एक शोभिवंत सदापर्णी वृक्ष. रोहितक वृक्ष मिलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अमूरा रोहितक तसेच ॲफॅनामिक्सिस पॉलिस्टॅकिया आहे. तो मूळचा हिमालयाच्या पायथ्याच्या भागातील आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम व बिहार या राज्यांत आणि महाराष्ट्रात कोकण, पश्चिम घाट व पुणे जिल्ह्यालगतच्या पठारी भागांत तसेच दक्षिण भारतात तिनेवेल्लीच्या घनदाट वनात तो दिसून येतो. भारताखेरीज बांगला देश, म्यानमार आणि मलेशिया या देशांतील वनांत तो आढळतो.
रोहितक वृक्ष १५–१८ मी. उंच वाढतो. खोडाची साल करडी, पातळ आणि खरखरीत असते. फांद्यांच्या कोवळ्या भागांवर लव असते. पाने संयुक्त, एकाआड एक, मोठी, गुळगुळीत, चिवट, पिच्छाकृती (पिसासारखी विभागलेली) व विषमदली असतात. पर्णिकांच्या ४–८ जोड्या असून टोकाला एक पर्णिका असते. पर्णिका लहान देठाच्या, तळाशी काहीशा तिरप्या व गर्द हिरव्या असतात. फुले एकलिंगी आणि द्विलिंगी असून ती वेगवेगळ्या वृक्षांवर पावसाळ्यात येतात. नर-फुलोरा आणि मादी-फुलोरा पानांच्या बगलेत येत असून ते अनुक्रमे परिमंजरी आणि कणिश प्रकारचे असतात. नर-फुले अनेक, ०·४ सेंमी. लांब व सहपत्री (तळाशी सूक्ष्म उपांगे असलेली) असतात. दले (पाकळ्या) तीन व सुटी असून त्या निदलांपेक्षा मोठ्या असतात. पुंकेसर सहा असून ती एकमेकांशी जुळलेली असतात. मादी-फुले नर-फुलांपेक्षा मोठी असून निदल आणि दले नर-फुलांप्रमाणे असतात. अंडाशय रोमश, ऊर्ध्वस्थ व तीन कप्प्यांचे असून कुक्षी तीन असतात. शुष्क फळे (बोंडे) ३·८–५ सेंमी. व्यासाची व गोलसर असून पिकल्यानंतर पिवळी होतात व ती हिवाळ्यात येतात. फळाची साल चिवट व गुळगुळीत असून ते तडकल्यावर त्याची तीन शकले होतात. प्रत्येक शकलात एक काळे तपकिरी बी असते आणि त्या प्रत्येकावर शेंदरी रंगाचे मगजयुक्त बाह्यकवच असते.
रोहितक वृक्षाची साल स्तंभक असून सुजलेल्या ग्रंथींवर आणि यकृत व प्लीहा यांच्या विकारांवर देतात. लाकूड वजनाने हलके असल्यामुळे त्याचा उपयोग तक्ते, चहाच्या पेट्या, होडी, नाव इत्यादी तयार करण्यास उपयोगी असते. बियांमध्ये तेल असते. संधिवातावर ते लावतात. तसेच दिव्यात जाळण्यासाठी वापरतात.
छान! चांगली माहिती मिळाली.