महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राचीन लेणी. कल्याण व सोपारा या प्राचीन बंदरांपासून बोरघाटामार्गे तेर, पैठण आणि जुन्नर येथे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आणि कर्जतपासून (जि. रायगड) सु. १३ किमी. अंतरावर ही लेणी आहेत.

चैत्यगृह, कोंडाणे (जि. रायगड).

कोंडाणे लेणी या भाजे लेण्यांच्या समकालीन आहेत, असे मत पुरातत्त्वज्ञ फर्ग्युसन आणि बर्जेस यांनी मांडले आहे. हीनयान (थेरवाद) काळात कोरल्या गेलेल्या या लेण्यांमध्ये महायान काळातील स्थापत्य आणि कलेचा कोणताही प्रभाव दिसून येत नाही. हे लेणे इ. स. पू. दुसरे किंवा पहिले शतक या काळात खोदले असावे, असे शिलालेखांच्या अक्षरवाटिकेवरून वाटते.

या लेण्यांची पहिली नोंद सन १८३० मध्ये विष्णू शास्त्री यांनी आणि नंतर ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी लॉ साहेब यांनी घेतली. या लेण्यांविषयी विष्णू शास्त्री यांनी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष जॉन विल्सन यांना दिलेल्या वृत्तांताचा सारांश पुढीलप्रमाणे : कोंडाणे गावाजवळ लेणे फार चांगले आहे. येथील मुख्य ठिकाणी आत जाण्यासाठी मोठा दरवाजा आहे आणि त्याला लाकडाची कमान आहे. आत बुद्धाच्या देवस्थानाचा वाटोळा घुमट आहे आणि तो मुख्य सभामंडप वेहेरचे सभामंडपासारखा उंच आहे; व दरवाजाचे बाजूस बुद्धांच्या मूर्ती (यक्षमूर्ती) आहेत आणि त्या मूर्तीचे वरचे बाजूस एक ओळ अक्षरांची कोरलेली आहे, तिला अकरा किंवा बारा अक्षरे फार चांगली आहेत. याखेरीज अधिक अक्षरे लिहिलेली नाहीत. मुख्य सभामंडपाच्या शेजारी दुसरा लहान सभामंडप आहे. तसेच येथे जाण्याचा रस्ता फार अवघड आहे. येथे जायचे असल्यास चांगल्या रस्त्याने जावे, म्हणजे पालखीत बसून जाता येईल. पुढे जिथे चढाव आहे, तेथे घोड्यावर बसून गेले पाहिजे.

पश्चिमाभिमुख लेणीसमूहात एक चैत्यगृह, सात विहार, एक पाण्याचे कुंड आणि तीन शिलालेख आहेत. आजमितीस फक्त दोनच शिलालेखांची स्थाननिश्चिती झालेली आहे.

लेणे क्र. १ (मुख्य चैत्यगृह) : चैत्यगृह भव्य, रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. याचे विधान चापाकर असून छत गजपृष्ठाकार आहे. दोन मार्गिका आणि दालन अशी चैत्यगृहाची रचना आहे. चैत्यगृह सुमारे २२ मी. लांब, ८ मी. रुंद व ८.५ मी. उंच आहे. चैत्यगृहात असलेले ३२ स्तंभ अष्टकोनी, तळखडे आणि स्तंभशीर्ष नसलेले आहेत. चैत्यगृहातील चापाकार टोकाजवळ सु. २.९ मी. व्यासाचा स्तूप आहे. स्तूपाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असल्यामुळे त्यावरील कोरीवकामाबद्दल ठामपणे सांगता येत नाही. चैत्यगृहाच्या छताला असलेल्या तुळया नष्ट झालेल्या असल्या, तरी त्या बसवण्यासाठी खोदलेल्या खोबण्या दिसून येतात.

चैत्यगृहाच्या दर्शनी भागात दगडाची आणि लाकडाची पटल असावी, असे तेथे असलेल्या अवशेषांवरून वाटते. तसेच तेथे असलेल्या दोन लाकडी कमानी बहुधा द्वारशाखेच्या असाव्यात, असे पुरातत्त्वज्ञ पर्सी ब्राउन यांचे मत आहे. ही लाकडी कमान अंदाजे २,००० वर्ष जुनी असावी.

दर्शनी भागात गवाक्षे व वेदिकापट्टी यांचे कोरीवकाम केलेले आहे. चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस सात शिल्पपट कोरलेले असून त्यांत युगुलांची नृत्य करणारी शिल्पे कोरलेली आहेत. पुरुषांच्या हातात मुसळसदृश शस्त्र, धनुष्यबाण आणि ढाल इत्यादी आयुधे दिसून येतात. पुरुषनर्तक बहुधा योद्धे असावेत. लेण्याच्या वरच्या भागात छोट्या चैत्यकमानी कोरलेल्या आहेत.

चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील डावीकडच्या भिंतीवर भग्नावस्थेतील यक्षाचे शिल्प कोरलेले आहे. आज फक्त या यक्षाचा चेहराच आपल्याला दिसतो. याच्या फेट्यावर रेशमी वस्त्रातील बुट्टीसारखे सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे. या यक्षशिल्पाजवळ ‘कन्हाचा शिष्य बलक याने तयार केलेʼ या अर्थाचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे.

लेणे क्र. २ : चैत्यगृहाखालोखाल दुसरे महत्त्वाचे लेणे. हा विहार चैत्यकमानीच्या पातळीवर कोरलेला आहे. व्हरांडा, सभागृह आणि त्याच्या तिन्ही भिंतींमध्ये खोल्या अशी या विहाराची रचना आहे. व्हरांड्याच्या दर्शनी भागात पाच स्तंभ असावेत, पण स्तंभ नष्ट झाल्यामुळे त्यांचा आकार कसा होता, हे कळून येत नाही. फक्त या स्तंभांचे स्तंभशीर्ष सुरक्षित राहिले आहेत. दीर्घिकेच्या मागील भिंतीत सभागृहाचे प्रवेशद्वार आणि खिडक्या आहेत. भिंतीचा खालचा भाग नष्ट झालेला आहे. सभागृहात १५ खांब होते. पण सद्यस्थितीत फक्त स्तंभशीर्ष सुरक्षित राहिले आहेत.

सभागृहात तिन्ही भिंतीत प्रत्येकी सहा याप्रमाणे एकूण १८ खोल्या आहेत. उजव्या व डाव्या बाजूच्या पहिल्या दोन खोल्यांमध्ये दोन दगडी बाक असून इतर खोल्यांमध्ये फक्त एक दगडी बाक आहे. खोल्यांची प्रवेशद्वारे अरुंद आणि द्वारशाखाविरहीत आहेत. दीर्घिका आणि सभामंडप यांचे छत सपाट आहे. छताला दगडात कोरलेल्या तुळया आणि त्यांना काटकोनात छेदणारे जोड यांच्यामुळे छत लाकडी असल्याचा भास होतो. या विहारातील काही खोल्या नंतर खोदण्यात आल्या असाव्यात, असे त्यांच्या खोदकामावरून वाटते. तिन्ही बाजूंना असलेल्या प्रवेशद्वारांवर वेदिकापट्टी आणि चैत्यकमानींचे कोरीवकाम केले आहे.

दीर्घिकेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर चार अर्धस्तंभ आणि त्याच्यावर वेदिकापट्टी कोरलेली असून त्यांच्यावर अर्धउठावातील प्रमाणबद्ध स्तूप कोरलेला आहे. स्तूपाच्या भोवती पिंपळपानाकर चैत्यकमान कोरलेली आहे. स्तूपाच्या वर हर्मिका आणि यष्टी कोरलेली आहे. अर्धउठावात असलेला हा स्तूप बहुधा चैत्यगृहात असलेल्या स्तूपाचीच प्रतिकृती म्हणून विहारात कोरण्यात आला असावा. पण स्तूपाच्या अधिष्ठानावर चौकोनी खोबणी कोरण्यात आलेली आहे. ही खोबणी पवित्र वस्तू ठेवण्यासाठी कोरलेली असावी आणि त्यामुळे हा स्मृतिस्तूप असावा, असा वेगळा अंदाजही लावता येतो.

विहाराच्या दर्शनी भागात दोन टप्प्यांत कोरीवकाम केले आहे. पहिल्या टप्प्यात पायऱ्या पायऱ्यांची नक्षी आणि वेदिकापट्टी कोरलेली आहे. याच टप्प्यावर असलेल्या खालच्या पट्टीवर दोन ओळींचा ‘बरकस येथे राहणारा कुचिकाचा पुत्र ह(ध)मयक्ष याने पार्श्वभागातील दान दिलेʼ  या अर्थाचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे.

विहाराच्या कोरीवकामाचा दुसरा टप्पा थोडासा पुढे आलेला आहे. या टप्प्यात वेदिकापट्टी आणि त्याच्यावर सहा चैत्यकमानी कोरलेल्या आहेत.

याच लेण्याच्या दीर्घिकेच्या डाव्या बाजूला दोन खोल्या असलेले उपलेणे आहे. हे उपलेणे मुख्य विहारानंतर कोरण्यात आलेले असावे.

लेणे क्र. ३ : मुख्य विहारात असलेल्या उपलेण्याला लागून हे लेणे आहे. या लेण्यात असलेल्या सभागृहाच्या भोवती तिन्ही बाजूंना मिळून आठ खोल्या आहेत. दर्शनी भागात प्रवेशद्वार आणि दोन खिडक्या आहेत. कोणतेही नक्षीकाम नसलेल्या या लेण्याची बरीच पडझड झालेली आहे.

लेणी क्र. ४ : लेणे क्र. ३ ला लागून हे लेणे आहे. या लेण्यात दोन खोल्या असून त्यात प्रत्येकी दोन ओटे आहेत.

लेणे क्र. ५ ते ७ : यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.

लेणे क्र. ८ : हे लेणे डाव्या बाजूच्या कोपऱ्यात आहे. या लेण्याच्या सभागृहात डाव्या आणि उजव्या भिंतींलगत कमी उंचीचा बाक आहे. पाठीमागील भिंतीत एक खोली आहे. या खोलीत डाव्या बाजूला दगडी बाक आहे. या खोलीच्या अंतर्भागात आणखी एक छोटी खोली आहे. या लेण्यातील सभागृहाचा उपयोग भोजनमंडप म्हणून, तर छोट्या खोलीचा उपयोग धान्यकोठार म्हणून होत असावा. या लेण्याच्या जवळ लेणीसमूहातील एकमेव विस्तीर्ण पाण्याचे कुंड आहे.

लेणीसमूहातील चैत्यगृह आणि मुख्य विहार इ. स. पू. काळातील असून इतर लेणी नंतरच्या काळातील आहेत. बोरघाटातून होणारी व्यापाऱ्यांची वाहतूक कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडून या लेण्यांना मिळणारा आश्रय कमी झाला व त्यामुळे या लेण्यांचे महत्त्व कमी झाले. त्यामुळे त्या नजीकच्या काळात विस्मृतीत गेल्या.

संदर्भ :

  • Fergusson, J. & Burgess, J., The Cave Temples of India, Oriental Books Reprint, Delhi, 1969.
  • Gupchup, V., ‘Kondaneʼ, Journal of the Asiatic Society of Bombay, Vol. 38, pp. 174-184, 1963.
  • Mokashi, R. & Samel, P. V., ‘Brahmi Inscriptions from Kondane Cavesʼ, Ancient Asia, 8: 3, pp. 1–7, 2017.
  • Nagaraju, S., Buddhist Architecture of Western India c. 250 BC – c. 300 AD., Agam Kala Prakashan, Delhi, 1981.
  • Qureshi, D., Rock Cut Temples of Western India, Bhartiya Kala Prakashan, Delhi, 2010.

                                                                                                                                                                              समीक्षक : मंजिरी भालेराव