ताकवले, राम गोविंदराव (Takwale, Ram Govindarav) : ( ११ एप्रिल १९३३ ). भारतीय शिक्षणतज्ज्ञ. ताकवले यांचा जन्म मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात भोर तालुक्यातील अंबाडे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. शालेय स्तरापासून व राष्ट्रसेवा दल, समाजवादी विचारसरणी आणि नई तालीमची तत्त्वे स्वीकारल्यामुळे स्वत:च्या विकासाबरोबरच समाजाचाही विकास ही संकल्पना कुमारवयातच त्यांच्यामध्ये रुजली. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केले; तर भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुणे विद्यापीठात (सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) घेतले. त्यानंतर त्यांनी संशोधन पदवी मास्को स्टेट विद्यापीठामधून प्राप्त केली. विद्यार्थी दशेच त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते सर्व शिक्षकांना आवडायचे.
पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. या विभागात शिक्षण आणि संशोधन या दोन्ही गोष्टींना महत्त्वाचे स्थान होते. भविष्यवेधाला प्राधान्य देत अद्ययावत ज्ञानशाखांचा, सिद्धांतांचा, तंत्रांचा, उपकरणांचा, प्रयोगांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यावर ताकवाले यांनी भर दिला. काही विद्यार्थ्यांना प्रगत देशांतील विद्यापीठात पाठवून जागतिक दर्जाचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन कसे चालते यांबाबतचा अनुभव घेण्याची संधी प्राप्त करून दिली. १९७५-७६ मध्ये त्यांनी शैक्षणिक मूल्यमापनात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी भौतिकशास्त्र विभागात प्रश्नपेढीचा समावेश केला. या प्रश्नपेढीतील प्रश्नांची उत्तरे कोणत्याही क्रमिक किंवा संदर्भ पुस्तकात मिळणार नाहीत, अशी रचना त्यांनी केलेली होती. प्रश्नपेढीतील प्रश्नसंख्या प्रचंड होती. विद्यार्थी ज्ञानार्जनाकडे वळण्यासाठी, शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी व्हावे यांसाठी विद्यार्थ्यांचा शिकण्यावर भर अपेक्षित होता.
ताकवले हे १९७८ मध्ये पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्त झाले. ते भारतातील सर्वांत तरुण कुलगुरू होते. कुलगुरू पद स्वीकारल्यानंतरही त्यांनी आपले अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हे कार्य चालूच ठेवले. १९७८ मध्ये पुणे विद्यापीठात इतर प्राध्यापकांच्या मदतीने अद्ययावत संगणक कार्यान्वित करून समाजासाठी तो उपलब्ध करून दिला. या संगणक केंद्रातून देशातील आणि परदेशातील अनेक खासगी व शासकीय उद्योग, शिक्षण, संशोधन आणि सेवा क्षेत्रातील संस्थांना संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षम नेतृत्व देणारी पिढी निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. १९८०-८१ मध्ये त्यांनी शैक्षणिक शाखांतील अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आणि समाजांच्या गरजांनुसार अत्याधुनिक ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम विकसन, प्रयोग साहित्य निर्मिती व जुळवाजुळव, अध्यापन, मूल्यमापन इत्यादींबाबत स्वातंत्र्य दिले. त्यातूनच त्यांनी टॉप-टू-बॉटम कडून बॉटम-टू-टॉप हा अप्रोच स्वीकारला. यातूनच ज्ञानप्राप्तीचा संबंध उद्योगाशी आणि उत्पादन कामाशी लावण्याची संकल्पना उदयास आली. पदार्थविज्ञान विभागात संगणक प्रक्रिया, चलचित्रे, छायाचित्रकारिता, व्हॅक्युम टेक्नॉलॉजी इत्यादी उपयोजित ऐच्छिक विषयांचा समावेश केला. समाज, उद्योग, उत्पादन आणि सेवाक्षेत्र परस्पराभिमुख होण्यासाठी कालबद्ध व धोरणात्मक आराखडा महाविद्यालयांसमोर ठेवला.
समाजविकासकेंद्री शिक्षणप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी त्यांनी मुक्त शिक्षणप्रणालीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या प्रयत्नातून १९८९ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मुक्त विद्यापीठातही त्यांनी कृषी क्षेत्राला मार्गदर्शन करण्यासाठी प्रयोग परिवार ही संकल्पना रुजवली. नाशिक जिल्हा हा द्राक्ष पंढरी आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्राक्ष पिकावर पडणाऱ्या रोगांचे अचूक रोगनिदान पुणे येथील सी-डॅकच्या संगणकामधील एक्सपर्ट सिस्टिमचा (प्राविण्य संरचनेचा) वापर करून करता येणे शक्य आहे, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी द्राक्ष परिवाराचे प्रणेते प्रा. दाभोळकरांना सोबत घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे प्रयोगसिद्ध ज्ञान-विज्ञान जनसामान्यांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविले. कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून फलदायी काम व दोन्हींच्या संयोगातून बौद्धिक, आर्थिक, सामाजिक विकास हे मूल्य समाजात रुजविले. देशातील दारिद्र, उपासमार, बेरोजगारी अशा समस्यांना उत्तर शोधण्याचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठानंतर १९९६ ते १९९८ या काळात त्यांच्याकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तेथेही त्यांनी प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन समाजाभिमुख शिक्षणक्रम कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन केले.
ताकवले यांनी १९९८ मध्ये सेवानिवृत्तीनंतर संगणकाबाबतचे अधिक ज्ञान प्राप्त करण्यास सुरुवात केली. माहिती–तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक परिवर्तन घडविण्यासाठी, एका नव्या समाजविकासकेंद्री शिक्षण पद्धतीची संरचना करण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आली, त्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्यातूनच ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची’ (MKCL) निर्मिती झाली. माहिती तंत्रज्ञानातून निर्माण झालेली डिजिटल व्हर्च्युअल आणि जागतिक ज्ञानमार्गाची निर्मिती केली. ग्रामीण भागातील युवकांच्या विकासाचा व उन्नतीचा महामार्ग महाराष्ट्र ज्ञान महामंडळाद्वारे समाजाला उपलब्ध करून दिला. या महामंडळाची कार्यप्रणाली ठरविताना त्यांनी शासकीय क्षेत्राची लोकभिमुखता, विश्वसनियता व पारदर्शकता, खासगी क्षेत्राची उद्यमशीलता, सर्जनशीलता, गतिमानता व आर्थिक स्वयंपूर्णता, सामाजिक क्षेत्राची परिवर्तनशीलता, मूल्यनिष्ठा व सर्वसमावेशक अशा विविध शाखांच्या विकासाचा संगम घातलेला दिसून येतो. त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून उभ्या राहिलेल्या एमकेसीएल या संस्थेचा विस्तार आज भारतात व परदेशात झालेला आहे.
ताकवले यांनी महाराष्ट्र ऑलंपियाड अभियान, प्रयोग परिवार केंद्र, लर्निंग होम्स, मुक्त शिक्षणस्रोत निर्मिती, शिक्षकांसाठी बॅचरल ऑफ ई-एज्युकेशन असे प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध प्रकारच्या साहित्याचे लेखन केले आहे. रचनावादी शिक्षणप्रणाली, गटशिक्षण आणि परिस्थितीय अध्ययन प्रणालीचा (सिच्युएटेड लर्निंग सिस्टीम) त्यांनी स्वीकार केला. डॉ. जे. सी. कुमारप्पांनी शोधलेली ‘चिरस्थायी अर्थव्यवस्था संकल्पना’; महात्मा गांधींची ‘नई तालीम’; रवींद्रनाथ टागोरांची ‘सर्जनशीलता’ व उत्पादक कामाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे; शिक्षणातल्या परिवर्तनासाठी जयप्रकाश नारायण यांची ‘रचनात्मक संघर्षाची रणनीती’; ‘सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार करणारे महात्मा फुले’; प्रा. श्री. अ. दाभोळकर यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केलेले प्रयोग; डॉ. जे. पी. नाईक यांची ‘प्रौढ सक्षमतेची, प्रौढ शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची संकल्पना’; कर्मवीर भाऊराव पाटील यांची ‘कमवा व शिका, या तत्त्वावर आधारलेली स्वावलंबी, स्वयंस्फूर्त शिक्षणप्रणाली; डॉ. महम्मद युनुस यांची ‘बचतगट चळवळ, स्वावलंबन, सहकार आणि स्वयंसंघटनातून दारिद्र्य निर्मूलन’ अशा भारतीय तत्त्वज्ञांनी मांडलेल्या विविध तत्त्वांचा विचार अंगीकारून शिक्षणाचा नवा आकृतीबंध ताकवले यांनी विकसित केला.
ताकवले यांना मुक्त व दूर शिक्षणात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग’ हा पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. य. च. म. मुक्त विद्यापीठानेही त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविलेले आहे.
समीक्षक : ह. ना. जगताप