ओगुरा हयाकुनिनइश्श्यु : अभिजात जपानी साहित्यातील प्राचीन संकलित काव्यसंग्रह. कामाकुरा कालखंडातील प्रसिद्ध कवी आणि विद्वान फुजिवारा नो तेइकाने या कवितासंग्रहाचे संकलन केले. प्रसिद्ध फुजिवारा घराण्यामध्ये जन्म झालेल्या तेइकाचे वडील सुद्धा कवी होते. त्यांची कवितापण ह्या काव्य संग्रहामध्ये समाविष्ट केली आहे. कामाकुरा कालखंडामध्ये शंभर कवी एक कविता  ह्या नावाने फूजिवारा नो तेइकाने कवितांचे खाजगी संकलन केले. ह्या कवितांमध्ये हेइआन कालखंडामधील कवितांचा (कोकिनवाकाश्यु) समावेश केला आहे. २४ कविता कोकिनश्यु, १४ कविता शिनकोकिनश्यु आणि बाकी कविता सम्राटांच्या आज्ञेवरून संकलित केल्या गेलेल्या काव्यसंग्रहामधून घेतल्या आहेत. ७९ पुरुष आणि २१ स्त्रियांच्या कविता ह्या संग्रहामध्ये दिल्या आहेत. १३ बौद्ध भिक्षुंच्या कविता पण आहेत. असे मानले जाते की फुजिवारा नो तेइकाच्या मुलाने त्याच्या सासर्‍याच्या घरासाठी वडिलांना कविता संकलित करायला सांगितल्या. ओगुरा पर्वताच्या खाली असलेल्या ह्या घराच्या पडद्यांसाठी कवितांचा वापर करण्यात आला. जपानी घरामध्ये खोल्यांच्या मधली भिंत म्हणून कागदाचा पडदा असतो. ह्या पडद्यावर सुंदर निसर्ग दृश्ये काढलेली असतात. तेइकाने शंभर कवी निवडून त्यांच्या प्रत्येकी एक अशा कविता कागदावर लिहून त्याचा सुंदर पडदा बनविला. निसर्ग, प्रेम आणि विविध विषयांवरच्या ह्या कविता आहेत. ह्या कवितांमध्ये अत्यंत कौशल्याने शब्दांचा वापर करण्यात आला आहे. चिनी भाषेचा वापर न करता एखादा शब्द जपानी काना लिपीमध्ये लिहून शब्द्च्छल केला आहे. उदाहरणार्थ, जपानी लिपीमध्ये मात्सु असे लिहिले आहे. ह्या शब्दाचे पाइनचे झाड आणि वाट बघणे असे दोन अर्थ होतात. चिनी लिपीच्या वापरामुळे नक्की कोणता अर्थ घ्यायचा हे कळू शकते. जपानी लिपी कानामुळे दोन्ही अर्थ घेतले जाऊ शकतात. कविता लिहिताना ह्या गोष्टीचा पूर्ण विचार केला गेला आहे. ह्या काव्यसंग्रहामध्ये सम्राट, सम्राज्ञी, उमराव, सरदार ह्यांच्या पण कविता आहेत. जितो सम्राट लिहितात वसंत ऋतु संपला असून ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये पांढरे कपडे सुकवावे असे सांगितलेल्या कागु पर्वतावर पांढरे कपडे दिसत आहेत. यामाबे नो आकाहितो लिहितो की तागोच्या समुद्र किनार्‍यावर येऊन पाहिले तर फुजि पर्वतावर पांढरे शुभ्र बर्फ पडत होते. ओनो नो कोमाची साकुरा आणि पावसाबद्दल लिहिते, साकुरा (चेरी ब्लॉसम) च्या फुलांचा रंग फिका पडायला लागला. माझा रंग सुद्धा फिका पडत आहे, सतत पडणार्‍या पाऊसाकडे बघत विचार करत बसल्यामुळे. ह्या कवितांचा वापर करून हयाकुनिन इश्श्यु हा खेळ खेळला जातो. त्याच्या स्पर्धा पण घेतल्या जातात.

संदर्भ :

समीक्षण : निस्सीम बेडेकर