बायबल  या ख्रिस्ती धर्मग्रंथाचा उदय यहुदी (ज्यू) समाजात आणि यहुदी संस्कृतीत झालेला आहे. द जेरूसालेम बायबल  या आवृत्तीनुसार (पृ. २०५५) इ. स. पू. ३१०० ते २१०० या कालखंडात अब्राहमचे पूर्वज मेसापोटेमिया (टायग्रीस व युफ्रेटीस या नद्यांचा प्रदेश) या ठिकाणी वास्तव्य करीत होते. इ. स. पू. १८५० च्या सुमारास अब्राहम आपली पत्नी साराह हिच्यासह उर या प्रांतातून (सध्याच्या इराकमधील) कनान (पूर्वीचा पॅलेस्टाइन) येथे येऊन स्थिरावला. पूर्वाश्रमी यहुदी समाज भटक्या जमातीचा होता. ते लोक आपली जनावरे गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांसह कनान देशात येऊन स्थीरावले. काळाच्या ओघात इझ्राएली लोकांच्या धार्मिक व सामाजिक परंपरांना स्थिरता येऊ लागली. ती मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला सांगण्यात आली. प्रत्येक पिढीचे संस्कार अपरिहार्यपणे तिच्यावर होत राहिले. कालांतराने ह्या परंपरेने जे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले, ते आपल्याला बायबलमध्ये बघायला मिळते.

ईश्वराने दिलेल्या ‘दशाज्ञा’ इझ्राएली लोकांना सांगताना मोझेस

प्राचीन काळी–विशेषत: भटक्या जमातीत–लिखाण हे फार क्वचितच केले जायचे. स्मरणशक्तीला थोडासा टेकू म्हणून लिखाणाचा आधार घेतला जायचा. ऐतिहासिक घटना, संचिते, रूढी-परंपरा, कायदेकानून, उपासनापद्धती, काव्य आणि वाङ्मय हे सर्व जीवंत माणसांच्या आठवणीत साठवलेले असायचे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्याचे संक्रमण करण्यासाठी नाशवंत लेखनसाहित्यापेक्षा जीवंत स्मृतींवर त्यांचा अधिक भरवसा होता. चिखल, विटा, लाकडी पाट्या तसेच पपायरस यांसारख्या सामग्रीवर लिखाण केले जाई. कालांतराने अशा लेखनसाहित्यांचा वापर वाढत गेला असला, तरी सुरुवातीस तो फार जुजबी स्वरूपात केलेला असायचा. समाजाच्या अनेकविध संचितांचे संक्रमण मौखिक परंपरेतूनच होत असे. अशा मौखिक परंपरांद्वारे समाजाची आध्यात्मिक आणि बौद्धिक भूक भागविली जायची.

इझ्राएलच्या डेव्हिड राजाने चाळीस वर्षे राज्य केले (इ.स.पू.सु. १०१०–९७०). डेव्हिडपर्यंत इझ्राएलचे वाङ्मय हे रूढी-परंपरांचे वाङ्मय होते. लिखाण केले जायचे पण ते मर्यादित स्वरूपात. काही महत्त्वाच्या घटनांची स्मृती जपून ठेवण्यासाठी भावनाशून्य टिपणे करण्याऐवजी त्यांनी महाकाव्याचा वापर करणे अधिक पसंत केले. धार्मिक आणि नैतिक संकल्पनांचे संक्रमण करण्यासाठी, मुख्य कायदे, उपासनाविधीनियम जतन करून ठेवण्यासाठी त्यांनी ठसठशीत कथांचा चपखलपणे वापर केला. ह्या कथांचा उद्देश प्रामुख्याने बोधपर होता. ह्या कथा ऐतिहासिक स्वरूपाच्या असल्या, तरी त्यांतून काहीतरी शिकविण्याचा हेतू होता. आधुनिक वाङ्मयाप्रमाणे त्या काळात वाङ्मयप्रकारांची स्वतंत्र कप्पेबंद दालने नव्हती. एकाच कथनामध्ये कसलीही पूर्वसूचना न देता कथाकार/निवेदक ऐतिहासिक आठवणींतून काव्यात्मक डोलारा फुलविण्यात रममाण होई किंवा वाचकांना तपशीलवार नैतिक आचरणाचे नैतिक धडे देण्यात दंग होई. थोडक्यात, बायबलच्या परंपरांमधून इतिहास आणि देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धेचा प्रवास ह्या दोन्ही गोष्टी प्रकट होतात.

मौखिक परंपरेचा विकास पूर्ण होत चाललेला असतानासुद्धा काही संहिता त्यांच्या गुणधर्म-वैशिष्ट्यांमुळे शब्दबद्ध करण्यात आल्या होत्या. उदा., धर्मविधींची नियमावली आणि काव्यसंहिता. इझ्राएली परंपरेनुसार मोझेस (मोशे) हा कायदा देणारा ज्येष्ठ आद्य नेता होता. त्याने न्यायाधीशाचीही भूमिका वठविली होती. न्यायासनावरून मोझेसने उच्चारलेल्या विधानांना कायद्याचे वजन प्राप्त झालेले आहे. सिनाई (सियोन) पर्वतावर त्याला ईश्वरी साक्षात्कार झाला व ईश्वराने त्याला आपल्या ‘दशाज्ञा’ वा दहा नीतिनियम दिले. देवाच्या आदेशावरून मोझेसने त्या ‘दशाज्ञा’ त्याने दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या (बायबल, निर्गम ३४:१–२८). त्याने इझ्राएली लोकांना सामाजिक कायद्यांची आणि उपासनेच्या संदर्भातील करावयाच्या कर्मकांडांची नियमावली दिली. सिनाई पर्वतावर परमेश्वराने मोझेसबरोबर जो करार केला, तो करार नियमशास्त्राचा भाग बनला (बायबल, निर्गम २४:३–८). इझ्राएली लोकांचे कायदेकानून, रीतीरिवाज यांमधील प्राथमिक तत्त्वे, मूळ उद्देशप्रवृत्ती आणि चित्तवृत्ती मोझेसपासून उदयास आलेले आहेत, याबद्दल शंका नाही.

तथापि, कायद्याच्या संदर्भातील मोझेसची भूमिका नीट समजून घेतली पाहिजे. कायद्याच्या संहितेतील सर्व घटकांचा शोध मोझेसने लावलेला नाही; तर त्याने तत्कालिन सेमिटिक आचारसंहिता आणि रीतिरिवाजांचे नियमयांची निवड केली, त्यांत दुरुस्ती कली आणि परिपूर्ती केली. त्याच्यानंतर येणाऱ्या जाणकारांनी कायद्याचा प्रमाणित अर्थ लावला आणि स्थलकालसापेक्ष बदल केले असले, तरी त्यांचा नामोल्लेख कुठेही केलेला आढळत नाही. इझ्राएलचे कायदे नेहमीच ‘मोझेसचे नियमशास्त्र’ म्हणून ओळखले जातात.

इझ्राएली समाज भटक्या अवस्थेत असताना त्यांच्या कवितांची काही छोटेखानी उदाहरणे प्राथमिक स्वरूपात आढळतात (बायबल, उत्पत्ती ४:१९–२४; निर्गम १८:३७–३९, १५:१–१९). कनान देशात स्थायिक झाल्यावर इझ्राएली वाङ्मयनिर्मितीच्या कालखंडाला सुरुवात झाली. कनानी संस्कृतीच्या संपर्कात आल्यानंतर इझ्राएली काव्यस्फूर्तीला चेतना मिळाली. आपल्या राष्ट्राच्या संदर्भातील महत्त्वाच्या घटना सांगणारे निवेदक त्या गाऊन सांगू लागले. उदा., दबोराचे गीत (शास्ते ५), मोझेसचे गीत (निर्गम १५).

उपासनाविधीमध्ये ज्या कविता गायल्या जातात त्यांना स्तोत्रे (Psalms) असे म्हटले जाते. हा वाङ्मयप्रकार इझ्राएलमध्ये खूप प्राचीन काळापासून आहे. बायबलच्या परंपरेनुसार डेव्हिड अशा धार्मिक काव्यांचा आणि संगीताचा उद्गाता मानला जातो. भटकंती करणारे इझ्राएली लोक कनान देशात स्थिरावल्यावर सॉलोमन राजाने जेरूसलेमेचे मंदिर बांधले. काव्यनिर्मितीला अवसर मिळाला आणि राजाकडून प्रोत्साहनही मिळाले. नंतरच्या अनेक कवींनी राजा डेव्हिडचे ऐतिहासिक महत्त्व जाणून आपले काव्य त्याच्या आश्रयाखाली लिहिले. ही सर्व काव्यनिर्मिती रूढार्थाने ‘डेव्हिडचे काव्य’ म्हणून ओळखले जाते.

इझ्राएलच्या पुरावशेषात लोकप्रिय म्हणी, वाक्प्रचारादींनी युक्त असे ज्ञानविषयक साहित्य आहे. सॉलोमन हा विद्वान राजा होता. त्याच्या कारकिर्दीत शिक्षितांमध्ये ज्ञानसाहित्याची परंपरा उदयास आली. ही परंपरा किंवा ज्ञानसंपदा देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व लोकांनी स्वीकारली.

अपराधी डेव्हिड राजाला नाथान नावाच्या संदेष्ट्याने सांगितलेला दाखला बायबलमधील राब्बोनिक (गुरुवर्यांचे) साहित्य आणि शुभवर्तमानात येणाऱ्या कथा, दाखले या साहित्यप्रकाराची नांदी ठरते. एखाद्या रेखीव कथेद्वारे ऐकणाऱ्याचे लक्ष वेधले जाते आणि चपखलपणे परिणाम साधणारा धडा शिकविला जातो. अशा कथा, कहाण्या, मिथकथा, बोधकथा आणि दाखले यांचा भरपूर वापर मध्यपूर्वेच्या वाङ्मयातून केलेला आढळतो.

डेव्हिड राजाच्या राजवटीची अधिकृत नोंद करून इझ्राएली इतिहासाची सुरुवात होते (बायबल, २ शमुवेल ५:६ ते १ राजे २). एकसत्ताक राज्यपद्धतीबरोबर इझ्राएल राष्ट्राला प्रौढत्व प्राप्त झाले. त्याला अनेक शतकांच्या इतिहासाचा वारसा मिळाला होता. एव्हाना राजकीय आणि धार्मिक संस्थाही निर्माण झाल्या होत्या. राजदरबारी दस्तऐवजांचे लेखन करणारे मान्यताप्राप्त लेखक (हिब्रू भाषेत ‘स्क्राईब’) तयार झाले होते.

राजमहाल आणि मंदिर तसेच राजसंस्था आणि धर्मसंस्था यांचे परस्परांत चांगले सहकार्य असल्यामुळे ह्या ‘स्क्राईबां’चा जेरूसलेमच्या पुरोहित वातावरणाशी घनिष्ठ संबंध आला. त्याचा उपयोग त्यांना डेव्हिड राजाने विकासाच्या परंपरेला अखेरच्या टप्प्यापर्यंत आणले याची नोंद करण्यासाठी झाला.

एव्हाना इझ्राएलमध्ये शैक्षणिक वातावरण तयार झाले होते. आता पूर्वेतिहासाचा लेखाजोखा तयार करण्याची गरज निर्माण झाली. ह्या आगळ्यावेगळ्या जबाबदारीकडे केवळ मानवी दृष्टिकोनातूनच नव्हे, तर दैवी दृष्टिकोनातूनही पाहण्याचे शहाणपण अशा लेखकांनी जपले, हे विशेष. अशा रीतीने ‘जुन्या करारा’ची लेखी परंपरा विकसित होत गेली.

इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात संत पॉल (पौला) यांनी काही नगरांतील ख्रिस्त मंडळांना लिहिलेल्या पत्रांद्वारे ‘नव्या करारा’च्या लेखनास सुरुवात झाली; दुसऱ्या शतकापर्यंत त्यांचे संपादन करून ते संग्रहित करण्यात आले. इ.स.पू. १३०० ते इ.स. १०० ह्या सुमारे चौदाशे वर्षांच्या कालखंडात संपूर्ण बायबलची लेखी परंपरा साकार झालेली आहे.

संदर्भ :

  • Grelot, Piere, Introduction to The Bible, London, 1967.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया