मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात होते. घियासुद्दिन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक (कार. १३२५–५१) हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याच्या काळात राज्यविस्तार झाला. दिल्लीवरील परकीय आक्रमणांचा धोका टाळण्यासाठी व दक्षिणेत होणाऱ्या बंडांमुळे मुहम्मदास आपली राजधानी मध्यवर्ती अशा ठिकाणी असावी, असे वाटले. म्हणून त्याने इ. स. १३२७ मध्ये साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून देवगिरीची निवड केली. देवगिरीस दौलताबाद हे नाव देऊन सर्वांना तिकडे जाण्याचा हुकूम दिला आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या स्थलांतराचे अनेक दूरगामी परिणाम दक्षिणेच्या राजकारणावर झाले.
राजधानी देवगिरी उर्फ दौलताबादला हलविली, तरी मुहम्मदाला वारंवार उत्तरेत जाणे भाग पडत होते. त्याचा गैरफायदा घेऊन दक्षिणेतील अमीर-उमरावांनी हळूहळू तुघलक सत्तेविरुद्ध बंड करण्यास सुरुवात केली. दक्षिणेकडे होणारी बंडे मोडून शमविण्यासाठी मुहम्मदाने इ. स. १३३५ साली कुत्लघखानाची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. कुत्लघखानने दक्षिणेतील अमीर-उमराव यांच्यावर दहा वर्षे नियंत्रण ठेवले. पण अखेर कुत्लघखान अमीर-उमरावांच्या राजकारणात अपयशी ठरला. त्याला दिल्लीला परत बोलाविण्यात आले (१३४५). पुढे मुस्लिम अमीर-उमरावांनी स्वतंत्र सुभे निर्मिले आणि तुघलक सत्तेविरुद्ध उघडउघड बंड पुकारले. त्यांनी दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला. या बंडात प्रामुख्याने इस्माइल मख, नसिरुद्दीन आणि हसन गंगू हे उमराव आघाडीवर होते. त्यांनी सर्वसंमतीने इस्माइल मख याला दक्षिणेचा सुलतान म्हणून घोषित केले. तसेच हसन गंगू यास ‘जफरखान’ ही पदवी देण्यात आली. या बंडाचा बीमोड करण्यासाठी स्वतः मुहम्मद बिन तुघलक दौलताबादवर चालून आला. त्याच्या फौजेपुढे इस्माइल मख आणि त्याच्या सैन्याचा निभाव लागला नाही. ते दौलताबाद सोडून पळून गेले. गुजरात आणि उत्तरेकडे बंड उद्भवल्यामुळे मुहम्मद परत गेला, तेव्हा बंडखोर उमराव पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी दौलताबाद किल्ला जिंकून घेतला. या सर्व घडामोडींमध्ये अल्लाउद्दिन हसन गंगू उर्फ जफरखान याचे शौर्य व नेतृत्वगुण दिसून आले. त्याची सैन्यामधील वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन अमीरांनी अल्लाउद्दिन हसन गंगू याचा दौलताबाद येथे राज्याभिषेक करून (१३४७) त्यास सुलतानपद दिले. त्याने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण करून ३ ऑगस्ट १३४७ रोजी बहमनी राज्याची स्थापना केली. पुढे सु. १८० वर्षे दक्षिणेच्या बहुतांश भागावर बहमनी सत्तेचा अंमल होता.
संदर्भ :
- Government of India, Ministry of Information and Broadcasting, comp. Indian Medieval History, New Delhi, 2008.
- कुंटे, भ. ग., संपा. व अनु. गुलशन –ए- इब्राहिमी (फेरीश्ताचे भाषांतर), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
- कुलकर्णी, गो. त्र्यं., संपा. महाराष्ट्राचा इतिहास भाग : १ – मध्ययुगीन कालखंड, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
- पाठक, अरुणचंद्र, संपा. महराष्ट्र राज्य गॅझेटीअर : मध्ययुगीन कालखंड (राजकीय आणि सामाजिक इतिहास), खंड -२, मुंबई, २०१४.
समीक्षक – चंद्रकांत अभंग
लेख खूप उत्तम