संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या एक्सॉप्टेरिगोटा उपवर्गातील फॅस्मॅटोडी गणाच्या फॅस्मॅटिडी कुलामध्ये यष्टी कीटकांचा समावेश केला जातो. वनस्पतींची पाने किंवा काटक्या यासारखे त्यांचे रूप मिळतेजुळते असल्यामुळे त्यांना यष्टी कीटक म्हटले जात असावे. जगात उष्ण प्रदेशांमध्ये सर्वत्र त्यांचा आढळ आहे. समशीतोष्ण प्रदेशात विशेषेकरून अधिक उबदार भागांतही ते आढळतात. मात्र उष्ण प्रदेशात त्यांचे वैविध्य अधिक दिसून येते. आग्नेय आशिया, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी त्यांचे विविध प्रकार आढळतात

यष्टी कीटक (कॅरॉसियस मोरॉसस)

यष्टी कीटक १·५ सेंमी.पासून ३० सेंमी. किंवा अधिकही लांबीचे असतात. उत्तर अमेरिकेत आढळणारी टायमेमा क्रिस्टिनी  ही जाती सु. ३२·८ सेंमी. लांब असते. भारतात आढळणारी कॅरॉसियस मोरॉसस ही जाती ८–१० सेंमी. लांब असते. मात्र तिच्या शरीराची रुंदी खूप कमी म्हणजे एखाद्या काडीसारखी असते.

यष्टी कीटकांच्या शरीराचे शीर्ष, वक्ष आणि उदर असे भाग असतात. मात्र वक्ष आणि उदर यांवरची वलये इतर कीटकांच्या तुलनेत अधिक लांब असतात. शीर्षावर स्पृशा, डोळे व मुखांगे असतात. त्यांच्या शरीराचा रंग हिरवा, तपकिरी किंवा पिवळसर असतो. यष्टी कीटकांत मादी नरापेक्षा लहान असते. आकाराच्या आकडेवारीनुसार हे कीटक जगात सर्वांत मोठे मानले जातात. जगातील काही हौशी मंडळी या कीटकांचे पालनही करतात. सन २००८ मध्ये उष्ण प्रदेशातील घनदाट वनांतील पानाफांद्यांच्या आच्छादनात मिळालेला ‘चान’ची मोठी काठी फोबीटिकस चानी ही यष्टी कीटकाची जाती जगातील सर्वांत मोठी सु. ५५ सेंमी. पेक्षा लांब असून ती ‘वॉकिंग स्टिक’ म्हणून ओळखली जाते.

यष्टी कीटक वनस्पतींची पाने कुरतडून खातात. त्यांच्या अनियमित रूपामुळे मायावरणाच्या आधारे ते परिसराशी समरूप होऊन जातात. त्यामुळे त्यांचे नैसर्गिक शत्रूंपासून संरक्षण होत असते. यष्टी कीटकांच्या काही जाती रंग बदलू शकतात. काही जातींमध्ये नरांना वक्षभागावर पंख असतात. काही जातींचे शरीर काटेरी असते. काही जाती स्वत:चे पाय तोडून घेतात आणि त्यानंतर त्यांना पुनर्निमाण पद्धतीने नवीन पाय प्राप्त होऊ शकतात. कॅरॉसियस मोरॉसस या जातीच्या काही कीटकाच्या शरीरात नर व मादी अशी दोन्ही प्रजनन इंद्रिये असून त्यांच्या बाह्यलक्षणात अर्धा भाग नराचा आणि अर्धा भाग मादीचा दिसून येतो. ही एका प्रकारची उभयलिंगता असून याला स्त्री-पुंरूषी उभयलिंगता म्हणजेच पुंजायरूपता म्हणतात. असा आविष्कार काही फुलपाखरे, पक्षी, शेवंडे व खेकडे यांच्यातही परिस्थितीनुसार दिसून येतो.

यष्टी कीटकांच्या नरांना आकर्षित करण्यासाठी त्यांची मादी कामगंध स्रवते. मादीचा सहवास मिळविण्यासाठी नरांमध्ये जोरदार स्पर्धा होत असते. एका प्रसंगात, त्यांच्यातील मीलन ८७ तास चालल्याची नोंद आहे. मादी सु. १५० तपकिरी रंगाची अंडी मातीत घालते. ही अंडी परिसरातील वृक्षांच्या बियांसारखी वाटतात. यष्टी कीटकांचे जीवनचक्र अर्धरूपांतरण पद्धतीने पूर्ण होते. अंड्यांतून बाहेर पडणारी पिले प्रौढांसारखीच असतात, परंतु ती आकाराने लहान असून त्यांना पंख नसतात. त्यांच्या शरीरात प्रजनन इंद्रिये तयार झालेली नसतात. कात टाकत त्यांची वाढ होत जाते. साधारपणे नऊ वेळा कात टाकून त्यांचे प्रजननक्षम प्रौढामध्ये रूपांतर होते. काही यष्टी कीटकांमध्ये अनिषेकजनन होते. त्यांच्यामध्ये फक्त माद्यांनाच जन्म दिला जातो. यष्टी कीटकांमध्ये मायावरण, बचावात्मक नक्कल करण्याची कला आणि लढाऊ वृत्ती अशी वर्तनवैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा