योगशास्त्रात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पाचांना ‘क्लेश’ अशी संज्ञा आहे (अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशा: क्लेशा:| योगसूत्र २.३). ते नाना प्रकारच्या दु:खांना कारणीभूत होतात, परिणामी जीवाला क्लेश देतात म्हणून ‘क्लेश’ ही संज्ञा अर्थवाही आहे.
अविद्या : “अनित्य, अपवित्र (अशुचि), दु:ख आणि अनात्म (आत्मा नसलेली वस्तू, पदार्थ किंवा तत्त्व) यांना अनुक्रमे नित्य, पवित्र, सुख आणि आत्मा मानणे म्हणजे अविद्या” अशी पतंजलींनी अविद्येची व्याख्या केली आहे (अनित्याशुचिदु:खानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या|, योगसूत्र २.५). जे जसे नाही त्याच्याविषयी ते तसे आहे अशा प्रकारचे अयथार्थ ज्ञान, मिथ्या ज्ञान ही देखील अविद्या होय. उदा., ग्रह, नक्षत्र, तारे इत्यादी अनित्य आणि विनाशी असून देखील त्यांना नित्य मानणे (व्यासभाष्य २.५).
शरीर वस्तुत: स्वेद, मलमूत्रादि स्राव इत्यादी अनेक कारणांमुळे अपवित्र आहे. अशुद्ध असलेल्या देहाची शुद्धी ही बाह्य साधनांमुळे करावी लागते. परंतु, शुद्ध केल्यानंतरही शरीर पुन:पुन्हा मल उत्पन्न करते. त्यामुळे ते अशुद्ध आहे असे मानले जाते. सुखरूप भासणाऱ्या पुष्पमाला, चंदन, स्त्री इत्यादी गोष्टी सुखकारक भासल्या तरी त्या सुकल्यावर, सुगंध विरल्यावर आणि वियोग झाल्यावर दु:खकारकच ठरतात. त्यामुळे विवेकी पुरुषाच्या दृष्टीने सर्व दु:खरूपच आहे. या सर्वांवर आणि तत्सम वस्तूंवर सुखाचा आरोप म्हणजे अविद्या होय.
याशिवाय देह, बुद्धी, मन, इंद्रिय इत्यादी जड तत्त्वांना ती तत्त्वे चेतन आत्मा आहेत असे मानणे म्हणजे अविद्या होय.
अविद्या हे अन्य क्लेशांचे उत्पत्तिस्थान आहे. अस्मिता आदि क्लेशांना अविद्या कारणीभूत आहे असे पतंजलि म्हणतात. इतर सर्व क्लेशांची आणि त्यांच्या प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार या अवस्थांची अविद्या ही प्रसवभूमी आहे. प्रसुप्त अवस्था म्हणजे क्लेश व्यक्त होण्यास उपकारक गोष्टींच्या अभावामुळे तो व्यक्त न होणे. तनु अवस्था म्हणजे क्लेशाला प्रतिकूल अशा विषयावर ध्यान केल्यामुळे क्लेश क्षीण होणे. विच्छिन्न अवस्था म्हणजे क्लेश अन्य बलवान क्लेशामुळे दबला जाणे आणि उदार अवस्था म्हणजे उपकारक गोष्टींच्या सान्निध्यामुळे क्लेश कार्यरत होणे.
अविद्या असताना अन्य क्लेश असतात. अविद्येचा अभाव असताना त्यांचाही अभाव होतो.
अविद्येमुळे मनुष्याला बंध प्राप्त होतो म्हणजे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात बद्ध होतो आणि अविद्येचा नाश झाला असता त्याला कैवल्य प्राप्त होते.
अस्मिता : “दृक्शक्ति म्हणजे पुरुष (आत्मतत्त्व) आणि ज्ञानाचे साधन असलेली दर्शनशक्ती म्हणजे बुद्धी (हिलाच सत्त्व किंवा चित्त असेही नाव आहे). (अनात्मतत्त्व) या दोघांची जणू काही एकरूपता आहे, अशी प्रतीति म्हणजे अस्मिता होय” (दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता| योगसूत्र २.६).
भोक्तृशक्ती म्हणजे भोग घेणारा पुरुष आणि भोग्यशक्ती म्हणजे जड, अचेतन, अनात्म अशी बुद्धी या दोघांना एकरूप मानणे या प्रकारच्या अविद्येला अस्मिता म्हणतात. बुद्धी अचेतन आहे. ती भोग्य आहे आणि पुरुष भोक्ता आहे त्यामुळे बुद्धी आणि पुरुष ही दोन्ही तत्त्वे अत्यंत भिन्न आहेत. तसेच बुद्धी जड आहे आणि पुरुष चेतन आहे. त्यामुळे देखील ही दोन्ही तत्त्वे एकमेकांपासून भिन्न आहेत. ते एकमेकांच्या विरुद्ध धर्माचे आहेत. त्यांना एकरूप मानणे ही अविद्या आहे. या प्रकारच्या अविद्येला अस्मिता म्हणतात. पुरुषाशी संयोग झाल्यामुळे बुद्धी अचेतन असूनही चेतनायुक्त असल्यासारखी भासते. त्याचप्रमाणे पुरुष वस्तुत: उदासीन असूनही बुद्धीमध्ये असणाऱ्या गुणांच्या प्रभावामुळे जणु तो कर्ता आहे असे वाटते. परंतु, बुद्धी चेतन नाही आणि पुरुष कर्ता नाही (सांख्यकारिका २०). पुरुष कर्ताही नाही व भोक्ताही नाही. परंतु, प्रकृतीशी संबंध आल्यावर तो “मी कर्ता आहे, भोक्ता आहे’ असे मानतो. हे अज्ञान म्हणजेच अस्मिता होय.
अस्मितेमध्ये बुद्धी आणि पुरुषात परस्पर धर्मांचा आरोप होतो. त्याचप्रमाणे आत्यंतिक ऐक्यभ्रम देखील होतो. ज्याप्रमाणे लोखंड अग्नीच्या संपर्कात आल्यावर अग्नीची दाहकता लोखंडामध्ये देखील परावर्तित होते, त्याप्रमाणे प्रकृतीच्या संपर्कात आल्यामुळे पुरुषात देखील प्रकृतीचे धर्म भासमान होतात. किंवा दूर अंतरावर असलेले दोन वृक्ष वेगवेगळे असले तरी ते लांबून एकच आहे असे वाटतात, त्याप्रमाणे पुरुष प्रकृति यांचे मुळात नसलेले ऐक्य भासमान होते (योगवार्त्तिक २.६).
अविद्या अस्मितेचे कारण आहे. अर्थातच अस्मिता अविद्येचे कार्य आहे.
राग : पतंजलि राग म्हणजे आसक्ति या दुसऱ्या क्लेशाविषयी “सुखामागोमाग येणारा क्लेश राग होय” असे म्हणतात (सुखानुशयी राग:| योगसूत्र २.७). ज्याने आधी सुखाचा अनुभव घेतला आहे त्याला त्या सुखाच्या स्मरणाने त्या सुखाविषयी अथवा ते सुख उपलब्ध करून देणाऱ्या साधनांविषयी जी तृष्णा उत्पन्न होते, जो लोभ निर्माण होतो त्याला राग म्हणावे, असे प्रस्तुत सूत्राचे स्पष्टीकरण व्यास करतात. व्यासांच्या मते रागाचे पर्यायवाची शब्द तृष्णा, गर्ध, लोभ हे आहेत. वाचस्पति मिश्रांनी राग शब्दासाठी अभिलाषा हा प्रतिशब्द योजला आहे. वाचस्पति मिश्र असे म्हणतात की, प्रकृति आणि पुरुष हे निराळे आहेत असे भेदाचे ज्ञान झाल्यावर म्हणजेच अविद्येचा नाश झाल्यावर राग इत्यादी क्लेशांचीही निवृत्ती होते. ते म्हणतात की, सुखाचा अनुभव आल्यावर सुखाची जी स्मृति होते ती सुखाविषयी राग उत्पन्न करते. सुख हे रागाचे अधिष्ठान आहे असे भोज म्हणतात. जीवन्मुक्ताच्या बाबतीत राग या क्लेशाचे अस्तित्व नसते असे प्रतिपादन विज्ञानभिक्षु करतात.
द्वेष : “दु:खाच्या पाठोपाठ येतो, तो द्वेष” अशी द्वेष या क्लेशाची व्याख्या पतंजलींनी केली आहे (दु:खानुशयी द्वेष:| योगसूत्र २.८). व्यास द्वेषासाठी प्रतिघ, मन्यु आणि जिघांसा असे तीन प्रतिशब्द देतात. प्रतिघ म्हणजे हिंसा, मन्यु म्हणजे क्रोध आणि जिघांसा म्हणजे मारण्याची इच्छा.
दु:खाचा अनुभव ज्याला आला आहे अशा व्यक्तीला दु:खाचे स्मरण झाल्यावर त्या दु:खाविषयी तसेच दु:खाला कारणीभूत झालेल्या साधनाविषयी द्वेष उत्पन्न होतो. दु:ख जाणणाऱ्याला, अनुभवणाऱ्या व्यक्तीला दु:खाच्या अनुरूप स्मृतिपूर्वक दु:खाविषयी किंवा दु:ख देणाऱ्या साधनांविषयी प्रतिकार करण्याचा जो भाव (प्रतिघ), मानसिक क्रोध (मन्यु), त्यांचा नाश करण्याची इच्छा आणि प्रकट होणारा बाह्य क्रोध यांना द्वेष म्हणतात. भोज द्वेषाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात — दु:खाची अभिलाषा न करणाऱ्या पुरुषाचा दु:खाप्रति निंदात्मक क्रोध म्हणजे द्वेष (भोजवृत्ति २.८). त्याचे अधिष्ठान दु:खात असते.
वाचस्पति मिश्रांच्या मते प्रतिघ म्हणजे ‘हिंसेचे उत्तर हिंसेने देणे’ होय (तत्त्ववैशारदी २.८).
विज्ञानभिक्षु प्रतिघ शब्दाचा अर्थ ‘जो उद्विग्नता उत्पन्न करतो तो प्रतिघ’ असा करतात. हा अर्थ संयुक्तिक वाटतो. प्रतिघ शब्दाचा वाचस्पतिकृत प्रतिहिंसा हा अर्थ स्वीकारल्यास प्रतिघ आणि जिघांसा यात सीमारेषा अस्पष्ट राहील. जिघांसा शब्दाची व्युत्पत्ती ‘हन्तुम् इच्छा’ म्हणजे ‘हनन करण्याची इच्छा’ असा होत असल्यामुळे द्वेषसंज्ञक क्लेश हा इच्छाविशेष आहे असे विज्ञानभिक्षु म्हणतात.
अभिनिवेश : पतंजलींनी अभिनिवेशाची व्याख्या “अज्ञानी लोकांप्रमाणेच विद्वानांना देखील स्वभावत: नैसर्गिकपणे असणारे मरणभय म्हणजे अभिनिवेश” अशी केली आहे (स्वरसवाही विदुषोऽपि तथा रूढोऽभिनिवेश:| योगसूत्र २.९). पूर्वजन्मामध्ये अनुभवलेल्या मृत्यूचे भय चित्तामध्ये संस्काररूपाने अस्तित्वात असणे हा अभिनिवेश होय. मृत्यूचे भय पूर्वजन्मात अनुभवलेले असल्यानेच कृमि, कीटक, अज्ञानी व विद्वान माणसांमध्ये आढळते. ‘मी नसेन असे होऊ नये’, ‘मी सदैव असावे’ अशी कामना म्हणजे अभिनिवेश होय (व्यासभाष्य २.९).
नुकत्याच जन्मलेल्या कृमि-कीटकांना मरणभयाचे ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान किंवा आगम प्रमाणाने होणे शक्यच नाही. तरीदेखील स्वत:च्या नाशाविषयी भय त्यांच्यात असतेच किंवा नवजात अर्भकालाही हे भय असतेच. यावरून त्यांना पूर्वजन्मीय मरणानुभवाची स्मृति असली पाहिजे. यावरून जीवाचे अनादित्वही प्रसंगवशात् सिद्ध होते असे विज्ञानभिक्षु म्हणतात.
अभिनिवेश ‘स्वरसवाही’ (स्वभावत:च वाहणारा) आहे असे पतंजलि म्हणतात. स्वरसवाही या शब्दाचा अर्थ वाचस्पति मिश्र स्वभावाने म्हणजे वासनारूपाने वाहणारा असा करतात. कारण जीवांच्या ठायी असलेली वासना अनेक जन्मात अनुस्यूत असते. वासनेमुळे कर्म आणि कर्मामुळे वासना असे चक्र अव्याहत आहे. मारक वस्तूचे दर्शन झाल्यामुळे बालक थरकापू लागते म्हणजेच त्याला मरणभयाचे दु:ख जाणवते. त्याला जी पूर्वजन्मातील मरणदु:खाची स्मृति होते ती संस्कारातून होते व संस्कार अनुभवातून निर्माण होतो असे वाचस्पति मिश्र म्हणतात. हे मरणभय विद्वानांमध्येही आढळते. अज्ञानी व्यक्तीला मरणभय स्वाभाविक आहे, परंतु विद्वानाला ते का असावे याचे उत्तर वाचस्पतींच्या मते असे आहे की, विद्वान शब्दाचा अर्थ शास्त्र जाणणारा असा होतो. शास्त्र जाणणारा म्हणजे ज्याने शब्द व अनुमान प्रमाणाने शास्त्राचे ज्ञान प्राप्त केले आहे. शास्त्र जाणणाऱ्याला मरणाचे भय असते, मात्र तत्त्वज्ञानी म्हणजे विवेकख्याति प्राप्त झालेल्या पुरुषाला मृत्युभय नसते. कारण त्याचा अभिनिवेशरूपी क्लेश ज्ञानाग्नीने दग्ध झालेला असतो (तत्त्ववैशारदी २.९).
जन्म, आयु आणि भोग हा क्लेशांचा परिणाम आहे (व्यासभाष्य २.१३). क्लेशांच्या प्रभावामुळे शुभाशुभ कर्मे घडतात आणि त्या कर्मांचे फळ वर्तमान व भावी जन्मात भोगणे क्रमप्राप्त होते.
क्रियायोग म्हणजेच तपाने शरीरशोषण, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यामुळे क्लेश क्षीण होतात असे पतंजलींनी म्हटले आहे (योगसूत्र २.२). विवेकख्याति झाल्यावर म्हणजे पुरुष आणि प्रकृति भिन्न आहेत असे ज्ञान झाल्यावर ते दग्धबीज (निष्क्रिय) होतात. असंप्रज्ञात योगामध्ये त्यांची आत्यंतिक निवृत्ती होते.
पहा : अभिनिवेश, अविद्या, अस्मिता, द्वेष, राग.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर