कौल, मणि : (२५ डिसेंबर १९४४ – ६ जुलै २०११). जागतिक ख्यातीचे आणि समांतर शैलीचे चित्रपट बनविणारे श्रेष्ठ भारतीय चित्रपट दिग्दर्शक. त्यांचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे झाला. कौल यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण राजस्थानातच झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (Film and Television Institute of India) अभिनयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला; मात्र तेथे प्रतिभावंत बंगाली दिग्दर्शक व लेखक ऋत्विक घटक यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी विषय बदलून दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम स्वीकारला. तेथे शिकत असताना त्यांनी यात्रिक हा पहिला लघुपट दिग्दर्शित केला (१९६७). १९६९ साली त्यांनी हिंदी लेखक मोहन राकेश यांच्या कथेवर आधारित उसकी रोटी हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात कौल यांनी चित्रपटाच्या पारंपरिक संकल्पनेपेक्षा अगदी नव्या दृष्टीने या माध्यमाचा विचार केला. गोष्ट सांगण्यापेक्षा काळ आणि अवकाश, तसेच दृश्य आणि ध्वनी यांच्यातले संबंध शोधणारा हा चित्रपट भारतीय समांतर चित्रपटांच्या प्रवाहाचा उद्गाता मानला जातो. मोहन राकेश यांच्याच आषाढ़ का एक दिन या नाटकावर त्यांनी १९७२ साली त्याच नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटात त्यांनी नाटक आणि चित्रपट या माध्यमांच्या नात्याचा शोध घेतला. कौल यांनी या चित्रपटातले संवाद चित्रिकरणाआधीच अभिनेत्यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करून घेतले होते. या चित्रपटाच्या दृश्यरचनेसाठी त्यांनी कांग्रा चित्रशैलीचा संदर्भ घेतला. उसकी रोटी व आषाढ़ का एक दिन या दोनही चित्रपटांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा समीक्षक पुरस्कार मिळाला.
कौल यांचा तिसरा चित्रपट दुविधा (१९७३) हा राजस्थानी लेखक विजयदान देथा यांच्या कथेवर आधारित होता. हा कौल यांचा पहिला पूर्ण लांबीचा रंगीत चित्रपट. राजस्थानी लोककथेचे पुनर्कथन असलेल्या या चित्रपटाची दृश्यरचना तसेच रंगसंयोजन यासाठी कौल यांनी जम्मू काश्मीरच्या बसोली लघुचित्रशैलीचा आधार घेतला. या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना एका व्यापाऱ्याच्या पत्नीवर तेथील एक भूत लुब्ध होते, आणि तिच्याबरोबर व्यापाऱ्याच्या वेश घेऊन संसार करते अशी आहे. या चित्रपटासाठी कौल यांना १९७३ या वर्षीचा उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे या चित्रपटास फिल्मफेअरचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा समीक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा चित्रपट जगभरातील चित्रपट महोत्सवांमधून वाखाणला गेला.
सतह से उठता आदमी (१९८०) या चित्रपटात कौल यांनी सुप्रसिद्ध हिंदी कवी, लेखक आणि समीक्षक गजानन माधव मुक्तिबोध यांची एक कथा आणि दोन निबंधांचा वापर केला. औद्योगिकीकरणातून निर्माण होणारी यांत्रिकता, त्यातून होणारा नैतिकतेचा ऱ्हास आणि या ऱ्हासशील समाजातील कलावंताचे स्थान यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटासाठी कौल यांनी सतत चल असणाऱ्या कॅमेऱ्याच्या हालचालीतून पुस्तकाची पाने उलटल्याचा आभास निर्माण केला होता.
महान रशियन कादंबरीकार फ्यॉडर डॉस्टोव्हस्की यांच्या द मीक वन (The Meek One) आणि द इडियट ( The Idiot) या दोन साहित्यकृतींवर कौल यांनी अनुक्रमे नजर (१९९१) आणि अहमक (इडियट, १९९२) हे चित्रपट केले. या दोनही चित्रपटांमध्ये मूळ साहित्यकृतींशी प्रामाणिक राहून कौल यांनी चित्रपटमाध्यमातून त्यांचा शोध घेतला. इडियट या चित्रपटास फिल्मफेअरचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा समीक्षक पुरस्कार मिळाला.
कौल यांनी १९९९ साली हिंदी लेखक विनोदकुमार शुक्ल यांच्या नौकर की कमीज या बहुचर्चित कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाचे चित्रिकरण करताना त्यांनी ठरवून रचलेल्या दृश्यांमध्ये येणारी कृत्रिमता त्यांना टाळायची होती म्हणून एकदाही कॅमेऱ्यातून दृश्य पाहिले नाही.
मणि कौल यांनी माहितीपटाची रूढ संकल्पना विस्तारणारे माहितीपट बनवले. केवळ एखाद्या विषयाची परिणामकारक माहिती देणे, या उद्देशापलिकडे जाऊन चित्रपट आणि माहितीपट यांच्यातल्या सीमा निरर्थक ठरवणाऱ्या काव्यात्म माहितीपटांची निर्मिती त्यांनी केली. १९७४ साली त्यांनी फिल्मस् डिव्हिजनसाठी बनवलेल्या नोमाड पपेटीअर्स (Nomad Puppeteers) या माहितीपटात औद्योगिकीकरणामुळे आणि विशेषतः चित्रपटांमुळे होत असलेला लोककलांचा ऱ्हास चित्रित केला. चित्रकथी (१९७७) या माहितीपटामध्ये कोकणातील चित्रकथी ही लोककला सादर करणारे कलावंत आणि त्यांचा अवकाश यांचा संबध शोधला. त्याचप्रमाणे या कलेचे चित्रपटाशी असलेले नातेही अधोरेखित केले. आगमन (इं. शी. Arrival, १९८०) या माहितीपटाच्या माध्यमातून पोटासाठी गावांतून शहरांकडे स्थलांतरित होणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे अतिशय परिणामकारतेने समोर येते. यात पारंपरिक माहितीपटातला निवेदकाचा आवाज पूर्णपणे टाळून कौल यांनी केवळ स्थानिक आवाजांचा अर्थपूर्ण वापर केलेला आहे.
भारतीय अभिजात संगीतात कौल यांना रस होता. त्यांनी स्वतः ध्रुपद या संगीतप्रकाराचे शिक्षण घेतले होते. संगीत आणि इतर कलांचे संबंध हा आयुष्यभर त्यांच्या चिंतनाचा विषय होता. या चिंतनातून ध्रुपद (१९८२) आणि सिद्धेश्वरी (१९८९) या दोन माहितीपटांचा निर्मिती झाली. ध्रुपद या माहितीपटामध्ये ध्रुपद या संगीतप्रकाराचे मोगल वास्तुरचनेशी असलेले नाते अधोरेखित केलेले आढळते, तर सिद्धेश्वरी या माहितीपटामध्ये ठुमरी आणि बनारसच्या गल्ल्या यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे. या चित्रपटास उत्कृष्ट माहितीपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. माटी मानस (१९८५) या माहितीपटातून कल्पित पात्रे आणि प्रसंगांची वास्तवाशी सांगड घालून मातीच्या भांड्यांच्या रूपकातून मानवी संस्कृतीचा इतिहास उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न कौल यांनी केला.
उसकी रोटी या पहिल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटापासूनच मणि कौल यांनी चित्रपटनिर्मितीचे रूढ संकेत धुडकावून लावले. घटनाप्रधानता, तीन अंकी रचना, संघर्षजन्य नाट्यातून केलेली उत्कंठानिर्मिती या संकेतांना कौल यांनी आपल्या चित्रपटांतून जाणीवपूर्वक वगळले. गोष्ट सांगण्यापेक्षा गोष्टीतील काही विविध अवस्था साकारण्यात त्यांना रस होता. चित्रपटातल्या पात्रांवर अवकाश आणि काळ यांचा होणारा परिणाम व्यक्त कसा करायचा, हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. ते चित्रपटाला दृक्-श्राव्य माध्यम न मानता कालबद्ध (Temporal) माध्यम मानत. त्यांच्या जीवनदृष्टीवर फ्रेंच दिग्दर्शक रोबेर ब्रेसाँ (Robert Bresson), मध्ययुगीन काश्मीरी तत्वचिंतक आनंदवर्धन, उत्तर हिंदुस्थानी तसेच पाश्चिमात्त्य अभिजात संगीत, चित्रकला, शिल्पकला, जागतिक साहित्यातले डॉस्टोव्हस्कीसारखे लेखक इत्यादींचे अनेक संस्कार झाले. या संस्कारांतूनच त्यांचे चित्रपट आकाराला आले; मात्र त्या चित्रपटांवर मणि कौल यांचा स्वतःचा स्पष्ट ठसा आहे.
समीक्षक : संतोष पाठारे