एक सस्तन प्राणी. लांडग्याचा समावेश स्तनी वर्गाच्या कॅनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस आहे. कुत्रा, लांडगा, खोकड व कोल्हा हे सर्व प्राणी कॅनिडी कुलात मोडतात. उत्तर अमेरिका, यूरोप, आशिया आणि आफ्रिका या ठिकाणी निर्मनुष्य व ओसाड प्रदेशात लांडगा आढळतो. जगात वेगवेगळ्या ठिकाणी कॅ. ल्युपस जातीच्या सु. ३७ उपजाती आढळतात. भारतात लांडग्यांच्या तीन उपजाती आढळतात: (१) कॅ. ल्युपस पॅलिपीस (भारतीय लांडगा), (२) कॅ. ल्युपस चँको (तिबेटी लांडगा) आणि (३) कॅ. ल्युपस ल्युपस (यूरोपियन लांडगा). त्यांपैकी भारतीय लांडगा ही उपजाती भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते. तिचा प्रसार दक्षिण व पश्चिम आशियातील हिमालयाच्या दक्षिण भागापासून पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, संयुक्त अरब अमीराती राज्ये, ओमान, येमेन, सिरिया, टर्की, इझ्राएल, ईजिप्त इत्यादी ठिकाणी झालेला दिसून येतो. भारतात लांडग्याची आणखी एक प्रकारची जाती कॅ. हिमालयेन्सिस (हिमालयीन लांडगा) या नावाने ओळखली जात असून ती अल्प संख्येने आढळते.
भारतीय लांडगा आणि यूरोपीयन लांडगा दिसायला जरी सारखे असले, तरी भारतीय लांडगा आकाराने लहान असतो. त्याच्या शरीराची लांबी ९०–१०५ सेंमी., शेपूट ३५–४० सेंमी. लांब व खांद्यापाशी उंची ६५–७५ सेंमी. असते. भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगा भुरकट तांबूस ते फिकट तपकिरी रंगाचा असून त्याच्या छातीचा व पोटाचा रंग पांढरा किंवा फिकट असतो. त्याच्या अंगावर लहान-मोठे काळे ठिपके असतात. खांद्यावर गडद रंगातील ‘V’ अशा आकाराची खूण आढळते. जबडा लांब असून सुळे तीक्ष्ण असतात. शरीरापेक्षा पाय फिकट रंगाचे असून पोटाकडचा भाग पूर्णपणे पांढरा असतो.
सर्व लांडग्यांच्या सवयी बहुधा सारख्याच असतात. ते जोडीजोडीने अथवा टोळ्यांनी राहतात आणि शिकार करतात. उंदीर, घुशी, ससे, हरणे इत्यादींचा त्यांच्या भक्ष्यात समावेश होतो. क्वचित प्रसंगी ते मनुष्यवस्तीत शिरून गुरांवर व पाळीव जनावरांवर हल्ला करतात, तर कधीकधी ते लहान मुलेही पळवितात. भुकेलेला लांडगा वाटेल त्या प्राण्यांवर क्रूरपणे हल्ला करून भक्ष्य मरण्याची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातो. बुद्धी, शक्ती व युक्ती यांचा मिलाप त्याच्या ठिकाणी झालेला आढळतो. कृषिसंस्कृतीच्या उदयापासून मानव, त्याचे पाळीव प्राणी व मोठे शिकारी प्राणी यांना लांडगा हा धोकादायक प्राणी ठरला आहे. त्यामुळे त्यांची बेसुमार हत्या करण्यात आली आहे.
लांडग्यामध्ये नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. त्यांच्या प्रजननाचा काळ पावसाळा संपत असताना सुरू होतो. गर्भावधी ६०–६३ दिवसांचा असून पिले डिसेंबरमध्ये जन्मतात. एका वेळी ३–९ पिले जन्माला येतात. जन्माच्या वेळी पिलांचे डोळे बंद असून ते १४ दिवसांनंतर उघडले जातात. नर-मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेतात. तीन वर्षांत पिलांची पूर्ण वाढ होते. नैसर्गिक अधिवासात लांडगा १२–१५ वर्षे जगतो.
वन्य लांडग्याच्या मादीचा पाळीव नर कुत्र्याशी संयोग होतो व त्यांच्यापासून प्रजननक्षम संकरित प्रजा निर्माण होते. हजारो वर्षांपूर्वी मानवी वस्त्यांजवळ येऊन राहिलेल्या वन्य लांडग्यांपासून पाळीव कुत्र्यांचे संकर तयार झाले आहेत.
डीएनए चाचणीच्या अभ्यासातून असे आढळले आहे की, हिमालयीन लांडगे सु. ८ लाख वर्षांपूर्वी तिबेटी लांडग्यांपासून वेगळे झाले. सध्या सु. ३५० हिमालयीन लांडगे नैसर्गिक अधिवासात, तर सु. २१ विविध प्राणिसंग्रहालयात आहेत. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीर या राज्यांत ते आढळतात. भारतातील प्राणिवैज्ञानिकांनी त्यांचा समावेश चिंताजनक लुप्तप्राय जातीमध्ये करावा असे सुचविले आहे. भारतीय लांडग्यांची संख्या २,०००–३,००० असून ते गुजरात, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांत आढळतात. ते हिमालयीन लांडग्यांहून वेगळे आहेत. सु. ४ लाख वर्षांपासून त्यांच्यात आंतरसंकर झालेला नसल्याने या दोन्ही जातींना स्वतंत्र उपजाती मानून त्यांना कॅ. ल्युपस इंडिका व कॅ. ल्युपस हिमालयेन्सिस अशी शास्त्रीय नावे द्यावीत, असे सुचविले गेले आहे. १९७२ सालच्या वन्य जीवांचे रक्षण या कायद्यानुसार भारतात लांडग्यांना संरक्षण देण्यात आले असून त्यांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे.
Good