दख्खनच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने १३१८ ते १३४७ हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे. हा कालखंड यादव सत्तेच्या अस्तानंतर  सुरू होऊन दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता स्थिरस्थावर होईपर्यंत होता. अलाउद्दीन खल्जीच्या स्वारीनंतर दख्खनच्या इतिहासात मोठे बदल झाले. दख्खनमध्ये यादवांचे राज्य महाराष्ट्र तसेच कर्नाटकच्या काही भागांत पसरलेले होते. होयसळांचे साम्राज्य कर्नाटकात, तर काकतीयांचे साम्राज्य तेलंगणा आणि पूर्व महाराष्ट्रात पसरलेले होते. या तिन्ही राजसत्तांची परस्परांत युद्धे होत असत. या तिन्ही राजसत्तांची आर्थिक स्थिती खूप चांगली होती. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या परस्परांतील युद्धांशी काही देणेघेणे नव्हते; तथापि त्यांचा परिणाम अंशत: सामाजिक जीवनावर होई. पण लोक त्यांचे उद्योग आणि कामधंदे यांत व्यग्र असत.

उत्तरेकडील भागात गुलाम घराण्यानंतर खल्जी घराण्यातील सुलतानांनी दिल्लीमध्ये आपले बस्तान बसविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. जलालुद्दीन खल्जी (१२९०-१२९६) हा या घराण्याचा संस्थापक. त्याचा पुतण्या आणि जावई अल्लाउद्दीन खल्जी (कार. १२९६-१३१६) याने गुजरात, माळवा, चितोड, रणथंभोर आदी प्रदेश पादाक्रांत करून दक्षिण हिंदुस्थानात देवगिरीचा राजा रामचंद्रदेव (कार. १२७१-१३११), तेलंगणचे काकतीय, कर्नाटकातील होयसळ राजे व अति दक्षिणेकडील पांड्य घराणे यांविरुद्ध स्वाऱ्या करून दक्षिण हिंदुस्थानात मुस्लिम सत्तेचा विस्तार केला. अलाउद्दिनने योग्य वेळी देवगिरीच्या संपत्तीच्या साठ्याची जागा हेरून फेब्रुवारी १२९६ मध्ये देवगिरीच्या दिशेने कूच केले. हे सर्व करीत असताना अलाउद्दीनने दिल्ली सम्राट जलालुद्दीन खल्जी याला अंधारात ठेवले होते. इ. स. १२९६ साली प्रथमच मुस्लिमांचे दक्षिणेत आक्रमण झाले. देवगिरीवरील स्वारीत वाटेत एके ठिकाणी त्यास छोटी लढाई करावी लागली. अल्पावधीत अल्लाउद्दीन खलजी ८००० सैनिकांसह देवगिरीजवळ पोहोचला. अल्लाउद्दीनच्या सुसज्ज सैन्यासमोर यादवांचा टिकाव लागला नाही. रामदेवाचे सैन्य दूरच्या स्वारीत गुंतले होते. त्यात त्याच्या गाफीलपणाची आणि लोकांच्या फितुरीची भर पडली. बाहेर पराभव झाल्यानंतर त्याने देवगिरीच्या किल्ल्यात आश्रय घेतला, पण किल्ल्यातील अन्नधान्याची टंचाई लक्षात येताच त्याला आपला फार काळ टिकाव लागणार नाही, याची जाणीव झाली. अलाउद्दीनने जेवढी शक्य होईल तेवढी लूट केली आणि जबर खंडणी देण्याचे वचन घेऊन तो त्याच्या सुभेदारीच्या कडा प्रांतात परतला. रामदेवाकडून काही वर्षे नियमित खंडणी दिली जात होती; तथापि पुढे रामदेवाने कबूल केलेली खंडणी देण्याचे बंद केल्यामुळे अलाउद्दीनने इ. स. १३०७ मध्ये सरदार मलिक काफूर याला देवगिरीवर पाठविले. त्याने रामदेवाचा पूर्ण पराभव करून त्यास दिल्लीला नेले. तेथे अलाउद्दीनने त्यास सहा महिने ठेवून घेऊन सन्मानाने परत पाठविले आणि आपला मांडलिक म्हणून राज्य करण्याची परवानगी दिली.

मलिक काफूर काकतीय व होयसळ यांच्या राज्यांवर स्वारी करण्याकरिता इ. स. १३०८ मध्ये देवगिरीस आला, तेव्हा रामदेवाला त्याला सर्वतोपरी साहाय्य करणे भाग पडले. त्यानंतर रामदेव लवकरच मरण पावला. रामदेवाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शंकरदेव यादवांच्या गादीवर आला. त्याने मुसलमानांचे स्वामित्व झुगारून देऊन देवगिरीवर पुन्हा आपला पूर्ण अंमल बसविण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही. मलिक काफूरने १३१३ मध्ये पुन्हा देवगिरीवर स्वारी करून त्याला ठार मारले. देवगिरीचे दौलताबाद हे नामकरण करण्यात आले. नंतर रामदेवाचा जावई हरपालदेव याने बंड करून देवगिरीवर हल्ला केला व तो किल्ला काबीज केला; पण हाही प्रयत्न सफल झाला नाही. या वेळी अलाउद्दीनचा मुलगा मुबारक याने १३१८ मध्ये देवगिरीवर स्वारी केली. हरपालदेवाचा अमानुषपणे खून केला आणि यादव साम्राज्य जिंकून ते दिल्ली सल्तनतमध्ये समाविष्ट केले. या सुमारास मुस्लिम सत्तेकडून देवगिरीच्या परिसरातील अनेक मंदिरे पाडून तेथील दगडांचा उपयोग दौलताबादेत मशीद बांधण्यासाठी केला गेला. यादव साम्राज्याच्या पाडावानंतर दक्षिणेत मुसलमानी अंमल स्थिरस्थावर झाला. पुढे खल्जी सुलतानांनी दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत मुस्लिम सत्तेचा प्रभाव पाडला आणि इस्लाम धर्माचा प्रसार केला.

 

संदर्भ :

  •    Government of India, Ministry of Information and Broadcasting, comp. Indian Medieval History, New Delhi, 2008.
  •    Sherwani, H. K. & Joshi, P. M. Eds., Medieval History of Deccan, Hyderabad, 1973.
  •    Varma, O. P. The Yadavas and their times, Vidarbh Sanshodhan Mandal, Nagpur, 1979.
  •     कुंटे, भ. ग., संपा. गुलशन –ए- इब्राहिमी (फेरीश्ताचे भाषांतर), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  •     कुलकर्णी, गो. त्र्यं., संपा. महाराष्ट्राचा इतिहास भाग : १ – मध्ययुगीन कालखंड, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
  •    पाठक, अरुणचंद्र, संपा. महाराष्ट्र राज्य गॅझेटीअर : मध्ययुगीन कालखंड (राजकीय आणि सामाजिक इतिहास), खंड -२, मुंबई, २०१४.

समीक्षक – गो. त्र्यं. कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा