ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम व पारशी या धर्मांतील ही एक संकल्पना. मात्र या ठिकाणी ज्यू व ख्रिस्ती धर्मांच्याच अनुषंगाने ऊहापोह केले गेले आहे. ज्यू भविष्यवाद्यांचे असे भाकीत आहे की, एका ठरावीक वेळी येहोवा (परमेश्वर) येणार आहे आणि धार्मिक व अधार्मिक, चांगले व वाईट ह्यांचा अखेरचा निवाडा तो स्वत: करणार आहे. केवळ आपल्या सद्कृत्यांवर व येहोवाच्या इच्छेवरच हा निवाडा अवलंबून असेल, ही घटना जगाच्या अंत:समयी घडणार आहे. त्यासमयी सद्वर्तनी लोकांना सार्वकालिक स्वर्गीय सुखाचे जीवन व अधर्माचरणी व दुष्ट लोकांना सार्वकालिक नरकाची शिक्षा मिळेल. परमेश्वर सर्व जगभर आपले राज्य (देवाचे राज्य) स्थापन करील (बायबल, आमोस−५:१८:२४). हा निवाड्याचा दिवस चालू काळातच येईल, असा ‘नव्या करारा’चा सूर दिसत असला, तरी तो न्यायाचा दिवस येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी असेल.

जीवाच्या मरणोत्तरस्थितीबाबतचा विचार सर्वच धर्मांत कमीअधिक प्रमाणात केल्याचे दिसते. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय अथवा प्रलय ह्यांपैकी प्रलयाशी सर्व जीवांच्या मरणोत्तरस्थितीचा घनिष्ट संबंध जोडला गेला व पूर्व कर्मांनुसार जीवाची चांगली वा वाईट मरणोत्तरस्थिती कल्पिली गेली. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक ह्या कल्पनांचाही जीवाच्या बऱ्यावाईट कर्मांशी संबंध निगडित करून त्याला त्यानुसार त्याचे प्रतिफळ मिळेल, असे मानण्याकडे सर्वच धर्मांचा कल आहे.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया