(लाइम). लिंबू हा रूटेसी कुलाच्या सिट्रस प्रजातीतील मध्यम उंचीचा वृक्ष आहे. ईडलिंबू, पपनस, महाळुंग, मोसंबे, संत्रे व चकोतरा या वनस्पतीही याच प्रजातीतील आहेत. सिट्रस प्रजातीत प्रमुख चार जाती असून त्यांच्यातील नैसर्गिक तसेच कृत्रिम संकरामुळे अनेक जाती अस्तित्वात आल्या आहेत. सिट्रस प्रजातीतील आंबट फळाच्या वर्गात ‘लाइम’ व ‘लेमन’ असे दोन प्रकार आहेत. भारतात लागवडीखाली असलेल्या कागदी लिंबाचा समावेश लाइममध्ये होतो, तर ईडलिंबू व गलगल यांचा समावेश लेमनमध्ये होतो.
कागदी लिंबू : याचे शास्त्रीय नाव सिट्रस ऑरॅन्टिफोलिया आहे. सिट्रस प्रजातीतील प्रमुख जातींपैकी ही एक जाती आहे. ही वनस्पती मूळची भारतातील असून तिचा प्रसार ईजिप्त, मेक्सिको, वेस्ट इंडीजपर्यंत झालेला आहे. अरब लोकांनी या वनस्पतीचा प्रसार इटली व स्पेन येथे केला. सन १४९३ मध्ये इटालियन खलाशी क्रिस्तोफर कोलंबस याने अमेरिकेत प्रथम लिंबाची लागवड केली. सतराव्या शतकाच्या अखेरीस स्पेनमधील मिशनऱ्यांनी लिंबाची लागवड कॅलिफोर्नियात केली, तर अठराव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत लिंबाची व्यापारी लागवड करण्यास सुरुवात झाली.
लिंबू हा काटेरी वृक्ष असून त्याची उंची ३–६ मी. असते. त्याच्या मुख्य खोडाला खालपासून भरपूर फांद्या येतात. पाने संयुक्त, हस्ताकृती व एकपर्णी असून पानांचा आकार पंखाप्रमाणे असतो. पानांच्या कक्षामध्ये काटा असतो. पर्णदल अंडाकृती असून २–८ सेंमी. लांब आणि १.५–३ सेंमी. रुंद असते. त्यावर अनेक तैलग्रंथी असतात. फुले लहान, नियमित व द्विलिंगी असतात. निदलपुंज हिरवे व ४-५ मुक्त दलांचे असते; दलपुंज पांढरे व ४-५ मुक्त दलांचे असते. फुलात ८–१० पुंकेसर असून एका गोल मंडलावर रचलेले असतात. जायांग ऊर्ध्वस्थ व अनेक, संयुक्त अंडपीचे बनलेले असते. फळ मृदुफळ, नारंगक (संत्र्यासारखी रचना असलेले) व रसाळ असून त्यात ८–१० बिया असतात. फळाची साल पातळ, चकचकीत व गराला घट्ट चिकटलेली असते.
साखर लिंबू : याचे शास्त्रीय नाव सिट्रस लायमेटिऑइडिस असून इंग्रजीत त्याला ‘स्वीट लाइम’ म्हणतात. भारतात मुख्यत: हा प्रकार लागवडीखाली आहे. ते वेड्यावाकड्या फांद्यांचे झुडूप असून त्याची पाने मोसंब्याच्या पानांएवढी परंतु फिकट हिरवी असतात. फुले मोठी व पांढरी असतात. फळ गोलाकार, गुळगुळीत, फिकट पिवळे किंवा हिरवट रंगाचे असते. त्यातील गर गोडसर परंतु बेचव असून त्यात आंबटपणा नसतो.
ईडलिंबू : याचे शास्त्रीय नाव सिट्रस मेडिका प्रकार लिमोनम असून ही संकरित जाती आहे. सिट्रस मॅक्झिमा आणि सिट्रस रेटिक्युलॅटा यांच्या संकरातून ही जाती निर्माण झाली आहे. तिची फळे मोठी असून त्यांची साल जाड असते. लोणची व मुरांबा करण्यासाठी ही फळे वापरतात. ईडलिंबूमध्ये औषधी गुणधर्म आहेत, असा उल्लेख आयुर्वेदात आहे. मात्र फळाच्या सालीमध्ये टायरॅमिन नावाचे घातक संयुग असते. त्यामुळे ईडलिंबू मोठ्या प्रमाणात खाल्ले जात नाही. या जातीला ‘जंबुरी’ असेही म्हणतात. सिट्रस लेमॉन या जातीत ईडलिंबू व गलगल यांचा समावेश होत असला तरी त्यांची वैशिष्ट्ये सामान्य लेमन (सि. लेमॉन) पेक्षा वेगळी आहेत.
लिंबाच्या रसामध्ये क-जीवनसत्त्व (ॲस्कॉर्बिक आम्ल) पुष्कळ प्रमाणात आणि कमी प्रमाणात सायट्रिक आम्ल असते. रस चवीला आंबट असतो. लिंबाच्या रसापासून सरबतासारखी पेये व फळांपासून लोणचे तयार करतात. जेली, मुरंबे व मध यांना स्वाद आणण्याकरिता लिंबाची फळे वापरतात. फळांच्या सालीमध्ये पेक्टीन भरपूर असते. मिठात मुरवलेली साल अपचनावर गुणकारी असते. बिया पांढऱ्या असून त्यांपासून तेल मिळते. हे तेल वंगण व खाद्य तेल म्हणून तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. क-जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणाऱ्या स्कर्व्ही या रोगाच्या उपचाराकरिता सिट्रस प्रजातीतील फळांचा समावेश आहारात मोठ्या प्रमाणात करतात.