सुब्बुलक्ष्मी, एम. एस. : (१६ सप्टेंबर १९१६ – ११ डिसेंबर २००४). कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ भारतीय गायिका व सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. त्यांचे पूर्ण नाव मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी असे आहे. पुढे त्या ‘एम. एस. सुब्बुलक्ष्मी’ ह्या नावाने संगीतक्षेत्रात ख्यातनाम झाल्या. त्यांचा जन्म मदुराई येथे झाला. त्यांना लहानपणी कुंजम्मा म्हणत. त्यांच्या आई षण्मुखवाडिवु या नामवंत वीणावादक होत्या, तर त्यांच्या आजी अक्कमल या व्हायोलिनवादक होत्या. या दोघींच्या संगीताचा वारसा सुब्बुलक्ष्मी यांना लाभला. त्यांना उपजतच लाभलेल्या नादमधूर स्वरावर पुढे विविध प्रकारच्या गायकीचे संस्कार होत गेले.
सेमनगुडी श्रीनिवास अय्यंगार हे सुब्बुलक्ष्मी यांचे कर्नाटक संगीतातील गुरू होत. पं. नारायणराव व्यास यांनी त्यांना हिंदुस्थानी संगीत शिकविले. प्रख्यात नर्तकी बालासरस्वती यांनी त्यांना पदम्चे शिक्षण दिले, तर दिलीपकुमार राय व सिद्धेश्वरीदेवी यांनी त्यांना ठुमरी व टप्पा गायनाचे धडे दिले. अशा प्रकारे विविध संस्कारांतून त्यांची नादमधुर व परिपक्व गायकी घडत गेली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली आणि सतराव्या वर्षी मद्रासच्या संगीत अकादेमीत गाण्याचा मान त्यांना लाभला. ह्या मैफिलीने त्यांचा खूपच नावलौकिक झाला. तमिळ चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला. १९३८ मध्ये सेवासदनम् हा सुब्बुलक्ष्मी अभिनित पहिला तमिळ चित्रपट होय. यानंतर शकुंतला, सावित्री, मीरा ह्या त्यांच्या चित्रपटांनी अमाप लोकप्रियता मिळविली. वाय. व्ही. राव दिग्दर्शितसावित्री या चित्रपटामध्ये त्यांनी नारदाची भूमिका केली आणि हातात एकतारी व चिपळ्या घेऊन भजने गायिली. या चित्रपटातील अठरापैकी सहा गाणी त्यांनी गायलेली होती. मीरा हा चित्रपट हिंदीतही निघाला व त्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. ह्या चित्रपटात त्यांनी संत मीरेची भूमिका केली. त्यांचा त्यातील अभिनय व त्यांनी गायिलेली मीरेची सुमधुर भजने देशभर अत्यंत गाजली व त्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाद्वारे त्यांनी उत्तर व दक्षिण भारतातील लाखो प्रेक्षकांच्या हृदयात सुप्त असलेली आध्यात्मिकतेची भावना जागृत केली, असे म्हटले जाते. त्यानंतर त्यांनी अनपेक्षितपणे चित्रपटसंन्यास घेतला व शास्त्रीय संगीतोपासनेला सर्वस्वी वाहून घेतले.
मद्रास काँग्रेसमधील आघाडीचे नेते व स्वातंत्र्यसेनानी, तसेच राजगोपालचारी यांचे सहकारी व निर्भीड गांधीवादी पत्रकार टी. सदाशिवम् यांच्याशी सुब्बुलक्ष्मींचा विवाह १९४० मध्ये झाला. १९४१ मध्ये त्यांनी पतीसह वर्धा आश्रमात महात्मा गांधींची भेट घेतली. त्यांनी गायिलेली मीरेची भजने व ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ हे भजन गांधीजींना प्रिय होते. १९६६ पासून त्या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च अढळपदावर विराजमान झाल्या. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही त्यांची ख्याती पसरली व त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली.
१९६० मध्ये सुब्बुलक्ष्मी एडिंबरो संगीत महोत्सवात गाण्यासाठी प्रथम विदेशी गेल्या. १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतील गायनाने त्यांनी अनेक राष्ट्रप्रमुखांना मंत्रमुग्ध केले. तेथे त्यांनी चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी अनुवाद केलेली विश्वशांतीची ऋचा आणि कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री चंद्रशेखरानंद सरस्वती यांची संस्कृत भाषेतील ‘मैत्रीम भजत’ ही रचना गायली. या रचनेस प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. रशिया, अमेरिका, फ्रान्स येथेही त्यांच्या अनेक मैफिली झाल्या. १९८२ मध्ये लंडनच्या रॉयल ॲल्बर्ट हॉलमध्ये झालेली त्यांची मैफल ऐकण्यासाठी राणी एलिझाबेथ उपस्थित होत्या. परदेशांतील भारत महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या गायनाने होत असे.
कर्नाटक संगीतातील प्रमुख गायक संत त्यागराज ह्यांच्या भक्तिरचना सुब्बुलक्ष्मींच्या गायनातून प्रभावीपणे साकार झाल्या. भारतातील प्रमुख भाषांतील संतांच्या भक्तिपर रचना त्यांनी गायिल्या व लोकप्रिय केल्या. भक्तिरसाचा आविष्कार हे त्यांच्या गायकीचे प्रधान वैशिष्ट्य होय. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, नम्रता, निगर्वीपणा व समर्पणशीलता ह्या गुणांनी संपन्न होते. भक्तिभाव व सात्त्विकता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता व तोच त्यांच्या गाण्यातूनही प्रकटला. ‘गायनातून आपण ईश्वर शोधतो आणि गायनाच्या माध्यमातूनच ईश्वराची पूजा करतो’ ही त्यांची धारणा त्यांच्या स्वरांतून साकारली आहे. अल्लादियाखाँ ह्यांनी सुब्बुलक्ष्मी ह्यांना ‘सुस्वरलक्ष्मी’ ही पदवी बहाल केली. भारताचे भूतपूर्व पंतप्रधान पं. नेहरू यांनी ह्या गानसम्राज्ञीपुढे ‘आपण साधे पंतप्रधान आहोत’ असे उद्गार काढले होते. सुब्बुलक्ष्मींनी भक्तिसंगीतात अनेक प्रयोग केले. नवनवीन रचना निर्माण केल्या. कर्नाटक संगीतातील कृती, पदम्, वर्णम्, तिल्लाना इ. संगीतप्रकार त्या बिनचूक व प्रभावीपणे सादर करीत. त्यांनी त्यागराज ह्यांच्याप्रमाणेच श्यामशास्त्री, मुथ्थुस्वामी दीक्षितर, अन्नमाचार्य वगैरेंच्या रचना गाऊन लोकप्रिय केल्या. त्या ७२ मेलकर्ता समाविष्ट करणारी गुंतागुंतीची रागमालाही गात असत. त्यांच्या गाण्यात हिंदुस्थानी संगीत व कर्नाटकी संगीत या दोन्ही शैलींचा मधुर मिलाफ जाणवतो. त्यांचे संस्कृत उच्चारणही अत्यंत शुद्ध व अचूक होते. त्यांनी गायिलेल्या श्रीविष्णुसहस्रनाम व व्यंकटेशस्तोत्र ह्या रचना त्यांच्या आवाजातील अवीट गोडीमुळे अजरामर ठरल्या आहेत. त्या जशा उत्तम गायिका होत्या, तशाच उत्कृष्ट वीणा व मृदंगवादकही होत्या.
ह्या गानसम्राज्ञीला अनेकविध उच्चप्रतीचे मानसन्मान व पुरस्कार लाभले. भारत सरकारकडून पद्मभूषण (१९५४), पद्मविभूषण (१९७५) व सर्वोच्च असा भारतरत्न (१९९८) हे पुरस्कार त्यांना लाभले. स्पिरिट ऑफ फ्रीडम (१९८८), राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार (१९९०), तसेच रामॉन मागसायसाय हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार (१९७४) त्यांना मिळाला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली. उदा., दिल्ली विद्यापीठाची डॉक्टरेट, रवींद्र भारती विद्यापीठातर्फे सन्मान, तसेच मद्रासचा ‘कलानिधी’ गौरव, कर्नाटक संगीतातील सर्वश्रेष्ठ कलावंत म्हणून राष्ट्रपती पुरस्कार (१९५६) इत्यादी. १९८९ मध्ये त्यांना पाच वर्षांसाठी नॅशनल टीचर्स प्रोफेसर म्हणून घोषित करण्यात आले. यूनेस्को पुरस्कृत आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेने त्यांना १९८१ मध्ये सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. त्यांना मिळालेले मानधन, सन्मान, पुरस्कार त्यांनी अनेक रुग्णालये, वैद्यकीय संशोधन केंद्रे, वैदिक पाठशाळा यांच्या साहाय्यार्थ प्रदान केले. गाणे हे ईश्वरप्राप्तीचे साधन मानणाऱ्या सुब्बुलक्ष्मींनी कर्नाटक संगीताला जगाच्या सांस्कृतिक नकाशावर नेऊन ठेवले. त्यांनी विविध दहा भाषांमध्ये गाणी गायली. त्यांना रवींद्र संगीताचीही जाण होती.
चेन्नई येथे सुब्बुलक्ष्मींचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने पोस्टकार्डाचे आणि संयुक्त राष्ट्रसंघाने एका टपाल तिकीटाचे अनावरण केले आहे (२०१६).