महाजन, छाया : ( १२ एप्रिल १९४९ ). मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र, बालसाहित्य, प्रौढशिक्षणपर साहित्य, भाषांतरे, संशोधनपर लेखन केले आहे. त्यांची आतापर्यंत एकूण ३६ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील काळेगाव होय. त्यांचे माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथे झाले. प्रथम विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन त्यांनी एक वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतले. मराठवाडा विद्यापीठात  बी. ए., एम. ए., डी. एच. ई ची पदवी घेतली. ‘पॉल स्कॉटच्या कादंबरीतील स्त्री व्यक्तीमत्त्व’ या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली.

१९९० साली डॉ.सौ.इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात इंग्रजी भाषासाहित्याच्या प्राध्यापक, पुढे प्रपाठक, इंग्रजी विभागप्रमुख, प्राचार्यपदी म्हणून त्या कार्यरत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पदव्युत्तर विभागात प्रपाठक आणि पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून काम त्यांनी पाहिले. २००० पासून औरंगाबाद खंडपीठाच्या लोकन्यायालयामध्ये पॅनल ऑफ जजेसमध्ये जज म्हणून, २००८ पासून बनारस विश्वहिंदू विद्यापीठ वाराणसी येथे (मेंबर ऑफ लॉर्डस) विधिसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

छाया महाजन यांचे प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे : कथासंग्रहमुलखावेगळा (१९८५) , यशोदा (१९९१),  नकळत (१९९२), ओढ (१९९७), एकादश कथा (२०००), राहिलो उपकाराइतुका (२०१३), अज्ञात (२०००);  ललितगद्यसंग्रह – मोरबांगडी (१९९३), पाण्यावरचे दिवे (२०११), दशदिशा (२०१५), गगन जीवन तेजोमय (२०१८), कोलावरी डी (२०१९); कादंबरीकॉलेज (२००६), मानसी (२००८,२०१५), तन अंधारे (२००९), होरपळ (२०१५); बालसाहित्य – इवलेसे रोप (१९८३), भोवरा (१९८९), रक्ताचा रंग एक (१९९४), फुलाच्या गोष्टी (१९९५) ; संकीर्ण – राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील (२००८) यांचे चरित्र,  मुलांचे प्रेमचंद (लेखक – मुंशी प्रेमचंद -तीन भाग -१९९६), निळ्या डोळ्यांचा माणूस (फ्रेंच लेखक – गि. द. मोपासा-१९९७), हरझॉग ( लेखक – सॉल बेलो-२०००), डिफेमेशन ॲण्ड डिस्पोलिएशन ऑफ इंडिया (लेखक – धर्मपाल- २०१३), रविंद्रनाथ टागोर यांच्या नाटिका (२०१५-१६), आजीची वाणी- स्वच्छ जंगलातील कहाणी चार पुस्तकांचा संच (२०१७), स्मारक शिळा (मल्याळम लेखक- पुनत्तील कुन्हअब्दुला-२०१९), विमेन इन पॉल स्कॉट्स नॉव्हेल्स (१९९७), इन्सपायरिंग जर्नी (श्रीमती प्रतिभा देवसिंह पाटील-२०१०), इ. अनुवाद साहित्य तसेच त्यांच्या कथा हिंदीतही अनुवादित आहेत.

छाया महाजन यांच्‍या कथा-कादंबरी मधून येणारी स्त्री ही विविध प्रश्न, समस्या घेऊन येताना दिसते. त्यांच्या लेखनाचे विषय विविध आहेत. त्यांनी माणसाच्या वृत्तीप्रवृत्ती, सामाजिक स्थित्यंतर, भवताल, पर्यावरणाच्या विचारातून लेखन केले आहे. साहित्य वास्तववादी आहे. त्यांच्या साहित्याची भाषा मार्मिक, चित्रमय आहे व व्यक्तिचित्रणे सजीव आहेत. छोटी वाक्य, काव्यमय शैली, नेमक्या शब्दात व्यक्त होणारा आशय आणि भावसंबंधांचे तरल चित्रण ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.

छाया महाजन यांच्या नकळत  या लघुत्तम कथासंग्रहात मानवी मनाच्या गुंतागुंतीचा मागोवा अतिशय सूक्ष्मपणे घेतला आहे. काव्य आणि गद्यावरच्या सीमेवरचा हा वाङ्मयप्रकार आहे. मुलखावेगळा, यशोदा, एकादश कथा, ओढ इ. कथासंग्रहातील कथांमधून जीवनाचा गांभीर्याने केलेला विचार जाणवतो. कॉलेज  ही कादंबरी सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख मांडणारी आहे. यामध्ये शिक्षणक्षेत्रातील राजकारण मांडलेले आहे. होरपळ  ही घटस्फोटासारख्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारी सामाजिक कादंबरी आहे. फौजदारी गुन्हा ४९८ अ या कायद्याच्या गैरवापरामुळे एका हुशार तरूणाची व चांगल्या प्रतिष्ठित सदवर्तनी कुटूंबाची झालेली होरपळ चित्रित केलेली आहे.

छाया महाजन यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या नकळत  या लघुत्तम कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, कॉलेज  या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाचा वि.स.खांडेकर पुरस्कार, मानसी  या कादंबरीसाठी अंकुर वाङ्मय पुरस्कार, मराठी वाङ्मयासाठीचा स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर हा पुरस्कार, तसेच सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी मराठवाडा गौरव पुरस्कार आणि साहित्य क्षेत्रातल्या कार्यासाठी मराठवाडा भूषण पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

जालना येथे २०१५ मध्ये झालेल्या सहाव्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. तसेच साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबईच्या रायटरज् मीटमध्ये सहभाग व लिटररी डिक्शनरीच्या संपादनाचे कार्य त्यांनी केले आहे. तसेच साहित्यविषयक, सामाजिक, स्त्रीविषयक, शैक्षणिक परिषदा, विविध साहित्य संमेलने, सामाजिक परिसंवाद व चर्चा यात सक्रिय सहभाग आणि अध्यक्षपदेही भूषविलेली आहेत.

संदर्भ :

  • महाजन, छाया, गगन जीवन तेजोमय, विश्वकर्मा प्रकाशन, २०००.