स्प्रूस (पिसिया स्मिथियाना) : (१) वनस्पती, (२) शंकू.

अनावृत्तबीजी वनस्पतींपैकी पायनेसी कुलाच्या पिसिया प्रजातीतील सर्व वनस्पतींना ‘स्प्रूस’ म्हणतात. पिसिया प्रजातीत सु. ३५ जाती असून या सर्व वनस्पती सदाहरित आणि शंकुधारी आहेत. स्प्रूस वृक्षांचा प्रसार सामान्यपणे उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण आणि तैगा प्रदेशांत असून कॅनडा, उत्तर अमेरिका, मेक्सिको, यूरोप तसेच आशिया खंडातील अनेक देशांत ते आढळतात. भारतात पश्चिम हिमालय व वायव्य भागात स्प्रूस वृक्षाची पि. स्मिथियाना आणि सिक्कीम व पूर्व हिमालय भागात पि. स्पायनुलोजा अशा दोन जाती आढळतात; पश्चिम हिमालयातील पि. ॲबीस म्हणजेच ख्रिसमस ट्री आणि पि. सिचेन्सिस या स्प्रूसच्या जाती आयात केलेल्या आहेत.

स्प्रूसच्या सर्व जाती उंच व डौलदार असून त्यांचा आकार पिरॅमिडसारखा असतो. हे वृक्ष १८—६० मी. उंच वाढतात. क्वचितप्रसंगी सु. ९० मी. उंच असलेले स्प्रूस वृक्ष आढळले आहेत. खोडाचा घेर १—४.८ मी. असतो. खोडावर फांद्या मंडलात येत असून त्या आडव्या पसरलेल्या व काहीशा लोंबत्या असतात. साल मध्यम जाडीची असून तिचा रंग करडा असतो. ती जुनी झाल्यावर खवलेदार बनते. पाने लहान, सुईसारखी असून त्यांचा छेद चौकोनी असतो. पाने फांद्यांना सर्पिलाकार मांडणीत एकेकटी जुळलेली असतात. पाने सु. २ सेंमी. लांब असून त्यांचा रंग चंदेरी हिरवा किंवा निळसर हिरवा असतो. ती गळल्यानंतर त्यांचे कठीण खुंट मागे राहतात. त्यामुळे खोड खडबडीत दिसते.

स्प्रूसचे शंकू एकलिंगी, परंतु एकाच झाडावर येतात आणि नतकणिशाप्रमाणे लोंबते, अग्रस्थ किंवा कक्षस्थ असतात. पूं-शंकू पिवळे किंवा लाल असून झाडाच्या वरच्या भागात असतात. त्यावरची अनेक लघुबीजाणुपर्णे सर्पिल, टोकाला विस्तृत आणि शल्कयुक्त असतात. प्रत्येकावर दोन परागकोश असून त्यातील लघुपर्णे (पराग) सपक्ष असतात. स्त्री-शंकू हिरवट किंवा जांभळे, बृहत्बीजाणुपर्णे सर्पिल, खवल्यासारखी व त्यांच्या बगलेत प्रत्येकी दोन बृहत्पर्णे असतात. परागण वाऱ्यामार्फत होते. परागणानंतर फलन होऊन ते शंकू बिया धारण करतात. प्रत्येक बीजाला एक मोठा व पातळ पंख असतो. बी पडून गेल्यावर त्यांची शल्के काही काळ झाडावरच राहतात.

काष्ठ उत्पादनासाठी स्प्रूस वृक्ष महत्त्वाचा मानला जातो. स्प्रूसचे लाकूड बळकट, चिवट, नरम, हलके व टिकाऊ असते. लाकडी सामान, प्लायवुड तसेच खांब बनवण्यासाठी ते वापरतात. जहाज व घरे बांधणीत त्याचा वापर केला जातो. गिटार, मेंडोलिन, व्हायोलिन, पियानो, हार्प यांसारखी वाद्ये आणि काही तंतुवाद्ये तयार करण्यासाठीही ते वापरतात. झाडाच्या सालीपासून टर्पेंटाइन तेल काढतात. काही जातीतील बाष्पनशील तेल अत्तरे व सौंदर्यप्रसाधने यांत वापरतात. बियातील तेल व्हार्निशमध्ये घालतात. स्प्रूस वृक्षाची साल कातडी कमवायला आणि राळ औषधांमध्ये वापरतात. स्प्रूस वृक्षाचा सर्वांत जास्त वापर कागद तयार करण्यासाठी होतो. त्याच्या लाकडातले सेल्युलोजचे धागे लांब असल्याने त्यापासून बनविलेला कागद बळकट असतो. स्प्रूस वृक्षांच्या काही जाती हवामानाप्रमाणे निवडून थंड प्रदेशात किंवा रस्त्यांच्या दुतर्फा शोभेसाठी लावतात. कुंपण, निवारा व सोसाट्याचा वारा यांपासून संरक्षण मिळविण्याकरिता याची लागवड करतात. स्प्रूस वृक्षांचे कोवळे अंकूर जीवनसत्त्वाचे उत्तम स्रोत मानले जातात. लाल व काळा स्प्रूस यांची पाने व कोवळ्या शाखा बीअर तयार करण्यासाठी वापरता येतात. ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक यांनी नौकेवरील सहकाऱ्यांचा ‘स्कर्व्ही’ रोगापासून बचाव करण्यासाठी काळा स्प्रूस या वृक्षांपासून बीअर तयार केली होती. नाताळात ‘नाताळ-वृक्ष’ याकरिता स्प्रूस वृक्षाचा वापर केला जातो.

लेपिडोप्टेरा गणाच्या पतंग आणि फुलपाखरू यांच्या काही जाती स्प्रूसची पाने खातात. लहान सस्तन प्राणी उदा., उंदीर, व्होल इ. स्प्रूस वृक्षांच्या बिया तसेच कोवळी रोपे खातात. त्यामुळे या वृक्षांचे मोठे नुकसान होते. याउलट, अमेरिकेत आढळणाऱ्या विशिष्ट खारी स्प्रूस वृक्षाचे शंकू मोठ्या प्रमाणात तोडतात आणि बियांवरील कठीण कवच काढून टाकतात. अशा बियांपासून पुन्हा स्प्रूसचे वृक्ष वाढतात.