जगात सर्वत्र मसाल्यांमध्ये वापरला जाणारा एक पदार्थ. मिरची ही वनस्पती सोलॅनेसी कुलाच्या कॅप्सिकम प्रजातीतील आहे. बटाटा व टोमॅटो या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. मिरची ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून तिची लागवड भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ईजिप्त, स्पेन, चीन, जपान, व्हिएटनाम, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया व पाकिस्तान या देशांमध्ये केली जाते. भारतात मिरची सर्वत्र लागवडीखाली आहे. मिरचीचे उत्पादन, सेवन आणि निर्यात या बाबतींत भारत अग्रसेर असून आंध्र प्रदेशात तिचे सर्वाधिक म्हणजे सु. ७५% उत्पादन घेतले जाते.

(१) मिरचीचे झुडूप; (२) लाल मिरची (कॅप्सिकम ॲन्यूम प्रकार ॲक्युमिनॅटम): पाने व फळांसह क्षुप; (३) भोपळी मिरची (कॅप्सिकम ॲन्यूम प्रकार ग्रोसम) पाने व फळांसह फांदी; (४) लवंगी मिरची (कॅप्सिकम फ्रुटेसेंस): पाने व फळांसह फांदी

कॅप्सिकम प्रजातीच्या वर्गीकरणासंबंधी वनस्पतिवैज्ञानिकांमध्ये मतभेद आहेत. कॅप्सिकम प्रजातीत २०–२७ जाती आहेत. त्यांपैकी पुढील पाच जातींची लागवड मोठ्या प्रमाणात होते : कॅप्सिकम ॲन्यूम, कॅप्सिकम बकॅटम, कॅप्सिकम चायनीज, कॅप्सिकम फ्रुटेसेंस आणि कॅप्सिकम पुबेसेंस. कॅप्सिकम प्रजातीच्या फळांमध्ये रंग, आकार आणि आकारमान या बाबतींत विविधता असल्यामुळे वर्गीकरणासंबंधी मतभेद असावेत. भारतात कॅप्सिकम ॲन्यूम जातीचा ॲक्युमिनॅटम हा प्रकार मुख्यत: लागवडीखाली असून तिला सामान्यपणे लाल मिरची किंवा वाळकी मिरची म्हटले जाते. पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी हा प्रकार भारतात आणला आहे. कॅप्सिकम ॲन्यूम जातीच्या ग्रोसम प्रकारच्या फळांना भोपळी मिरची आणि कॅप्सिकम फ्रुटेसेंस या जातीला लवंगी मिरची म्हणतात.

लाल मिरची : हे क्षुप ७५ सेंमी. ते २ मी. उंच वाढते. पाने साधी, एकाआड एक, गुळगुळीत, अंडाकृती आणि टोकाला निमुळती असून पालवी दाट असते. फुले पानांच्या बगलेत व एकेकटी येतात. फुलांचा देठ लहान असून टोकाकडे मोठा होत जातो. दलपुंजाचा म्हणजे पाकळ्यांचा रंग फिकट पांढरा असतो. निदलपुंजाने फळांचा तळ वेढलेला असतो. मिरचीचे फळ मृदुफळ असून ते लांब, टोकाकडे निमुळते व किंचित वाकडे असते. फळ सुरुवातीला हिरवे असून पिकल्यावर ते लाल, शेंदरी किंवा फिकट पिवळे दिसते. फळातील गर पातळ आणि तिखट असतो. फळांचा वापर स्वयंपाकात मसाल्यासाठी करतात.

सामान्य लागवडीतील लाल मिरचीच्या हिरव्या व पिकवून वाळविलेल्या १०० ग्रॅ. फळात अनुक्रमे पुढीलप्रमाणे घटक असतात (कंसातील आकडे ग्रॅममध्ये): पाणी (८२·६ व १०·००), प्रथिने (२·९ व १५·९), मेद (०·६ व ६·२), कर्बोदके (६·१ व ३१·६), तंतू (६·८ व ३०·२) व क्षार (१·०० व ६·२) इत्यादी. यांखेरीज मिरचीत -जीवनसत्त्व विशेष प्रमाणात आणि -जीवनसत्त्व अत्यल्प असते. जीवनसत्त्वांचे प्रमाण हिरव्या मिरचीत जास्त असते. मिरचीतील कॅप्सिसीन (०·१%) नावाच्या संयुगामुळे मिरची चवीला तिखट लागते आणि त्याचे प्रमाण फळाच्या सालीच्या आतील थरात सर्वाधिक असून ते अत्यंत तीव्र संयुग आहे. मिरचीच्या अतिवापरामुळे आतड्यातील पेशींच्या शोषण क्रियेवर वाईट परिणाम होतो; त्यामुळे रक्तदाब, व्रण इ. विकारांची शक्यता वाढते. तसेच डोळ्यांची संवेदनाशक्ती नाहीशी होते.

भोपळी मिरची : इंग्रजी भाषेत तिला बेल पेपर म्हणतात. कॅप्सिकम ॲन्यूम जातीतील ग्रोसम प्रकाराला स्थानिक भाषेत सिमला मिरची असेही म्हणतात. हे क्षुप ४५–६० सेंमी. उंच वाढत असून त्याच्या हिरव्या फांद्यांवर बारीक गाठी असतात. खोडाची पेरे फुगीर असून त्यांवर जांभळ्या रंगाची झाक असते. पाने जाड, अंडाकृती आणि टोकाला निमुळती असतात. वरची पाने लहान, तर तळाकडची पाने मोठी असतात. पानांचे देठ मजबूत व लांब असतात. फुले कक्षस्थ पानांच्या बगलेत एकेकटी येतात. पाकळ्या मोठ्या, पसरट आणि फिकट पांढऱ्या असतात. निदलपुंजाने फळांचा तळ वेढलेला असतो. फळ मोठे, ५–१० सेंमी. व्यासाचे असून देठाकडे खोलगट असते. सुरुवातीला ते हिरवे असून पिकल्यानंतर पिवळे किंवा लाल होते. त्याची साल जाड असून आतील गरसुद्धा जाड असतो. त्यात अनेक बिया असून त्या सुरुवातीला पांढऱ्या असतात आणि नंतर किरमिजी होतात. फळांचा उपयोग भाजी, सॅलड, कोशिंबीर तसेच लोणचे तयार करण्यासाठी होतो.

लवंगी मिरची : भारतात मिरचीची कॅप्सिकम फ्रुटेसेंस ही आणखी एक जाती लागवडीखाली आहे. ती मूळची अमेरिकेतील आहे. ही बहुवर्षायू वनस्पती ७५ सेंमी. ते २ मी. उंच वाढते. फांद्या कोनीय असून पाने साधी, रुंद, अंडाकृती, टोकाला निमुळती आणि लवदार असतात. फुले दोन किंवा जास्त संख्येने एकत्र येतात. फुलांचे देठ लहान व २–५ सेंमी. लांब असतात. पाकळ्या पांढऱ्या किंवा फिकट हिरव्या असतात. निदलपुंजाने फळांचा तळ वेढलेला असतो. फळे लहान व शंकूच्या आकाराची असून पिकल्यानंतर लाल होतात. त्यात अनेक बिया असतात. लवंगी मिरची फार तिखट असल्यामुळे तिचा वापर स्वयंपाकात मसाल्यासाठी करतात.

चेतासंस्थेच्या वेदना व संधिवाताच्या तक्रारी यांवर मिरचीपासून तयार केलेल्या पदार्थांचा वापर प्रतिदाहक म्हणून करतात. मिरची सौम्य प्रमाणात शक्तिवर्धक व पाचक असून अपचनावर गुणकारी आहे. मात्र अतिवापर केल्यास जठर व आतडे यांवर वाईट परिणाम होतो. घसादुखीवर गुळण्या करण्याच्या औषधात मिरचीचा वापर केला जातो. तिचा तिखटपणा स्कॉव्हिले हीट युनिट (एसएचयू) या एककात मोजतात. कॅ. चायनीज जातीचा एक प्रकार कॅरोलिना रिपर ही मिरची जगात सगळ्यांत तिखट मिरची म्हणून ओळखली जाते. तिचा तिखटपणा २२,००,००० एसएचयू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा