थॉमस, संत : (?— इ. स. सु. ५३). येशू ख्रिस्ताच्या १२ अनुयायांपैकी एक. थॉमस यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. येशूने आपल्या सुमारे ७० अनुयायांमधून १२ शिष्यांची काळजीपूर्वक निवड केली. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षण देऊन विशिष्ट कार्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी पाठविले; त्यामुळे ‘पाठविलेला’ या अर्थाने त्यांना ‘प्रेषित’ (ग्रीक भाषेत Apostolos) असे संबोधिले गेले. याच बारा प्रेषितांमध्ये थॉमस हे एक शिष्य होते.
बायबल मधील मत्तय, मार्क व लूक या समलक्षी (Synoptics) समजल्या जाणाऱ्या सुवार्तिकांच्या शुभवर्तमानांत थॉमस यांचा उल्लेख फक्त एकदाच आला आहे; तोही सर्व प्रेषितांच्या नावांच्या सामूहिक यादीत. योहानच्या शुभवर्तमानात मात्र थॉमस यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चार घटना वर्णन केल्या आहेत.
मासे पकडायला गेलेल्या शिष्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताने दर्शन दिले. रात्रभर प्रयत्न करून त्यांना एकही मासा गवसला नव्हता; मात्र येशूने त्यांना उजव्या हातावर जाळे टाकण्यास सांगताच, त्यांच्या जाळ्यात माशांचा फार मोठा घोळका सापडला. या घटनेच्या वेळी मासे पकडायला गेलेल्या सिमोन पत्रासोबत थॉमस हेही होते (बायबल, योहान २१:२). यावरून थॉमस हे व्यवसायाने मच्छीमार होते. तसेच ते मूळचे गालीलीया प्रांतातले रहिवासी होते, हे स्पष्ट होते.
थॉमस यांचे येशूवर किती प्रेम होते, ते योहानने दुसऱ्या एका घटनेत दाखवून दिले आहे. लाझरसच्या मृत्यूनंतर येशूने सर्व शिष्यांना चालना देत म्हटले, ‘‘चला, आपण यहुदियात जाऊ’’. त्या वेळी यहुदिया प्रांतात येशूला जीवे मारण्याचे मनसुबे रचले जात आहेत, ह्याची पूर्वकल्पना असलेले इतर शिष्य तेथे जाण्यास तयार नसताना थॉमस यांनी मात्र सर्वांना आवाहन करीत म्हटले, ‘‘चला, आपण त्याच्याबरोबर मरायला जाऊया’’ (बायबल, योहान ११:१६). आपल्या गुरूबरोबर थॉमस मरायलाही तयार होते, असेच या प्रसंगातून दिसते.
शेवटच्या भोजनानंतर येशूने शिष्यांना प्रबोधन करताना म्हटले, ‘‘मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यास जात आहे… मी कुठे जातो आहे, तिथला मार्ग तुम्हांस ठाऊक आहे’’. त्यावर थॉमस यांनी चटकन प्रश्न विचारीत म्हटले, ‘‘प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात ते आम्हांस ठाऊक नाही, मग मार्ग कसा माहीत असणार?’’ (बायबल, योहान १४:३-५). यातून कोणतीही नवीन गोष्ट नीट आकलन करून घेण्याची थॉमस यांची जिज्ञासावृत्ती दिसून येते. शिवाय, थॉमस यांच्या याच प्रश्नाचा उपयोग करून प्रभू येशूने स्वत:विषयी फार मोठे सत्य प्रकट करीत म्हटले, ‘‘मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी जात नाही.’’
थॉमस यांच्या संदर्भात वर्णन केलेली संत योहानची चौथी व अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे पुनरुत्थित येशूने त्याच दिवशी शिष्यांना दिलेले दर्शन. लोकांच्या भीतीमुळे दारे-खिडक्या बंद असताना थेट आत शिरून येशूने शिष्यांना दर्शन दिले; त्या वेळी थॉमस त्यांच्यासह नव्हते. ते आल्यावर बाकीच्या शिष्यांनी त्यांना म्हटले, ‘‘प्रभूला आम्ही पाहिले’’. त्यांच्या या बोलण्यावर थॉमस यांनी विश्वास ठेवला नाही व म्हणाले, ‘‘मी त्याच्या हातांवरील जखमेत बोट घातल्यावाचून आणि कुशीत हात घातल्यावाचून विश्वास ठेवणार नाही’’ (बायबल, योहान २०:२५). थॉमस यांच्या याच वक्तव्यामुळे त्यांच्यावर ‘संशयी थॉमस’ असा जन्माचा शिक्का मारला गेला. शिवाय इंग्रजी साहित्यात ‘डाऊटिंग थॉमस’ हा वाक्प्रचारही प्रचलित झाला. वास्तविक, थॉमस यांची ती प्रतिक्रिया संशयी नव्हती, तर त्यात लहान मुलांसारखी निरागसता होती. ‘प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही’ या वृत्तीतून ती प्रतिक्रिया प्रकट झाली होती. त्यामुळेच आठवड्याभरानंतर दुसऱ्यांदा दिलेल्या दर्शनाच्या वेळी येशू ख्रिस्ताला पाहून थॉमस यांनी त्याच्या दैवीपणावर आपली श्रद्धा प्रकट करीत ‘‘माझा प्रभू, माझा देव’’ असे उद्गार काढीत पूर्णपणे शरणागती पत्करली. थॉमस यांच्या या अविश्वासामुळेच प्रभू येशूने न पाहता त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांविषयी धन्योद्गार काढले.
वर स्वर्गात जातेवेळी येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, ‘‘जा आणि साऱ्या राष्ट्रांना माझी शुभवार्ता जाहीर करा’’ (बायबल, मार्क १५:१६). त्यानुसार १० दिवसांनी पवित्र आत्म्याच्या आगमनानंतर सर्व शिष्य निरनिराळ्या देशांत गेले. संत थॉमस भारतात आले. खुष्कीच्या मार्गाने येताना त्यांनी त्यांच्या प्रवासात पार्थियन, मेडीज, पर्शियन, हायक्रॅनियन्स अशा अनेकांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. मेसोपोटेमियातील एडिसा (तुर्कस्थान) येथे फार मोठ्या ख्रिस्ती समूहाची स्थापना करून ते भारतात आले. भारतातील पंजाबमधील तक्षशिला येथे गोंडोफरस नावाच्या पर्शियन राजाच्या राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला. त्यानंतर केरळमध्ये सात ख्रिस्तसमूह स्थापन करून ते मैलापूरला गेले. तेथेच त्यांना हौतात्म्य लाभले, असे वर्णन इ. स. १८० ते २३० या काळात मेसोपोटेमियातील एडिसा येथील बारदेसाना नावाच्या व्यक्तीने ॲक्ट्स ऑफ थॉमस नावाच्या ग्रंथात करून ठेवले आहे. सदर ग्रंथ अरेमाईक या यहुद्यांच्या मातृभाषेत लिहिलेला आहे. याच ग्रंथात असेही म्हटले आहे की, संत थॉमस यांच्या हौतात्म्यानंतर त्यांना मैलापूर येथे पुरण्यात आले. मात्र काही वर्षांनंतर एडिसाच्या व्यापाऱ्यांनी संत थॉमस यांचे काही अवशेष बाहेर काढून ते मोठ्या भक्तिभावाने एडिसाला नेले. तो दिवस ३ जुलै असल्याने रोमन व सिरियन कॅथलिक ख्रिस्तमंडळात दि. ३ जुलै ह्याच दिवशी संत थॉमस यांचा स्मृतिदिन पाळला जातो.
दि. १८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे संत थॉमस यांच्या भारतातील आगमनवर्षाचा एकोणिसावा शताब्दी महोत्सव संपन्न झाला. त्या प्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘‘यूरोपच्या अनेक देशांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार जेव्हा झाला नव्हता, तेव्हापासून भारतात ख्रिस्ती धर्म रूढ झाला होता. भारतातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास यूरोपातील ख्रिस्ती लोकांच्या इतिहासापेक्षा अधिक पुरातन असून त्याची पूर्वपारंपरिकता अधिक गौरवशाली आहे, याचा आम्हा भारतीयांना रास्त अभिमान वाटतो.’’
संदर्भ :
- Aiyar, M. S. Ramswami, The Apostle Thomas and India, 1930.
- Heras, H. The Two Apostles of India, Bombay, 1944.
- Moraes, George Mark, A History of Christianity in India, 1964.
- Soars, A. Catholic Church in India,
- येशुदास, विनयाय, बोरान्को, सुवार्ता आणि प्रेषितांची कृत्ये, १९६३.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया