणेस मदत होते. मृदुफळ गोलाकार, हिरवे व टेनिसच्या चेंडूएवढे असते. पिकल्यावर ते पिवळे पडते. फळ नारंगक प्रकारचे असून फळाची साल काहीशी जाड परंतु गराला चिकटलेली असते. गर घट्ट, पांढरा व प्रकारानुसार नारिंगी किंवा लालसर असून चवीला आंबटगोड असतो. फळात १०–१२ फोडी असून त्यात १८–२० बिया असतात. मोसंबे वृक्षाचा प्रसार बियांद्वारे होतो. तो उष्ण वातावरणात चांगला वाढतो. ५–७ वर्षांत त्याला फळे लागतात. १०–१२ वर्षांच्या वृक्षाला मोठ्या प्रमाणात फळे येतात.
मोसंब्याच्या फळात सर्वसाधारणपणे ३०–५०% रस असतो. रसात ७·७% शर्करा (ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज) आणि ०·३% आम्ल (सायट्रिक आम्ल व इतर काही कार्बनी आम्ले), ब-समूह जीवनसत्त्वे, क-जीवनसत्त्व आणि इतर काही पोषक पदार्थ असतात. मोसंबीचा रस उत्साहवर्धक असून लहान मुले व वृद्ध व्यक्ती यांसाठी फार उपयोगी असतो. या रसात इतर फळांपेक्षा आम्लता कमी असल्याने आजारी व्यक्तीला तो देण्यासाठी चांगला असतो. फळांच्या सालीपासून तेल काढून ते सुगंधी पदार्थांत किंवा अन्नपदार्थांत चव आणण्यासाठी वापरतात. फळांच्या कापांपासून तयार केलेली पूड मिठायांमध्ये वापरतात. मोसंबे तापात तहान भागविते, भूक वाढविते व सर्दी दूर करते. साल वातहारक असून फळाची ताजी साल चेहऱ्यावरील मुरमांच्या उपचारावर वापरतात.