कॅड प्रतिकृती आणि सीएनसी यंत्र भाग.

(कॅम; CAM). संगणकीय प्रक्रिया. कॅम भौतिकीय अभिकल्पांच्या माहितीचा वापर करून स्वयंचलित यंत्रांना नियंत्रित करते. कॅम प्रणाली संगणकीय अंकीय नियंत्रक (Computer Numerical Control; CNC; सीएनसी) किंवा थेट अंकीय नियंत्रक (Direct Numerical Control; DNC; डिएनसी) या प्रणाल्यांशी संबंधित आहे. सीएनसी आणि डिएनसी या प्रणाल्या जुन्या अंकीय नियंत्रकापेक्षा (Numerical Control; NC; एनसी) फार वेगळ्या आहेत. अंकीय नियंत्रकात भौतिकीय माहितीचे यांत्रिकरित्या सोप्या भाषेत रूपांतर होत असे, तर कॅड (संगणकसाधित अभिकल्प; CAD) आणि कॅम संगणक आधारित पद्धतीचा वापर करून भौतिकीय माहितीचे सोप्या भाषेत रूपांतर करीत असल्याने अभिकल्प आणि उत्पादन या प्रक्रियांमध्ये उच्च प्रतीचे एकत्रीकरण करण्यात सहज शक्य झाले आहे.

कॅम हे एक उपयोजन तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे संगणक आणि यंत्रसामग्रीचा वापर स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी होतो. कॅम संगणकसाधित अभियांत्रिकी (Computer Aided Engineering; CAE; सीएई) चे उत्तराधिकारी असून बहुतेकदा कॅडसोबत वापरले जाते. संगणक उत्पादन (कॅम) हे यंत्र साधने आणि संबंधित भागांच्या निर्मिती नियंत्रित करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करते. कॅम तंत्रज्ञान संगणकाचा वापर नियोजन, व्यवस्थापन, वाहतूक आणि यांसह उत्पादन संयंत्रावरील सर्व प्रक्रियांमध्ये साहाय्य करण्यासाठी वापरू शकतात. पारंपरिकपणे, कॅमला अंकीय नियंत्रित (NC) संगणक आज्ञावली साधन मानले जाते, जेथे कॅडमध्ये तयार केलेल्या रेखांकित घटकांचे द्वि-आयामी (२D) किंवा त्रि-आयामी (३D) नमुना किंवा प्रतिकृती असतात [कॅड].

कॅम याचा उगम (Origin of CAM) : सीएई प्रणाली अंतर्गत असणाऱ्या कॅड या प्रणालीची तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निर्मिती करण्यात आली आणि त्यानुषंगाने कॅमची ‍निर्मिती करण्यात आली. पहिल्या टप्प्यांत स्वयंचलित अभिकल्प तयार करून संगणकीय प्रतिकृती तयार करण्यात आले. त्यामुळे पारंपरिक अभिकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेपेक्षा संगणकीय प्रतिकृतीतील मापदंडात त्वरीत दुरुस्ती अथवा थोडाफार बदल करून अभिकल्प सुधारता येणे सहज शक्य झाले आणि वेळेची बचत झाली.

दुसऱ्या टप्प्यात अभिकल्पाचे सदृशीकरणाद्वारे परीक्षण करणे आणि तिसऱ्या टप्प्यात अंकीय नियंत्रण तंत्रज्ञानाचा वापर करून अभिकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेपासून उत्पादन करण्याच्या प्रक्रियेपर्यंतचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यांच्या तंत्रज्ञानामुळे कॅड आणि कॅम या प्रणाल्यांमध्ये संबंध जोडण्यात आले.

फायदे आणि तोटे : कॅम तंत्रज्ञानामुळे कल्पकतेचे उत्पादनात रूपांतरण होऊन थेट अभिकल्प-कर्त्याच्या हातात नियंत्रणाचे तंत्र आले. उदा., १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात कॅम तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात सिलिकॉन चिपा विकसित करून परवडणारे संगणक आणि सूक्ष्मप्रक्रियांची (microprocessor) ‍निर्मिती करण्यात आली. मोठ्या कंपन्या ज्यात मोठ्या प्रमाणात कॅम तंत्रज्ञान वापरले जात असे, त्या कंपान्यापासून तर सर्व प्रकारच्या कंपन्यांपर्यंत कॅम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ज्यात कॅम तंत्रज्ञान वापरण्यात आले तेथे प्रक्रियांची व्याप्ती देखील विस्तृत झाली. पारंपरिक यंत्र साधनाच्या प्रक्रिया, जसे छापा मारणे (stamping), वेधन करणे (drilling), दळणे (milling), शाणन करणे (grinding) इ. प्रक्रियांसोबतच कॅड/कॅम तंत्रज्ञान ग्राहकांसाठी वापरण्याजोगे इलेक्ट्रॉनिकी, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, आकारीत प्लास्टिक आणि इतर उत्पादन इ. तयार करण्याच्या कंपन्यामध्ये वापरात आले. संगणकाचा वापर बर्‍याच उत्पादन प्रक्रिया-जसे रासायनिक प्रकिया-नियंत्रित करण्यासाठी केला जातो. अशा प्रक्रियांमधे कॅम स्पष्टपणे अधोरेखित होत नाही कारण नियंत्रित माहिती ही भौतिकीय मापदंडावर आधारित नसते.

अभिकल्प तयार करणे आणि त्याचे उत्पादन करणे या प्रक्रिया संकल्पनात्मकपणे विभक्त आहेत. तरीही उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप समजून घेऊन अभिकल्प तयार करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असते. उदा., अभिकल्प-कर्ता याला यंत्र भाग बनवल्या जाणार्‍या साहित्याचे गुणधर्म, त्या भागाचे आकार बदलू शकतील अशा विविध तंत्रे आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उत्पादनांचे प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे. कॅड आणि कॅम यांतील वैषम्य हेच की दोन्हीमधून मिळणारे संभाव्य फायदे वेगवेगळे आहेत आणि प्रणालीमध्ये ते एकत्र समजण्यात येते.

कळीचे शब्द : #कॅम #कॅड #सीएई #Cam #Cad #CAE

संदर्भ :

समीक्षक: विजयकुमार नायक