एक सर्वपरिचित कंदमूळ. रताळे ही वनस्पती कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयपोमिया बटाटाज आहे. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील असून इ.स.पू. ८००० वर्षांपासून लागवडीखाली आहे. कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात सु. ५० हून अधिक प्रजाती आणि सु. १,५०० हून अधिक जाती आहेत. त्यांपैकी आयपोमिया प्रजातीत रताळे, मर्यादवेल व गारवेल इत्यादी वनस्पती येतात. रताळे हे एकमेव महत्त्वाचे पीक असून त्याच्या मांसल मुळांसाठी लागवड करतात. भारत, चीन, जपान, मलेशिया, पॅसिफिक बेटे आणि आफ्रिकेतील युगांडा, टांझानिया हे देश तसेच दक्षिण अमेरिकेतील उष्ण प्रदेश इत्यादी ठिकाणी रताळ्याचे पीक घेतले जाते. कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील अन्य वनस्पतींचा स्थानिक वापर होत असून या कुलातील काही वनस्पती विषारीही आहेत. रताळ्याचे इंग्रजी नाव जरी स्वीट पोटॅटो असले तरी रताळे आणि बटाटा यांची कुले वेगवेगळी आहेत.
रताळे जमिनीलगत वाढणारी बहुवर्षायू वेल असून तिची मुळे मांसल आणि पिठूळ असतात. पाने साधी, एकाआड एक, हिरवी, मोठी, खंडित किंवा अखंडित असतात. खोड हिरवे, मऊ असून जून झाल्यावर त्यावर तपकिरी रंगाची पातळ साल येते. फुले पांढरी किंवा जांभळ्या रंगाची, नसराळ्याच्या आकाराची, एकाकी अथवा गुच्छाने येत असून ती आकर्षक असतात. निदलपुंज संयुक्त, पाच दलांचा व हिरवा असतो. दलपुंज संयुक्त व पाच दलांचा असून घंटेच्या आकाराचा असतो. फुलात पाच पुंकेसर असून त्यांची लांबी कमी-अधिक असते. पुंकेसर दलपुंजाला चिकटलेले असतात. जायांग ऊर्ध्वस्थ असून ते दोन अंडपींचे बनलेले असते. फळ (बोंड) लहान व स्फुटनशील असून पिकल्यावर त्यातून अनेक बिया बाहेर पडतात.
रताळी मुख्य खोडाच्या तळाशी किंवा सरपटत वाढणाऱ्या वेलीच्या पेऱ्यांपाशी येतात. एका वेलीला साधारणपणे ४०–५० वेगवेगळ्या आकारांची रताळी येतात. त्यांचा आकार मध्यभागी फुगीर असून दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला असतो. पृष्ठभाग खडबडीत किंवा गुळगुळीत असतो. रताळ्याच्या सालीचा रंग पांढरा, पिवळा, लाल, तपकिरी किंवा सोनेरी असून मगज पांढरा, पिवळा किंवा लाल छटा असलेला असतो.
अनेक ठिकाणी बटाट्याच्या खालोखाल रताळ्याचे पीक घेतले जाते. रताळ्याचे पीक घेण्यास साधारणपणे ४-५ महिन्यांचा कालावधी लागतो. भारतात रताळ्याची लागवड सर्व राज्यांत कमी-अधिक प्रमाणात होते. महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हे पीक घेतले जाते. भारतात मुख्यत: पांढऱ्या अथवा लाल सालींची रताळी लागवडीखाली आहेत. त्यातील मगज पांढरा असतो. लाल सालीची रताळी पांढऱ्या सालीच्या रताळ्यांपेक्षा जास्त गोड असतात. पांढऱ्या सालीची रताळी बहुधा एकसारख्या आकाराची असून ती जास्त दिवस टिकतात. उत्तर भारतात लाल तर दक्षिण भारतात पांढरी रताळी जास्त पसंत करतात. भारतात सेंट्रल ट्यूबर क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे रताळ्यासंबंधी संशोधन केले जाते.
रताळ्यात पाणी ६८%, प्रथिने १%, मेद ०·३%, कर्बोदके (स्टार्च) २८%, तंतुमय पदार्थ व खनिज पदार्थ १% असून अ, क आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. त्याचे साठवण करताना स्टार्चच्या काही भागाचे शर्करांमध्ये रूपांतर होते. पूरक अन्न म्हणून रताळी कच्ची किंवा शिजवून खातात. ती उकडल्यामुळे त्यांची गोडी वाढते. रताळे पौष्टिक तसेच सारक आहे. रताळ्यात व वेलीमध्ये कवकनाशक व सूक्ष्मजीवनाशक घटक आढळून येतात. जपानमध्ये रताळ्याच्या गराचे किण्वन करून शोशू नावाचे मद्य बनवितात. रताळ्याची सर्वाधिक लागवड (सु. ८१%) चीनमध्ये केली जाते.