बरान, पॉल अलेक्झांडर (Baran, Paul Alexander) : (२५ ऑगस्ट १९०९ – २६ मार्च १९६४). प्रसिद्ध अमेरिकन मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ. बरान यांचा जन्म युक्रेन (रशिया) येथे झाला. त्यांचे शिक्षण जर्मनीत झाले. बर्लिन विद्यापीठातून त्यांनी ‘आर्थिक नियोजन’ या विषयात संशोधनपर प्रबंध सादर करून इ. स १९३३ मध्ये पीएच. डी. ही पदवी मिळविली. नाझी राजवटीत त्यांचे पोलंड – जर्मनी – रशिया येथे वास्तव्य होते. नंतर त्यांनी इ. स. १९३९ मध्ये अमेरिकेत स्थलांतर केले आणि इ. स. १९४१ मध्ये हार्वर्ड विद्यापीठाची एम. ए. ही पदवी प्राप्त केली. त्यांनी अमेरिकेमध्ये प्रशासनाच्या विविध खात्यांमध्ये काम केले. काही काळ ते गालब्रेथ यांचे सहकारी होते. फेडरल रिझर्व बँक ऑफ न्यूयॉर्क येथेही त्यांनी काही दिवस काम केले. इ. स. १९४९ मध्ये ते स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

बरान यांची मार्क्सिस्ट विचारवंत म्हणून गणना होते. ते नवमार्क्सियन अर्थशास्त्रातील तज्ज्ञ मानले जातात. अर्थशास्त्रातील अनेक संकल्पनांची त्यांनी मार्क्सिस्ट दृष्टीकोनातून पुनर्मांडणी केली. या कारणाने त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आणि लक्षणीय मानण्यात येते. उदा., मार्क्सच्या ‘अतिरिक्त मूल्य’ या संकल्पनेचा त्यांनी विस्तार केला व ‘आर्थिक वाढावा’ अशी संकल्पना नव्याने मांडली. प्रत्यक्ष आर्थिक वाढावा, संभाव्य आर्थिक वाढावा आणि नियोजित आर्थिक वाढावा अशा संकल्पना त्यांनी विशद केल्या. आर्थिक विकास आणि प्रगतीसाठी त्यांनी नियोजित समाजवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. या अर्थव्यवस्थेस पर्याय नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. लेख, व्याख्याने, पुस्तके, पत्रके, पत्रव्यवहार, निबंध अशा माध्यमांमधून त्यांचे विचार जनतेपर्यंत पोचत असत.

बरान यांनी १९५७ मध्ये लिहिलेले द पोलिटिकल इकॉनॉमी ऑफ ग्रोथ हे पहिले पुस्तक फार प्रसिद्ध झाले. जगातील देशांची विभागणी श्रीमंत आणि गरीब देश अशी झालेली आहे. कच्चा माल आणि हुकमी बाजारपेठ यांसाठी श्रीमंत देश गरीब देशांवर अवलंबून असतात. या व्यवहारात गरीब देशांमधील अतिरिक्त मूल्य श्रीमंत देश बळकावतात, असे त्यांनी सिद्ध केले. श्रीमंत देशांच्या या भूमिकेला त्यांनी परावलंबी भांडवलशाही असे म्हटले. गरीब देशांनी जर आपल्या अतिरिक्त मूल्याचा व्यवस्थित वापर केला, तर त्यांचे मागासलेपण दूर होईल असे त्यांचे निदान होते. यांव्यतिरिक्त अनेक मुद्द्यांची मांडणी त्यांनी आपल्या या पुस्तकात केली आहे.

बरान यांनी प्रसिद्ध मार्क्सिस्ट अर्थतज्ज्ञ पॉल स्विझी यांच्या बरोबर सहलेखन केलेले मोनोपोली कॅपिटल हे त्यांचे दुसरे गाजलेले पुस्तक होय. या पुस्तकाचे प्रकाशन बरान यांच्या मृत्युनंतर म्हणजे १९६६ मध्ये झाले. या पुस्तकाचे उपशीर्षक ‘अमेरिकेच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवरील भाष्य’ असे होते. विसाव्या शतकात व विशेष करून दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची आर्थिक – व्यापारी – लष्करी सत्ता जगात वेगाने पसरत गेलेली दिसते. हा भांडवलशाहीचा एक वेळ संख्यात्मक विजय मानता येईल; पण तेथे स्पर्धा, सर्वांना समान संधी असे घडून येण्याऐवजी बलाढ्य मक्तेदारी कंपन्यांचेच साम्राज्य निर्माण झाले. विषमता, अस्थिरता, तेजी-मंदीचे मोठे चढउतार, पिळवणूक यांचा अनुभव मोठ्या प्रमाणावर येत राहिला, असे या पुस्तकात साधार मांडण्यात आले आहे. गुन्हेगारी, नैराश्य, आत्महत्या, रोगराई, निरक्षरता, बेरोजगारी, मलीन वस्त्यांची बेसुमार वाढ, बकाल शहरे, गरिबी यांचा अनुभव अमेरिकेतही येत राहिला. सर्वमान्य आर्थिक आणि सामाजिक निकष पाहता तेथे आयुष्याची गुणवत्ता खालावलेलीच आहे, असा त्यांचा निष्कर्ष होता.

बरान यांचा पुस्तक-निबंध-नैमित्तिक लेखन यांसह मंथली रिव्ह्यू या मार्क्सवादी – समाजवादी विचारांना वाहिलेल्या अमेरिकेतील मासिकाच्या संपादन कार्यामध्ये इ. स. १९४९ पासून सहभाग होता. बरान आणि स्विझी यांचा इ. स. १९४९ ते १९६४ या कालखंडातील पत्रव्यवहार द एज ऑफ मोनोपोली कॅपिटल या पुस्तकरूपाने २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. बरान यांच्या मृत्युनंतर पॉल ए बरान :ए कलेक्टिव्ह पोर्ट्रेट हे पुस्तक स्विझी आणि लेओ हुबरमान यांनी संपादित करून मार्च १९६५ मध्ये प्रसिद्ध केले. यामध्ये बरान यांचे निवडक लिखाण, त्यांचे व्यक्तित्व – कार्य विशद करणारे निबंध व त्यांच्या सर्व लेखनाची सूची यांचा समावेश आहे. यांव्यतिरिक्त बरान यांनी मार्क्सिजम अँड सायकोॲनॅलिस (१९६०), रिफ्लेक्शन ऑन द क्युबन रिव्होल्युशन (१९६१) ही पुस्तके लिहिली आहेत.

बरान यांचे पालोआल्टो, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.

समीक्षक : अवधूत नाडकर्णी