चॅटर्जी, मार्गारेट : (१३ सप्टेंबर १९२५—३ जानेवारी २०१९). भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ व लेखक. एडिथ हिकमन व नॉर्मन गॅन्झर ह्या दांपत्याची मार्गारेट ही एकुलती एक लेक. बालपण इंग्लंडमधील डॉर्सेटमध्ये गेले. पार्कस्टोन ग्रामर स्कूल व ऑक्सफर्डच्या सॉमरव्हिले महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. वडील भारतात प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्याकडून बाळपणी प्राथमिक धडे गिरवले. पुढे तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हे विषय शिकत असताना भारतातील इंग्रजीचे प्राध्यापक नृपेंद्रनाथ चॅटर्जी १९४३ मध्ये भेटले. नृपेंद्रनाथ हे उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला आले होते. १९४६ मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना मलय, नीलिमा व अमला ही तीन अपत्ये झाली. वयाच्या ७५ व्या वर्षी म्हणजे १९८३ साली नृपेंद्रनाथ यांचे निधन झाले.

स्त्री शिक्षणात पुढाकार घेणाऱ्या दिल्लीतील मिरांडा हाऊसमध्ये तसेच ऑक्सफर्डचे वेस्टमिन्स्टर महाविद्यालय व शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठ येथे मार्गारेट यांनी ठरावीक कालावधीसाठी अध्यापन केले असले, तरी त्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे तत्त्वज्ञान विभाग, दिल्ली विद्यापीठ, हे होय. १९८६ ते १९८९ दरम्यान सिमल्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज’चे संचालकपद त्यांनी भूषविले. ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मेटॅफिजिक्स’च्या उपाध्यक्षपदीही त्या विराजमान झाल्या. केंब्रिज विद्यापीठातील त्यांचे ‘द कन्सेप्ट ऑफ स्पिरिच्युॲलिटी’ हे व्याख्यान सुप्रसिद्ध आहे. न्यूयॉर्कच्या ‘कमिटी फॉर सायंटिफिक एक्झॅमिनेशन ऑफ रिलिजन’च्या त्या सदस्या होत्या.

लहानपणापासून धर्म व संगीत ही त्यांच्य विशेष आवडीची क्षेत्रे. ज्यू धर्म, अभिजात पाश्चात्त्य संगीत ह्या दोन क्षेत्रात त्या रममाण होत. स्टेट्‌समन  ह्या वृत्त्तपत्रात त्यांनी नियमितपणे संगीतसमीक्षा लिहिली, पियानोचे स्वर जाणकारीने आळवले. परिणामी त्यांनी जे वैविध्यपूर्ण विचार मांडले, त्यात ही जाणकारी प्रतिबिंबित झाली.

समाजातील प्रचलित समजुती, तत्त्वज्ञानातील रूढ विचारप्रवाह, विविध ज्ञानशाखा ह्यांचा मेळ मार्गारेट यांच्या विचारात सहजपणे प्रकटतो. वेदांतमत, जैनमत, ह्यूसेर्ल, जॉर्ज एलियट आणि वेदविचार एकाच विचारशृंखलेत चपखल बसवून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांची हातोटी शेफाली मोइत्रांसारख्या नामवंत प्राध्यापकांनी श्रद्धांजलीत नोंदलेली आढळते. १९६७–२०११ दरम्यान त्यांनी लिहिलेल्या कवितांचे पाच संग्रह प्रसिद्ध आहेत. अस्तित्ववाद, धर्म, ज्यू धर्म, गांधीजींचे ज्यू मित्र, गांधीजी-बूबर यांच्या तत्त्वविचारातील साम्यभेद, गांधीजींना अभिप्रेत असणारी बहुधार्मिकता ह्या संदर्भातील त्यांचे लेखन सर्वश्रुत आहे. त्यांच्या विपुल साहित्यातील निवडक ग्रंथ पुढीलप्रमाणे : अवर नॉलेज ऑफ अदर सेल्वेज (१९६३), द स्प्रिंग अँड द स्पेक्टॅकल (१९६७), फिलॉसॉफिकल इन्क्वायरीज (१९६८), टुवर्ड्स द सन (१९७०), द सॅंडलवूड ट्री (१९७२), द साऊंड ऑफ वाइंड्स (१९७८), द लँग्वेज ऑफ फिलॉसॉफी (१९८१), गांधीज रिलिजिअस थॉट (१९८३), द रिलिजिअस स्पेक्ट्रम (१९८४), द रिमलेस वर्ल्ड (१९८७), द फिलॉसॉफी ऑफ निकुंजबिहारी बॅनर्जी (१९९०), गांधी अँड हिज ज्यूईश फ्रेंड्स (१९९२), स्टडीज इन मॉडर्न ज्यूईश अँड हिंदू थॉट (१९९७), कंटेम्पररी इंडियन फिलॉसॉफी (१९९८), हिंटरलँड्स अँड हॉरिझन्स (२००२), द कन्सेप्ट ऑफ स्पिरिच्युअल लँडस्केप (२००५), गांधी अँड द चॅलेंज ऑफ रिलिजिअस डायव्हर्सिटी (२००५), लाईफवर्ड्स अँड एथिक्स (२००६), गांधीज डायग्नोस्टिक अप्रोच रिथॉट (२००७), सर्कम्स्टन्स अँड धर्म (२०१०), पोएम्स (२०११).

२०१३ मध्ये ‘भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेत’ जीवनगौरव पुरस्कार (लाईफटाईम अवॉर्ड) प्रदान करून त्यांचे तत्त्वज्ञानातील योगदान अधोरेखित केले गेले.

संदर्भ :

समीक्षक : हर्षा  बाडकर