फिलिपीन्समधील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे अंतर्गत सरोवर. लूझॉन हे फिलिपीन्समधील सर्वांत मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे बेट असून त्या बेटावरच हे सरोवर आहे. फिलिपीन्स या देशाच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या मानिला महानगरापासून जवळच आग्नेयीस हे सरोवर आहे. अनेक ठिकाणी लागूना ही संज्ञा सरोवरासाठी वापरली जाते. या सरोवराची पूर्व-पश्चिम लांबी ५१ किमी., दक्षिणोत्तर रुंदी ४० किमी. आणि क्षेत्रफळ ९२२ चौ. किमी. आहे. त्याची सरासरी खोली २.८ मी., कमाल खोली २० मी. आणि किनाऱ्याची लांबी २२० किमी. असून समुद्रसपाटीपासून ते फक्त एक मीटर उंचीवर आहे. नवीन संशोधनानुसार एकेकाळी हा दक्षिण चिनी समुद्रातील मानिला उपसागराचा फाटा असावा. सरोवराच्या पाणलोट क्षेत्रातून वाहत येणाऱ्या २१ नद्यांद्वारे या सरोवराला पाणीपुरवठा होतो. सरोवराला होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी पाग्सांहान नदीचा वाटा ३५ टक्के, तर सँता क्रूझ नदीचा वाटा १५ टक्के असतो. मुसळधार पावसाच्या काळात या प्रवाहांमुळे सरोवराच्या सभोवतालचा संपूर्ण मैदानी प्रदेश जलमय होतो. पसीग नदी हा सरोवराचा निर्गममार्ग असून त्याद्वारे सरोवराचे अतिरिक्त पाणी वायव्येस १६ किमी. वर असलेल्या मानिला उपसागराला जाऊन मिळते.

तालीम बेट

लागूना दे बाय सरोवरात उत्तरबाजूने दोन द्वीपकल्प सरोवरात घुसलेले दिसतात. त्यामुळे सरोवराचा आकार इंग्रजी डब्लू या अक्षरासारखा किंवा कावळ्याच्या पायाच्या आकारासारखा दिसतो. या द्वीपकल्पांच्या दरम्यान सरोवराचे जे खळगे आहेत, ते प्रत्यक्षात ज्वालामुखीच्या काहीली आहेत. या ज्वालामुखी काहीलींची निर्मिती दोन मोठ्या ज्वालामुखी विस्फोटातून झालेली आहे. हे दोन विस्फोट अनुक्रमे एक दशलक्ष वर्षांपूर्वी आणि २७,००० ते २९,००० वर्षांपूर्वी घडून आलेले असावेत. द्वीपकल्पांच्या कडेने अनेक बेटे आढळतात. पश्चिमेकडील द्वीपकल्पाचा काही भाग तर तालीम या एका मोठ्या बेटाच्या स्वरूपात आढळतो. सरोवराच्या मध्यात असलेले तालीम हे ज्वालामुखी बेट सरोवरातील सर्वांत मोठे (लांबी १४ किमी.) आणि दाट लोकवस्तीचे आहे. कलांबा, सीलीटो लिंडो, मलाही, बाँगा, पिहान, बे बेट ही या सरोवरातील इतर प्रमुख बेटे आहेत. सँता क्रूझ, बिन्यान आणि कलांबा ही सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील मोठी शहरे आहेत.

पूरनियंत्रण, जलसिंचन, जलविद्युतशक्ती निर्मिती, जलवाहतूक, मासेमारी, मत्स्यपालन, मनोरंजन, वाढत्या बदक उद्योगासाठी खाद्यपुरवठा, नागरी वस्ती व उद्योग यांना पाणीपुरवठा करणे असे या सरोवराचे विविधोपयोग आहेत. लागूना दे बाय प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने या सरोवराला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे सरोवरातील पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता राखण्याचे कटाक्षाने प्रयत्न केले जातात. स्पॅनिश वसाहतीच्या काळापासून हे सरोवर प्रवासी बोटींच्या वाहतुकीसाठी वापरले जात होते.

समीक्षक : वसंत चौधरी