योग तत्त्वज्ञानातील एक संज्ञा. सांख्ययोग दर्शनाप्रमाणे प्रकृतीपासून अभिव्यक्त होणाऱ्या तेवीस तत्त्वांमध्ये सतत परिवर्तन होत असतात. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते; शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे तन्मात्र; कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक ही पंचज्ञानेंद्रिये; मुख (वाक्), हात (पाणि), पाय (पाद), गुदमार्ग (पायु), जननेंद्रिय (उपस्थ) ही कर्मेंद्रिये आणि मन, बुद्धी, अहंकार ही तेवीस तत्त्वे होत. प्रकृती ही जरी सत्त्व, रज, तम या त्रिगुणांची साम्यावस्था असली, तरी प्रकृतीपासून व्यक्त होणाऱ्या तेवीस तत्त्वांमध्ये त्रिगुणांची विषमता असते. त्रिगुणांचा स्वभाव परिवर्तनशील असल्यामुळे या तेवीस तत्त्वांमध्येही सतत परिणाम घडून येतात. या तेवीस तत्त्वांमध्ये होणारे परिणाम तीन प्रकारचे असतात – धर्मपरिणाम, लक्षण परिणाम आणि अवस्था परिणाम. या तीन प्रकारच्या परिणामांचा उल्लेख पतंजलीनी योगसूत्रामध्ये (३.१३) केला आहे. त्याविषयीचे लक्षण आणि अधिक स्पष्टीकरण हे भाष्यकारांनी केले आहे.

(१) धर्म परिणाम : एखाद्या वस्तूचा धर्म बदलणे, हा धर्म परिणाम होय. उदा., एखाद्या बीजामध्ये माती, पाणी, सूर्यप्रकाश यांच्या संयोगाने परिवर्तन होऊन त्याचा अंकुर बनला, तर तो धर्म परिणाम आहे. कारण ‘बीजत्व’ हा पूर्वधर्म सोडून ‘अंकुरत्व’ या नवीन धर्माचे ग्रहण झाले. बीज आणि अंकुर हे संपूर्णतया वेगळे आहेत, असेही म्हणता येऊ शकत नाही, कारण बीजामध्येच परिवर्तन होऊन त्याचा अंकुर बनतो. त्यामुळे द्रव्य बदलले नाही, तरी त्याचा फक्त धर्म बदलला. बीज हेही पृथ्वीतत्त्वच आहे व अंकुरही पृथ्वीतत्त्वच आहे, त्यामुळे त्याच्या मूलतत्त्वात जरी परिवर्तन झाले नाही, तरी त्याचा गुणधर्म बदलला, यालाच धर्म परिणाम असे म्हणतात. हा परिणाम प्रत्येक क्षणाला होत नाही. बीज अनेक दिवसांपर्यंत डब्यात साठवून ठेवले तर त्याचा धर्म (बीजत्व) तोच राहतो, बदलत नाही.

(२) लक्षण परिणाम : ‘लक्ष्यते अनेन् इति लक्षणम् (ज्याद्वारे सूचित / इंगित केले जाते, त्याला लक्षण असे म्हणतात) या व्युत्पत्तिनुसार लक्षण शब्दाचा अर्थ काल / क्षण आहे. जरी वस्तूचा धर्म बदलला नाही, तरीही क्षण बदलत असल्यामुळे त्या वस्तूत लक्षण परिणाम होतो, असे मानावे लागते. ‘बीज’ अनेक दिवसांपर्यंत बीजच राहिले, अंकुर झाले नाही, तरीही जेवढ्या कालावधीपर्यंत ते बीज होते, त्यातही प्रत्येक क्षणानुसार त्या बीजात लक्षण परिणाम होतो. पहिल्या क्षणाचे बीज हे दुसऱ्या क्षणाच्या बीजापेक्षा, दुसऱ्या क्षणाचे बीज हे तिसऱ्या क्षणाच्या बीजापेक्षा वेगळे आहे. हाच बीजामध्ये होणारा परिणाम लक्षण परिणाम होय. वस्तूच्या स्वरूपात किंवा तिच्या गुणधर्मात बदल झाला नाही, तरी क्षण परिवर्तन झाल्याने त्या त्या क्षणाशी संयुक्त वस्तूंमध्ये लक्षण परिणाम होतो. हा लक्षण परिणाम काल्पनिक आहे, असे म्हणू शकत नाही. वरकरणी जरी वस्तूच्या बाह्य स्वरूपात बदल दिसून येत नसला, तरी कालभेदानुसार वस्तुभेद होतो. उदा., एकाच खुर्चीत आपण रोज बसतो, तरीही कालभेदानुसार प्रत्येक क्षणाची खुर्ची वेगळी आहे. व्यक्ती केवळ वर्तमान क्षणातील खुर्चीवर बसू शकतो, एक क्षण आधी असणारी किंवा एक क्षण नंतर असणारी खुर्ची बसण्यासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे लक्षण परिणाम हा यथार्थच आहे, काल्पनिक नाही.

(३) अवस्था परिणाम : क्षणांमध्ये होणाऱ्या परिवर्तनामुळे वस्तूत लक्षण परिणाम होतो व लक्षण परिणामामुळे अवस्था परिणामही होतो. क्षणांचे तीन विभाग करता येऊ शकतात – अतीत (भूतकाळातील), वर्तमान आणि अनागत (भविष्यकाळातील). वर्तमान क्षणामध्ये उपस्थित असणारी वस्तू ही व्यक्त रूपात असते. परंतु, अतीत आणि अनागत क्षणांमध्ये ती वस्तू अव्यक्त रूपात असते. व्यक्त आणि अव्यक्त या अवस्थांचा होणारा परिणाम म्हणजे अवस्था परिणाम होय. कोणतीही वस्तू उत्पन्न (अभिव्यक्त) होण्यापूर्वी अव्यक्त असते, उत्पन्न झाल्यावर ती व्यक्त होते व पुन्हा नष्ट (अनभिव्यक्त) झाल्यावर अव्यक्त होते. हाच अवस्था परिणाम होय.

अशा प्रकारे भूत [१० (स्थूल ५ + सूक्ष्म ५)] आणि इंद्रिय [१३ (ज्ञानेंद्रिय ५ + कर्मेंद्रिय ५ + अंत:करण ३)] यांमध्ये हे तीन प्रकारचे परिणाम घडतात. धर्मपरिणाम हा प्रत्येक क्षणी होत नाही, परंतु लक्षण आणि अवस्था परिणाम हे प्रत्येक क्षणी होतात. या तीन प्रकारच्या परिणामांवर संयम (धारणा+ ध्यान+ समाधी) केल्याने योग्याला अतीत आणि अनागताचे ज्ञान प्राप्त होते, तो योगी त्रिकालज्ञ होतो (योगसूत्र ३.१६).

संदर्भ :

  • ब्रह्मलीन मुनि, पातञ्जल योगदर्शन, चौखम्भा संस्कृतसंस्थान, वाराणसी, २००३.

          समीक्षक : कला आचार्य