द्रव्यपरीक्षा : (इ. स. १३१८). अपभ्रंश भाषेतील एक प्रसिद्ध ग्रंथ. द्रव्यपरीक्षा आणि विनिमय दर यांची प्राचीन परंपरा व माहिती देणारा हा ग्रंथ ठक्कुर फेरू या मध्ययुगीन जैन लेखकाने लिहिला. फेरू हा अल्लाउद्दीन खिलजीचा (खल्जी) मुलगा कुतुबुद्दीन मुबारकशाह (कारकिर्द १३१६-१३२०) याच्या पदरी दिल्लीच्या टाकसाळीत नाण्यांची शुद्धता तपासण्याच्या कामावर होता. फेरूच्या या ग्रंथात १४९ गाथा (श्लोक) असून, पहिल्या पन्नास गाथांमध्ये नाण्यांची शुद्धता तपासण्याच्या विविध पद्धतींचे विश्लेषण असून उर्वरित नव्व्याण्णव गाथांमध्ये एकूण २६० वेगवेगळ्या प्रकारच्या नाण्यांचे वजन, धातूंचे प्रमाण, संबंधित राजवट, शहराचे नाव इत्यादींचे तपशीलवार वर्णन आहे. फेरूने हा ग्रंथ त्याच्या टाकसाळीतील प्रत्यक्ष अनुभवावरून त्याचा मुलगा व लहान भाऊ यांच्याकरिता रचल्याचे तो सांगतो. तत्कालीन भारतात विविध राजवटींची शेकडो प्रकारची नाणी चलनात होती. त्यांमधील वैविध्यामुळे विनिमय दर ठरविण्यासाठी सोने व चांदीचे प्रमाण, अर्थात नाण्यांची शुद्धता तपासली जात होती.

या ग्रंथात नाण्यांची शुद्धता तपासण्याच्या दोन प्रमुख पद्धतींचे वर्णन येते : १. कसोटीच्या दगडाच्या साहाय्याने व २. नाणी वितळवून. कसोटीच्या दगडावर सोने किंवा अन्य कोणताही धातू घासल्यावर उमटणारी रेषा एकसाची प्रकाराची असल्याने तिच्या रंगावरून त्याच्या शुद्धतेची कल्पना येते. सोन्याची शुद्धता ही भारतात परंपरेने १ ते १६ पर्यंत सांगितली जाते. याचे एकक ‘वर्णʼ (अपभ्रंश भाषेत ‘वन्नीʼ) हे होय. फेरू मात्र ही विभागणी १ ते १२ अशी करतो. सर्वांत शुद्ध, अर्थात १२ वन्नी शुद्धतेच्या सोन्याला ‘वारही वन्नीʼ अशी संज्ञा आढळते. शुद्धता तपासण्याकरिता एकूण ४८ सोन्याच्या काड्या तयार करून, १ ते १२ वन्नी या श्रेणीत एकचतुर्थांश वन्नी इतक्या फरकाने शुद्धता वाढवावी, असे फेरू सांगतो. या संदर्भस्वरूपी काड्यांना संदर्भशलाका किंवा शलाका असेही म्हणतात. एकत्रितपणे या काड्यांच्या समूहाला वर्णमालिका किंवा अपभ्रंश भाषेत वनमालिका अशी संज्ञा फेरू वापरतो. या तयार करण्यासाठी २३ भाग चांदी, ७७ भाग तांबे यांचे रीस नामक मिश्रण हे विशिष्ट अपेक्षित भाग शुद्ध सोन्यात मिसळणे अभिप्रेत होते. या व्यवस्थेनुसार ४७ भाग शुद्ध सोने आणि १ भाग रीस मिळून ११ पूर्णांक (३/४) इतक्या वन्नी शुद्धतेचे सोने होत असे. याप्रमाणेच चांदीचीही शुद्धता १ ते २० या एककांत सांगून, सर्वांत शुद्ध चांदीला ‘विसुवाʼ चांदी असे संबोधले आहे. यासाठीच्या संदर्भशलाका तयार करण्यासाठीच्या मिश्रणात ४ भाग तांबे आणि १६ भाग पितळ यांच्या मिश्रणात कमीअधिक प्रमाणात शुद्ध चांदी मिसळली जात असे.

वितळवण्याच्या पद्धतीत प्रथम संबंधित धातूचे वजन करून उच्च तापमानाला वितळवून त्यातील भेसळ बाजूला करून पुन्हा वजन केले जात असे. या प्रक्रियेला फेरू ‘चासणीयʼ किंवा ‘चासनिकाʼ असे संबोधतो. हा शब्द फार्सी भाषेतील ‘चाशनीʼ या शब्दावरून आलेला आहे. सोने व चांदी हे धातू अन्य धातूंसोबत रासायनिक अभिक्रियेत भाग न घेता मिश्रणात वेगळेच राहतात, या निरीक्षणावर ही प्रक्रिया आधारित आहे. वितळावयाचा धातूचा तुकडा एका शंक्वाकृती भांड्यात ठेवण्यात येत असे. बोकडाच्या हाडाची राख, गायीचे शेण आणि पळसाचे लाकूड हे समप्रमाणात घेऊन एकत्र जाळून, त्याच्या राखेपासून, पाव शेर अर्थात २७५.०७५ ग्रॅम्सच्या वजनाचे भांडे बनवले जात असे. अशा भांड्यात धातू ठेवून, धव वृक्षाचा पाव मण (जवळपास ११ किलो) कोळसा वापरून वितळवला जात असे, हे फेरू नोंदवतो. शुद्ध करावयाच्या धातूत शिसे मिसळून तो वितळवला जात असे. हे शिसे अन्य भेसळीशी अभिक्रिया करून सोने/चांदीला वेगळे करत असल्याने याचा वापर होत असे. ही प्रक्रिया वारंवार केल्यास मिळणारा धातू अधिकाधिक शुद्ध असे. याच्याशी समकक्ष अन्य अधिक तपशीलवार प्रक्रियांचेही वर्णन फेरू करतो. चलनातील विविध प्रकारची नाणी शाही टांकसाळीत आणल्यावर ती वितळवून त्यांपासून शुद्ध सोने किंवा चांदीच्या लगडी बनवल्या जात. या लगडींपासून नवीन नाणी बनवली जात, तसेच त्या खजिन्यात आहे त्या स्वरूपातही जतन केल्या जात.

फेरू २६० प्रकारच्या नाण्यांचे नाव, ते नाणे पाडलेले शहर, वजन, त्यांतील धातूची शुद्धता आणि खिलजी नाण्यांमध्ये त्यांचा विनिमयदर हे तपशील देतो. सोने, चांदी, सोने-चांदी-तांब्याचा मिश्रधातू, चांदी-तांब्याचा बिल्लन नामक मिश्रधातू व तांबे अशी एकूण पाच प्रकारची नाणी यात वर्णिली आहेत. मिश्रधातूच्या नाण्यांमधील सोने व चांदीचे वजन त्या प्रकारच्या दर १०० नाण्यांमागे दिलेले आहे. नाण्यांच्या वजनाकरिता त्याने वापरलेली एकके खालीलप्रमाणे आहेत :

१ विसुव = ०.००३ ग्रॅम.

२० विसुव = १ जव (०.०५७ ग्रॅम).

१६ जव = १ माष (०.९१७ ग्रॅम).

४ माष = १ टंका (३.६६८ ग्रॅम).

३ टंका = १ तोळा (११.००३ ग्रॅम).

२० तोळा = १ शेर (२२०.०६ ग्रॅम).

४० शेर = १ मण (८.८०२ किलोग्रॅम).

तत्कालीन हिशेबाचे प्रमुख एकक म्हणजे गानी नामक नाणे होते. तांबे व चांदीच्या बिल्लन नामक मिश्रधातूपासून बनलेले १ गानी हे नाणे तोळ्याच्या बाराव्या भागा इतक्या वजनाचे होते. याखेरीज २, ४, ६, ८, १२, २४, ४८ गानी वजनाची नाणीही चलनात असत. प्रत्येक नाण्याविषयीची माहिती श्लोकबद्ध स्वरूपाखेरीज वेगळ्या सारणीत अंकरूपानेही नमूद केलेली आहे. नाण्यांची मांडणी बहुतांशी प्रदेशवार/साम्राज्यवार असून, त्या त्या विभागात कालानुक्रमे वेगवेगळ्या राजांनी पाडलेली नाणी दिलेली आहेत. उदा., गुजरात विभागातील काही नाणी देतानाचा क्रम पुढीलप्रमाणे आहे: कुमारपुरी (कुमारपाल चालुक्य, इ. स. ११४४–७३); अजयपुरी (अजयपाल चालुक्य, ११७३-७५); भीमपुरी (भीम चालुक्य, ११७८–१२४१); लुणवसा/लवणसपुरी (लावण्यप्रसाद वाघेला, १२४२-४३); विसालपुरी (विशालदेव वाघेला, १२४४–६२); अज्जनपुरी (अर्जुनदेव वाघेला, १२६४–७३). या नाण्यांच्या नावांमधील ‘पुरीʼ प्रत्यय हा ‘प्रियʼ प्रत्ययाचा अपभ्रंश असल्याचे अन्य साधनांवरून लक्षात येते. गुजरात व माळव्यातील नाण्यांकरिता ही पद्धत वापरात होती.

यात सर्वांत मोठा भाग हा दिल्लीतील राजांच्या नाण्यांनी व्यापला आहे. अनंगपाल तोमर (इ. स. १०५१-८१) पासून ते कुतुबुद्दीन मुबारकशाह खिलजी पर्यंतच्या राजांचा यात समावेश आहे. खिलजीपूर्वकालीन सुलतानांनी पाडलेली चांदीची नाणी ज्ञात असली, तरी फेरू मात्र केवळ त्यांच्या बिल्लन मिश्रधातूच्या नाण्यांचाच उल्लेख करतो. याचे कारण, बहुधा फेरूच्या वेळी यांची फक्त बिल्लन धातूची नाणीच चलनात होती, असा संशोधकांचा तर्क आहे. इतर कुणाही शासकांपेक्षा अल्लाउद्दीन खिलजी आणि कुतुबुद्दीन मुबारकशाह खिलजी यांनी पाडलेल्या नाण्यांची माहिती फेरू सर्वांत जास्त तपशीलवार आणि अचूकपणे देतो.

अल्लाउद्दीनने अनेक प्रकारची नवी नाणी पाडली. दुगानी (२ गानी) व चगानी (४ गानी) प्रकारची प्रत्येकी दोन, एक प्रकारची इगानी (१ गानी), एक प्रकारचे सोन्याचे दिनार प्रकारातील नाणे, तसेच १ तोळा वजनाचे चांदीचे टंका प्रकारातील नाणे आणि १, ५, १०, ५०, १०० तोळे वजनाची सोन्याची नाणी पाडली. यांपैकी मोठ्या वजनाची सुवर्ण नाणी ही दैनंदिन व्यवहाराऐवजी विशेष प्रसंगी दिली जात. उदा., राज्याभिषेकप्रसंगी किंवा परदेशी वकिलांना भेट म्हणून. याखेरीज अल्लाउद्दीनच्या अनेक प्रकारच्या तांब्याच्या नाण्यांचा मात्र उल्लेख फेरू करत नाही. तो अल्लाउद्दीनचा उल्लेख ‘अश्वपती महानरेंद्र पातिसाहि अलावदीʼ असा करतो; परंतु त्याच्या अरबी बिरुदावलीचा उल्लेख मात्र करत नाही. अल्लाउद्दीनच्या मरणोत्तर त्याचा सेनापती मलिक काफूरने अल्लाउद्दीनचा सहा वर्षीय मुलगा शहाबुद्दीन उमर याला गादीवर बसवून त्याच्या नावे राज्यकारभार सुरू केला. त्याच्या काळात प्रत्येकी १ तोळा वजनाची चांदी व सोन्याची टंका प्रकारातील नाणी फेरू नमूद करतो. त्या खेरीज पाच गानी प्रकारातील नाण्यांचाही उल्लेख सापडतो.

शहाबुद्दीन उमर गादीवर बसल्यावर दोनच महिन्यांत त्याचा मोठा भाऊ कुतुबुद्दीनने तुरुंगातून सुटून त्याची हत्या केली व गादीवर बसला. फक्त चार वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तब्बल त्रेसष्ट प्रकारची विविध नाणी पाडली. बत्तीस प्रकारची सोन्याची, वीस प्रकारची चांदीची, तसेच सात प्रकारची दम्म वर्गीय आणि चार प्रकारची तांब्याची नाणी यांत समाविष्ट होती. १३१८ साली सोने व चांदीच्या टंका प्रकारातील नाण्यांचा आकार गोलाकाराऐवजी चौकोनी करण्यात आला. दिल्ली आणि कुत्बाबाद (दौलताबाद) या दोन ठिकाणी मुख्य टांकसाळी होत्या, याची नोंद फेरूने केलेली आहे. पूर्वीप्रमाणेच याही वेळी नाण्यांवरील अरबी बिरुदांचा उल्लेख मात्र सापडत नाही.

इ. स. १९३६ साली नेल्सन राइट या संशोधकाने दिल्ली सुलतानांच्या नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करून द कॉइनेज अँड मेट्रोलॉजी ऑफ द सुलतान्स ऑफ दिल्ली हा ग्रंथ प्रकाशित केला. यात त्याने आधुनिक पद्धतीने नाण्यांची शुद्धता तपासून आकडेवारी दिलेली आहे. द्रव्यपरीक्षा हा ग्रंथ १९६१ मध्ये प्रथम प्रकाशित झाल्यानंतर नाणकशास्त्रज्ञांनी त्यातील आकडेवारी नेल्सन राइटकृत ग्रंथाशी ताडून पाहिली असता दोहोंमध्ये एकवाक्यता आढळते. त्यानंतर जॉन डेयेल या संशोधकानेही विविध गानीवर्गीय नाण्यांची शुद्धता तपासली व त्यातून मिळालेली आकडेवारीत फेरूच्या आकडेवारीपेक्षा जास्तीतजास्त ४% इतका कमी फरक दिसून आला. अन्य नाण्यांच्या तुलनेत खिलजी सुलतानांच्या नाण्यांबद्दलचे निष्कर्ष अधिक अचूक आढळतात. अंदाजे सातशे वर्षांपूर्वीच्या ग्रंथातील आकडेवारी आधुनिक काळाशीही इतकी उत्तम जुळणे हे खूपच उल्लेखनीय आहे.

संदर्भ :

  • Agrawala, V. S. ‘Ṭhakkura Pherū viracitā Prākṛtabhāṣābaddhā Dravyaparīkṣāʼ, Indian Numismatic Chronicle, 1964-65.
  • Sarma, Sreeramula Rajeswara, A Jain Assayer at the Sulṭān’s Mint. Ṭhakkura Pherū and his Dravyaparīkṣā, Jaina Studies : Proceedings of the DOT 2010 Panel in Marburg, Germany, 2012.

                                                                                                                                                                                  समीक्षक : सचिन जोशी