महर्षि पतंजलींनी वर्णिलेल्या पाच क्लेशांपैकी अभिनिवेश हा एक क्लेश आहे. व्युत्पत्तीनुसार अभिनिवेश या शब्दाचा अर्थ – ‘अभि’- सर्व बाजूंनी, ‘नि’-खाली, ‘विश्’- प्रवेश करणे असा होतो. योगदर्शनानुसार अभिनिवेश ही पारिभाषिक संज्ञा आहे व या संज्ञेचा अर्थ ‘मृत्यूचे भय’ असा केला जातो. मृत्यूचे भय सर्व बाजूंनी चित्तामध्ये प्रवेश करते व ते सूक्ष्म संस्कार रूपाने कायम चित्तात राहते, म्हणून त्याला अभिनिवेश असे म्हणतात. महर्षी पतंजलींनी त्याचे लक्षण ‘स्वरसवाही विदुषोऽपि तथा रूढोऽभिनिवेश: ।’ (योगसूत्र २.९) असे केले आहे.

प्रत्येक जीवाला ‘माझे अस्तित्त्व कायम राहावे, माझा कधीही नाश होऊ नये’ अशी तीव्र इच्छा असते. ही तीव्र इच्छा केवळ मनुष्यातच नाही तर अन्य प्राणिमात्रांमध्येही दिसून येते. मृत्यूचे किंवा स्वत:च्या नाशाचे भय चित्तामध्ये अतिशय दृढ असते. परंतु, हे मृत्यूचे भय अन्य जीवांना मरताना पाहून उत्पन्न होते असे नाही; तर पूर्वजन्मामध्ये स्वत: अनुभवलेल्या मृत्यूमुळे ही भीती पुन्हा पुन्हा प्रकट होते, म्हणून महर्षी पतंजलींनी या क्लेशाचे लक्षण करताना ‘स्व-रस-वाही’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. स्वरसवाही म्हणजे ‘एकाच जीवाच्या अनेक जन्मांमध्ये स्वभावत: प्रवाहित झालेला (अभिनिवेश)’ असा होय. मृत्यूचे भय सर्व जीवांना सर्व जन्मांमध्ये अनुभवाला येते. त्या अनुभवामुळे चित्तामध्ये त्या भीतीचे सूक्ष्म संस्कार उत्पन्न होतात व त्या संस्कारांच्या वासना प्रत्येक जन्मामध्ये प्रकट होतात. नुकत्याच जन्मलेल्या जीवामध्येही मृत्यूचे भय दिसून येते. त्यामुळे अभिनिवेश हा अन्य व्यक्तींना मरताना बघून उत्पन्न होत नाही, तर स्वत:च्या अनुभवाद्वारे उत्पन्न होतो असे अनुमान करता येते.

या मृत्यूच्या भयाचे मूळ कारण अविद्या आहे. वस्तुत: जीवाचे खरे स्वरूप (पुरुष) हे चैतन्यरूप आहे. पुरुष हा नित्य (अविनाशी) आहे. परंतु, अविद्येमुळे आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत, असे ज्ञान जीवाला होत नाही. चित्त, इंद्रिय, शरीर यांच्याशी संयोग होऊन पुरुष त्यांनाही आपलेच स्वरूप मानू लागतो. शरीर इत्यादी नाशवंत तत्त्वांना स्वत:चे स्वरूप मानल्यामुळे शरीराचा नाश होण्याचा प्रसंग आल्यावर स्वत:चाच (पुरुषाचाच) नाश होईल असे भय उत्पन्न होते.

हे मृत्यूचे भय केवळ सामान्य जीवातच असते असे नव्हे, तर शास्त्रांचे अध्ययन केलेल्या विद्वानांमध्येही समानरूपाने दिसून येते, हे सांगण्यासाठी पतंजलींनी ‘विदुषोऽपि तथा रूढ:’ या शब्दांचा प्रयोग केला आहे. शास्त्र शिकल्यामुळे आत्मा अविनाशी आहे असे शब्दज्ञान विद्वानांना होते; परंतु, प्रत्यक्ष मृत्यूचा प्रसंग आल्यानंतर जन्मांतरीची अभिनिवेशाची दृढ वासना त्या शब्दज्ञानापेक्षा अधिक प्रबळ बनते. कारण ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे उत्पन्न झालेली असते. शास्त्राद्वारे होणारे ज्ञान हे शब्दरूप आणि परोक्ष (दुसऱ्याने अनुभवलेले) असल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा ते दुर्बल ठरते.

ज्या योग्याला समाधीद्वारे विवेकख्यातीचे म्हणजेच चित्त, इंद्रिये, शरीर यांपेक्षा पुरुष वेगळा आहेत असे ज्ञान होते, त्या योग्याच्या चित्तातील अविद्या व अन्य क्लेशही नष्ट होतात. अशा योग्याला मृत्यूचे भयही राहत नाही. कारण चैतन्यस्वरूप पुरुष हा शरीर इत्यादींपेक्षा वेगळा आहे, याचे साक्षात् / प्रत्यक्ष ज्ञान त्याला झालेले असते.

भाष्यकार व्यासांच्या मते अभिनिवेशामुळे पूर्व जन्मांचे अस्तित्वही सिद्ध होते. निसर्गामध्ये सर्वत्र कार्य-कारण संबंध दिसून येतो. नुकत्याच जन्मलेल्या, अजून कोणताही अनुभव घेतलेला नसलेल्या जीवामध्ये मृत्यूचे भय कोठून आले, याचा विचार केल्यास ते पूर्व जन्मामध्ये घेतलेल्या अनुभवावरून ते भय उत्पन्न झाले असावे असे अनुमान करता येते.

सांख्य दर्शनामध्ये अभिनिवेशाला अंधतामिस्र असे संबोधिले आहे. सांख्यकारिकेमध्ये अंधतामिस्राचे अठरा प्रकार सांगितले आहेत.

व्यासभाष्यामध्ये (२.१८) अभिनिवेश हा शब्द अजून एका वेगळ्या अर्थानेही वापरला गेला आहे. एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान होण्याची प्रक्रिया स्पष्ट करताना व्यासांनी सहा पायऱ्या सांगितल्या आहेत. अभिनिवेश ही त्यातील सर्वांत शेवटची पायरी आहे.

(१) ग्रहण : विषयांचा इंद्रियांद्वारे अनुभव घेणे.

(२) धारण : बुद्धीमध्ये ते ज्ञान स्थिर होणे व त्याचे स्मरण होणे.

(३) ऊह : तर्काने विषयाचे ज्ञान प्राप्त करून घेणे.

(४) अपोह : स्वत:च्या तर्कापेक्षा विरुद्ध असणाऱ्या विपरीत तर्कांचे बुद्धीद्वारे निराकरण करणे.

(५) तत्त्वज्ञान : वस्तूच्या सारभूत तत्त्वाचे यथार्थ ज्ञान होणे.

(६) अभिनिवेश : ज्या वस्तूचे यथार्थ ज्ञान झाले आहे, तिचे सारासार विवेकानुसार ग्रहण करणे किंवा त्याग करणे.

अशा रीतीने योगदर्शनात अभिनिवेश शब्द प्रामुख्याने ‘मृत्यूचे भय’ या अर्थाने व व्यासभाष्यात ‘मृत्यूचे भय’ आणि अन्य संदर्भात ‘वस्तूचे ग्रहण किंवा त्याग’ या अर्थाने आला आहे.

पहा : क्लेश, अविद्या.

संदर्भ : स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.

                                                     समीक्षक : कला आचार्य