समुद्रकिनारा व खोल सागरी तळ यांच्या दरम्यान असलेल्या भूप्रदेशांना एकत्रितपणे खंडीय सीमाक्षेत्र म्हणतात. यामध्ये सामान्यपणे खंड-फळी (भूखंड मंच किंवा सागरमग्न खंडभूमी), खंडान्त उतारखंडीय उंचवटा यांचा अंतर्भाव होतो. अशा प्रकारे खंडीय भूकवचाचे पाण्यात बुडालेले भाग खंडीय सीमाक्षेत्रात येतात. एकूण सागरी क्षेत्राच्या सुमारे २८ टक्के क्षेत्र खंडीय सीमाक्षेत्राने व्यापले आहे. सर्व खंडीय राशींना कोणते तरी सीमाक्षेत्र असते; परंतु आकार, आकारमान व भूविज्ञान यांबाबतीत त्यांच्यात खूप विविधता असून या बाबी त्यांच्या भूसांरचनिक जडणघडणीवर (मांडणीवर) अवलंबून असतात. वेगवेगळ्या खंडीय सीमाक्षेत्रांच्या स्वरूपावर वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होतो. त्यांपैकी भूसांरचनिक, समुद्रातील पाण्याच्या पातळीतील बदल, नद्यांचा आकार, त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे प्रमाण, त्या भागातील सागरी लाटांची तीव्रता आणि तेथील सागरी प्रवाह हे प्रमुख घटक आहेत.

भूसांरचनिक दृष्ट्या खंडीय सीमाक्षेत्राचे क्रियाशील, अक्रियाशील व रूपांतरित खंडीय सीमाक्षेत्र असे तीन प्रकार पडतात. वेगवेगळ्या सागरी भागातील खंडीय सीमाक्षेत्रांतील भूमिस्वरूपांच्या वैशिष्ट्यांमध्ये भिन्नता आढळते. उत्तर अमेरिकेच्या खंडीय भूराशीचे अटलांटिक महासागराकडील सीमाक्षेत्र विस्तृत वा रुंद, मंद उतार असलेला खंडान्त उतार आणि भूवैज्ञानिक दृष्टीने सापेक्षत: कमी गुंतागुंतीचे आहे. म्हणजे त्यात किनारपट्टी मैदान ते सागरी द्रोणीकडे मंदपणे उतरत जाणारे उथळ सागरी स्तर असे जाड क्रमवार स्तर आहेत. तेथील लगतच्या भूप्रदेशावर सामान्यपणे रुंद किनारी मैदाने असून त्यांचा विस्तार समुद्रातील पाण्याच्या पातळीवर अवलंबून असतो. याउलट अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची पॅसिफिक महासागराकडील बाजू आणि एकूणच पॅसिफिक महासागराची संपूर्ण कड येथील खंडीय सीमाक्षेत्र अरुंद, खडबडीत (ओबडधोबड), तीव्र उताराचे खंडान्त उतार व भूवैज्ञानिक दृष्टीने गुंतागुंतीचे आहे. तेथील तीव्र उताराचे खंडान्त उतार सरळ खोल सागरी खंदकात विलीन झालेले दिसतात. अनेक खंडीय सीमाक्षेत्रांच्या पार्श्वभागी पर्वतरांगा पाहायला मिळतात. त्यांतील काही पर्वतरांगा व शिखरे बेटांच्या स्वरूपात दिसतात. विस्तृतपणे पसरलेल्या खंडीय सीमाक्षेत्रांच्या प्रकारांचे झालेले वाटप भूपट्ट सांरचनिक जडणघडणीद्वारे नियंत्रित होते. या मांडणीच्या प्रक्रियेत भूराशी अंतर्भूत असतात. ऑस्ट्रेलियासारख्या काही प्रमुख भूराशींभोवतीची सीमाक्षेत्रे विस्तृत आहेत; परंतु उत्तर व दक्षिण अमेरिका यांसारख्या बहुतेक भूराशींत दोन्ही प्रकारची सीमाक्षेत्रे काही प्रमाणात असतात.

खंडीय सीमाक्षेत्र हा जगातील महासागरांमधील सर्वांत उथळ भाग असून त्यावर समुद्रपातळीतील बदलांचा परिणाम होतो. खंडीय सीमाक्षेत्रांविषयीचा कोणताही ऊहापोह करताना गेल्या काही दशलक्ष वर्षांमधील जागतिक समुद्रपातळीचा इतिहास सर्वसाधारणपणे समजून घ्यावा लागतो; कारण समुद्रपातळीत अनेकदा बदल घडून आले आहेत. वैश्विक हवामान बदल, त्यांतील चढउतार, त्यांमुळे हिमनद्यांचा झालेला क्षय किंवा वृद्धी, पर्वतनिर्माणकारी हालचाली आणि समस्थायी बदल यांमुळे समुद्रपातळीत बदल झाल्याचे मानले जाते. केवळ २० लक्ष वर्षांपूर्वी हिमनद्यांचा मोठा विस्तार झाला होता. तेव्हा समुद्रपातळी १०० मी. पेक्षा अधिक खाली गेली होती. या काळातील हिमनद्यांच्या चक्रीय वृद्धी व क्षय यांच्यामुळे अनेक वेळा समुद्रकिनारा त्याच्या सध्याच्या स्थानापासून सध्याच्या खंड-फळीच्या कडेपर्यंत सरकला होता. समुद्रपातळीतील या बदलांचा संपूर्ण खंडीय सीमाक्षेत्रावर, विशेषत: खंड-फळी व खंडान्त उतार यांच्यावर गंभीर परिणाम झाला होता. हिमनद्यांच्या विस्ताराच्या काळात समुद्रकिनारा खंड-फळीच्या कडेशी होता. यामुळे नदीतून वाहणारा अवसाद (गाळ) मोठ्या प्रमाणात खंडान्त उतारापलीकडे वाहत जाऊन तेथे साचत गेला. अवसाद साचण्यासाठी जागा नसल्याने त्रिभुज प्रदेशांची वाढ कमी प्रमाणात झाली. समुद्रपातळी उच्च राहण्याच्या आतासारख्या काळात थोडाच अवसाद खंड-फळी ओलांडून पुढे गेला. नदीतील अवसाद मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रवाही त्रिभुज प्रदेशात साचत गेला.

आर्थिक दृष्ट्या खंडीय सीमाक्षेत्रे विशेष महत्त्वाची आहेत. जगातील बहुतांश मत्स्यक्षेत्रे खंडीय सीमाक्षेत्रांवर आढळतात. विविध प्रकारच्या खनिज पदार्थांचे उत्पादन या क्षेत्रांतून मिळते. बहुतेक खंडीय क्षेत्रे स्तरित खडकांची बनलेली असून त्यांत सामान्यपणे खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. येथून वाळू व रेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जगातील सर्व प्रकारच्या अपशिष्टांच्या विल्हेवाटीची हीच प्रमुख क्षेत्रे बनली आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.