पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरातील ‘मानमोडी’ टेकडीवरील प्रसिद्ध बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. जुन्नरच्या आग्नेयेस सु. २ किमी. अंतरावर मानमोडी डोंगराची सु. ३ किमी. लांबीची रांग आहे. त्यात सुरुवातीस भीमाशंकर, मधल्या भागात अंबा-अंबिका व शेवटी भूतलिंग (भूत) लेणी-समूह खोदले आहेत. या टेकडीवर पूर्ण-अपूर्ण मिळून ६८ लेणी, ३८ पोढी (पाण्याची टाकी किंवा हौद) व २१ ब्राह्मी शिलालेख आहेत. यांतील महत्त्वाच्या लेणींना अभ्यासकांनी १ ते ४९ असे क्रम दिले आहेत.

भीमाशंकर लेणी-समूह : या समूहात महत्त्वाच्या १७ लेणी असून इतर आठ अपूर्ण लेणी आहेत. त्यातील लेणे क्र. २ हे चैत्यगृह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात १३ पोढीही आहेत. लेणे क्र. १ च्या दर्शनी भागात, मध्यभागी दोन स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत तीन खोल्या आहेत.

लेणे क्र. २. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाची उंची १२.२० मी., रुंदी ६.१० मी. असून, हे दोन भागांत विभागले आहे. लेण्याच्या ओसरीत पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूंस दोन स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. स्तंभांस खाली कलश नसून ते दगडी बाकावर आधारित आहेत. बाकांस आतील बाजूने पाठ टेकण्यास कक्षासने व बाहेरील बाजूस वेदिकापट्टी कोरल्या आहेत.

चैत्याच्या वरील भागात अर्धगोलाकार असलेला अपूर्ण चैत्यगवाक्ष असून त्यास बाहेरील बाजूने पिंपळाच्या पानासारखा आकार दिलेला नाही. तसेच हा भाग नेहमीप्रमाणे आरपारही खोदला गेला नाही, त्यामुळे या संपूर्ण भागास ‘आभासी चैत्यगवाक्ष’ संबोधले जाते. याच्यापुढे लहानसा सज्जा आहे.

चैत्यगृहाच्या आतील मंडप काटकोनात असून त्यास सपाट छत आहे. या छतावर व ओसरीतील छतावर मातीच्या गिलाव्यांचे अवशेष दिसतात. मागील भिंतीत उभ्या काटकोनात मागील भिंतीपासून वेगळा असलेला दगड आहे. त्यात स्तूप कोरावयाचा असावा; परंतु यावर कालांतराने एक बसलेली ओबडधोबड स्त्री-मूर्ती कोरली गेली. या स्तूपाच्या बाजूस दोन लहान टाकी दिसतात. त्यांच्या मागील भिंतीत असलेल्या भेगांतून पाणी झिरपते व या टाक्यांत साठले जाते. बहुधा पाणी झिरपत असल्याने हे चैत्यगृह अपूर्ण राहिले असावे.

चैत्याच्या प्रांगणात उजव्या भिंतीवर व लेणे क्र. ३ च्या दरवाजावर एक शिलालेख असून त्यात लेण्यासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. वरील चैत्यानंतरची बरीच लेणी साधी असून ती डोंगराच्या चढ-उतारावर जिथे जागा सोयीची वाटली अशा ठिकाणी खोदली आहेत. यांतील एका पोढीस लेणे क्र. ५ दिला असून त्यावर पोढी दान दिल्याचा उल्लेख असणारा लेख आहे. पोढीपासून थोड्या अंतरावरील लेणे क्र. ७ हे अत्यंत सामान्य असले तरी त्याच्या डाव्या भिंतीवर कोरलेला लेख ऐतिहासिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. त्यात महाक्षत्रप ‘नहपान’ याचा मंत्री ‘अयम’, जो वत्स गोत्रातील होता, त्याने या मंडप (मटप) व पोढीस, वर्ष ४६ (इ. स. ७८) मध्ये पुण्यकर्मार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. संपूर्ण जुन्नरच्या लेण्यांत तत्कालीन राजवंशाचे नाव दर्शविणारा हा एकमेव शिलालेख आहे. क्र. ८ पासून १७ पर्यंतची लेणी ही सामान्य खोल्या आहेत. त्यांत कलाकुसरींचा अभाव आहे.

अंबा-अंबिका लेणीसमूह, जुन्नर.

अंबा-अंबिका लेणी-समूह : भीमाशंकर गटातील शेवटच्या लेण्यापासून पुढे सु. अर्धा किमी. वर अंबा-अंबिका लेणी-समूह आहे. यांत २२ लेणी व ११ पोढी असून यांतील महत्त्वाच्या लेणींना १८ ते ३४ हे क्रमांक दिले आहेत. यात एक चैत्य आणि बाकीचे विहार व साध्या खोल्या आहेत. तसेच येथे एकूण १५ शिलालेखही आहेत.

क्र. १८ ते २० पर्यंतची लेणी खोलीवजा असून त्यांत काही पोढी आहेत. लेणे क्र. २१ मध्ये चौरस मंडप असून बाजूंच्या भिंतींत एकूण पाच खोल्या आहेत. ओसरीत प्रवेशद्वाराच्या उजव्या अंगास दान दिल्यासंबंधीचा एक खंडित शिलालेख आहे.

लेणे क्र. २२ ते २४ या एक खोली किंवा साधे मंडप असलेल्या लेणी आहेत. लेणे क्र. २५ स्तूप असलेले लहानसे लेणे असून याचा दर्शनी भाग तुटलेला आहे. प्रांगणात पाण्याची पोढी आहेत. आत मागील भिंतीपासून वेगळा असलेला अखंड स्तूप असून त्याची छत्री छतातच कोरली आहे. स्तूपावर वेदिकापट्टी व हर्मिका (स्तूपाच्या अंडावरील चौकोनी कठडा) आहेत. हर्मिकेतील यष्टीचा वरील भाग तुटलेला आहे. स्तूप सुंदर कोरलेला असून त्याचे छत सपाट व लेण्याचे विधान काटकोनात आहे. अशाच प्रकारचे स्तूप भाजे, कान्हेरी, नाडसूर (ठाणाळे) व पितळखोरे येथे आहेत.

लेणे क्र. २६ हे चैत्यगृह थोड्या वेगळ्या धाटणीचे आहे. याचे चैत्यगवाक्ष नेहमीप्रमाणे दर्शनी नसून दर्शनी स्तंभांच्या मागे ओसरीत आहे. तत्कालीन कारागीर चैत्यगृहात कसे नवीन प्रयोग करीत असावेत, हे यावरून दिसते. चैत्याच्या दर्शनी भागामध्ये दोन भव्य उंच स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ दिसतात. दर्शनी भागाची उंची सुमारे ६.७० मी. आहे. ओसरीच्या मागील भिंतीत खालच्या अर्ध्या भागात प्रवेशद्वार व वरती प्रमाणबद्ध आरपार कोरलेले चैत्यगवाक्ष दिसते. छतावर सु. २ मी. रुंदीचा ठिसूळ दगडांचा थर गेला असल्याने तसेच पाणी झिरपत असल्याने चैत्यगृहाच्या आतील स्तूप व गाभारा बराचसा अपूर्ण अवस्थेत आहे. स्तूपाची हर्मिका फक्त काही प्रमाणात व्यवस्थित कोरली आहे. या अपूर्ण स्तूपावरून तो डेरेदार कसा कोरला जात असावा, याची प्रचीती येते. या एका लेण्यात एकूण ११ कोरीव लेख आहेत. यांतील एका लेखात या डोंगराचे नाव ‘मानमुकड’ (संस्कृत मानमुकुट) असे दिले असून आजही ते ‘मानमोडी’ या अपभ्रष्ट रूपात प्रचलित आहे. इतर लेखांमध्ये येथे निवास करणारा बौद्धभिक्षु-संघ व त्यास ‘गेध विहार’ असे दिलेले संबोधन, अनेक व्यक्तींनी संघाच्या चरितार्थासाठी दिलेल्या जमिनी, दान व इतर संबंधित बाबी यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. देणगीदारांत बुरूड (वासाकार), तांबट (कांस्यकार), सोनार (सुवर्णकार) वगैरेंनी जमिनी व पैसे संघास दिल्याचा उल्लेख आहे. तसेच ‘आदुथुमा’ नावाच्या मूळ शक किंवा पार्थियन व्यक्तीने जमिनी दान दिल्याचाही उल्लेख आहे. या लेखांवरून बौद्धभिक्षुसंघास असलेला लोकाश्रय, तत्कालीन सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीची कल्पना येते.

लेणे क्र. २७ व २८ चैत्यगृहाच्या उजव्या बाजूस एकाला एक लागून खोदली आहेत. या दोन्हीस ओसरी व मागील बाजूस प्रत्येकी दोन खोल्या, तसेच क्र. २८ ला समोर दोन स्तंभ आहेत. लेणे क्र. २७ मधील शिलालेखानुसार ‘भरुकच्छ’ (भडोच) येथील आससमाचे पुत्र बुद्धमित्र व बुद्धरक्षित यांनी लेण्यातील दोन खोल्या (बिगभं) दान दिल्याचे समजते. लेणे क्र. २८ मधील शिलालेखात गृहपति सयितीचा पुत्र गृहपति शिवदास, त्याची पत्नी आणि त्याचे सर्व नातेवाईक यांनी सदर लेणे दान दिल्याचा उल्लेख आहे.

लेणे क्र. २९ अपूर्ण असून स्तंभ कसे कोरले जात, याची पद्धती यावरून समजून येते. याच्या बाहेरील भिंतीत भग्न अवस्थेत उठावात कोरलेल्या स्तूपांचे अवशेष दिसतात. त्याच्या वरच्या बाजूस असणाऱ्या शिलालेखात स्तूप दान देणाऱ्याचा उल्लेख आहे.

लेणे क्र. ३० हे वरच्या मजल्यावर (लेणे क्र. २१ च्या वर) असून त्यात पाच खोल्या आहेत. खोल्यांच्या समोर छोटा सज्जा (gallery) असून त्याचा बराचसा भाग खंडित आहे. यात क्षेत्रपाल (भैरव), ऋषभनाथ, अंबिका व इतर जैन देव-देवता सु. बाराव्या शतकात कोरल्या आहेत. अंबिकेच्या शिल्पावरून या संपूर्ण समूहाचे नाव ‘अंबा-अंबिका’ पडले असावे. क्र. ३१ ते ३४ लेणी डोंगराच्या वरच्या भागात असून ती अगदीच सामान्य व अपूर्ण आहेत.

चैत्यगृह, भूत लेणी, लेणे क्र. ४०, जुन्नर.

भूत लेणी : अंबा-अंबिका समूहातील शेवटच्या लेण्यापासून पुढे काही अंतरावर ‘भूत लेणी-समूह’ लागतो. यात एकूण २१ लेणी व १४ पोढी असून महत्त्वाच्या लेणींना ३५ ते ४९ असे क्रमांक दिले आहेत. यातील चार-पाच वगळता बाकीच्या लेणी अगदी सामान्य आहेत.

क्र. ३५ ते ३७ या साधारणपणे एक खोलीवजा अर्धवट खोदलेल्या आहेत. या परिसरातील एका पोढीवर दानलेख कोरला आहे. लेणे क्र. ३८ मध्ये चौरस मंडप असून त्याच्या डाव्या व मागील भिंतीत प्रत्येकी दोन खोल्या आहेत. लेणे क्र. ३९ हे सुद्धा अपूर्ण असले तरी याचा आकार थोडा मोठा असून याच्या प्रांगणात पोढी, मंडप व काही खोल्या आहेत.

लेणे क्र. ४० हे चैत्यगृह असून जुन्नरमधील सर्वांत देखणे दर्शनी भाग असलेले आहे. हे ३.७ मी. रुंद व ९.१० मी. खोल आहे. चैत्याच्या दर्शनी भागाची उंची सुमारे ११ मी. असून तो दोन भागात विभागला आहे. पैकी खालील भागात रुंद दरवाजा, त्यावर खंडित सज्जाचा शिल्लक भाग, पायऱ्या, प्रांगणात बाक व दोन पोढी आहेत. वरील दर्शनी भागात शिल्पांनी सजविलेले व इतर नक्षीकाम असलेले पिंपळाच्या पानाच्या आकाराचे सुंदर चैत्यगवाक्ष आहे. अगदी वरच्या पट्टीत सात मोठ्या व त्याच्या वरील अंगास लहान चैत्यकमानी असून तशाच त्या दर्शनी भागाच्या दोन्ही बाजूंच्या उभ्या पट्ट्यात कोरल्या आहेत. हा सर्व भाग मधल्या गवाक्षाच्या थोडासा पुढे घेतला आहे. कमानीच्या उजव्या कोपऱ्यात बोधिवृक्ष असून उपासकांनी आणलेल्या माळा त्यास अर्पण केल्याचा प्रसंग आहे. तसेच डावीकडे एक मनुष्याकृती अपूर्ण राहिलेली दिसते. तुळजा लेणी-समूहातही अशा प्रकारची शिल्पे आहेत.

चैत्यकमानीच्या वरील निमुळत्या टोकाच्या उजव्या बाजूस पंचफणाधारी नागराज, तर विरुद्ध बाजूला मनुष्यरूपातील गरुड शिल्प कोरले आहे. या शिल्पांना स्थानिक लोक भुते, तर त्यांच्या बाजूस असलेल्या स्तूपांना लिंग समजत. यावरून या लेण्यास ‘भूत’ किंवा ‘भूतलिंग’ असे नाव पडले असे म्हटले जाते.

कमानीच्या आतील अर्धगोलास मण्यांच्या झालरी असून त्यात कमळाच्या आकृती आहेत. यांतील एकाच्या मधल्या पाकळीत समभंगस्थानात गजलक्ष्मीचे शिल्प आहे. गजलक्ष्मीच्या दोन्ही बाजूंवर दोन हत्ती असून त्यांच्या सोंडेत लक्ष्मीवर जलवृष्टी करण्यासाठी कुंभ आहेत. दोन्ही हत्तींच्या पाठीमागील दोन-दोन पाकळ्यांत एक पुरुष व एक स्त्री अशी उभी असलेली युगुले अतिभंगमुद्रेत दिसतात. याच भागात चंद्रकोराच्या आकाराच्या सपाट पट्टीवर यवन (ग्रीक) चंद्र याने गर्भद्वार दान दिल्यासंबंधीचा लेख कोरला आहे. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावरील शिल्पांचे कार्ले व बेडसे येथील शिल्पांशी लक्षणीय साम्य आहे.

चैत्यगृहाच्या आतील भाग अपूर्ण असून याचे विधान गजपृष्ठाकृती किंवा चापाकार आहे. तसेच छत अर्धगोलाकार आहे. उजव्या बाजूस चार अष्टकोनी खांब असून ते लेण्याच्या आकाराशी थोडेशे असंगत वाटतात. डाव्या बाजूच्या भिंतीत खांबांची फक्त सुरुवात केलेली दिसते. पाठीमागे अर्धगोल भिंतीपासून अलग असा स्तूप कोरला आहे. त्यावर हर्मिका नाही. परंतु यष्टीसहित छत्र बसविण्यासाठी चौरस खोबणी मात्र आहे.

लेणे क्र. ४१ ते ४७ वरच्या मजल्यावर (क्र. ३९ च्या वर) एकास एक लागून अशा खोल्या आहेत. यांतील काही खोल्यांच्या प्रवेशद्वारांवर चैत्यकमानी कोरल्या आहेत. तसेच स्तूप, वेदिकापट्टी व लहान चैत्य-कमानींच्या आत नक्षीकाम केले असून त्यांत एकातएक गुंफलेली फुले, नंदीपद, त्रिरत्न, श्रीवत्स आणि धर्मचक्र कोरल्याचे थोडेशे अवशेष दिसतात. लेणे क्र. ४८ व ४९ चैत्याच्या वरील डोंगरात असून ती अपूर्ण आहेत.

संदर्भ :

  • Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
  • जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
  • जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१, भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, मुंबई, २००२.
  • चित्रसौजन्य : बापुजी ताम्हाणे.

समीक्षक : मंजिरी भालेराव