मोह हा वृक्ष सॅपोटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मधुका लाँगिफोलिया आहे. बकुळ व चिकू हे वृक्षदेखील सॅपोटेसी कुलातील आहेत. मोह वृक्ष मूळचा भारतातील आहे. निलगिरी पर्वतापासून हिमालयाच्या शिवालिक रांगांपर्यंतच्या पानझडी वनांत तो विपुल प्रमाणात आढळतो. काही ठिकाणी त्यांची ‘मोहराई’ म्हणजे मोहाच्या वृक्षांची बाग केलेली आढळते. त्याची वाढ सर्व प्रकारच्या जमिनीत होते. तो रुक्ष पर्यावरणातही वाढतो. भारतात छत्तीसगढ, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा या राज्यांच्या सदाहरित वनांमध्ये मोह आढळतो.
मोह वृक्ष सु. २० मी. उंच वाढतो. त्याचा पर्णसंभार दाट, डेरेदार व सावली देणारा असतो. खोडाची साल खडबडीत, तपकिरी व भेगाळलेली असते. त्याखाली लाल रंगाची साल असून त्यातून दुधी चीक स्रवतो. पाने साधी, १५–२५ सेंमी. लांब, ८–१५ सेंमी. रुंद, भाल्यासारखी व जाड असून खालचा भाग लवदार असतो. फुले फांद्यांच्या टोकांना गुच्छांमध्ये येतात. ती लहान, पिवळसर-पांढरी, सु. २ सेंमी. लांब व सुगंधी असतात. फुलांचा दलपुंज संयुक्त व जाडसर असून तो गळून पडतो. मृदुफळे सु. ५ सेंमी. लांब, लंबगोल, पिवळी व कोवळेपणी लवदार असतात. ती गळून पडतात. प्रत्येक फळात चार टोकदार व चमकदार बिया असतात. बियांपासून या वृक्षाची लागवड करतात.
मोहाच्या फुलांमध्ये फ्रुक्टोज ही शर्करा जास्त असल्यामुळे ती गोड असतात. ती खाण्यासाठी वनात पक्ष्यांची व प्राण्यांची झुंबड उडते. फुलांपासून मद्य बनवितात. एक टन फुलांपासून सु. ४०० मिलि. मद्य बनते. मोहाची फुले खातात व पिठात मिसळून भाकरी करतात. फळांच्या साली कच्च्या किंवा शिजवून खातात. बियांपासून मिळणारे तेल दिव्यामध्ये तसेच खाद्यपदार्थांत वापरतात. या तेलात पामिटिक आम्ल (२४%), स्टिअरिक आम्ल (२२%), ओलेइक आम्ल (३७%) आणि लिनोलीइक आम्ल (१४%) इ. घटक असतात. वनस्पती तूप व साबण बनविण्यासाठीही ते उपयोगी आहे. मोहाच्या बियांचे तेल महुआ बटर, मोव्रा फॅट, इल्लिपे बटर, बासिया फॅट इत्यादी नावांनी प्रसिद्ध आहे. पेंडीचा वापर खतासाठी होतो. खोडाचे लाकूड कठीण व मजबूत असते. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून जॅम तयार करतात.
.