संत गोन्सालो गार्सिया चर्च, वसई किल्ला.

फादर फ्रान्सिस झेव्हिअर नावाचा एक येशू संघीय (जेज्वीट) धर्मप्रचारक सोळाव्या शतकाच्या मध्यावर भारतात आला. धर्मप्रसाराचे कार्य करीत करीत तो जपानपर्यंत गेला. आपल्या मिशनरी कार्याविषयी त्या प्राध्यापकाने तेथून वेळोवेळी पत्रे लिहिली. यूरोपमधील लोकांना इथल्या पूर्वेकडील देशांत राहणाऱ्या लोकांची कल्पना यावी व यूरोपमधल्या संभाव्य धर्मप्रचारकांना मिशनरी होण्याची त्यांतून प्रेरणा मिळावी, हा त्या एकूण १३३ पत्रप्रपंचाचा हेतू होता. यूरोपमध्ये त्या पत्रांचे वेगवेगळ्या भाषांत भाषांतर झाले. त्या पत्रांनी यूरोपभर एक प्रकारची मिशनरी लाट पसरवली. त्यातून प्रेरणा घेऊन यूरोपमधून भारतात आलेले काही मिशनरीही पुढे जपानच्या किनाऱ्याकडे जायला निघाले, त्यातले एक होते फा. सेबॅस्टियन गोन्साल्वीस. वसई किल्ल्यात कार्यरत असताना आपल्यासोबत गोन्सालो नावाच्या एका किशोरवयीन मुलाला सोबत घेऊन फा. सेबॅस्टियन गोवामार्गे जपानच्या प्रवासाला जलमार्गाने निघाले.

गोन्सालोचे वडील हे पोर्तुगीज सैन्यात होते व त्याची आई मुळची वसई किनारपट्टीवरची होती. एक प्रकारच्या मिश्र-विवाहातून जन्माला आलेले हे बालक तसे तामसी व हुशार होते. व्यापारी वृत्ती त्याच्या रक्तात भिनलेली होती. जेज्वीट फादरांबरोबर निघाल्यामुळे जेज्वीट संघात प्रवेश मिळविण्याची त्याची इच्छा होती; परंतु तो नवख्रिस्ती असून धर्माच्या बाबतीत परिपक्व अशा परंपरेतून आला नसल्यामुळे त्याला जेज्वीट संघात प्रवेश मिळाला नाही. व्रतस्थ होण्यासाठी जेज्वीट संघाचा दरवाजा जरी त्याला बंद ठेवण्यात आला, तरी उपजत हुशारीच्या जोरावर तो तिथल्या स्थानिक भाषा शिकत गेला व फिलिपिन्स व जपान या देशांत व्यापार करण्यात त्याने आपला जम बसवला. तथापि, आपण मिशनरी व्हायलाच हवे, ही त्याची अंतरीची तगमग त्याला अस्वस्थ करून सोडत होती. म्हणून आता त्याने फ्रान्सिस्कन संघाकडे प्रवेश मागितला व तो त्याला मिळाला. ‘धर्मगुरू’ होण्यासाठी नव्हे; तर एक ‘धर्मबंधू’ होण्यासाठी.

संत गोन्सालो गार्सिया यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना जपानमध्ये बऱ्याच खस्ता खाल्ल्या. त्यांच्या विधायक प्रकल्पांना तशी प्रसिद्धीही मिळाली. त्यांनी जशी अनाथालये काढली; तसेच रुग्णालयेही सुरू केली. जपानमधील सर्वेसर्वा सम्राट हिदेयोशी याच्या आदेशानुसार फादर पॉलमिकी या येशू संघीय धर्मगुरू सोबत ४० वर्षीय ब्रदर गोन्सालो गार्सिया यांना देखील पकडण्यात आले व २६ धर्मप्रचारकांना नागासाकीच्या टेकडीवर क्रूसावर खिळण्यात आले. प्रभू ख्रिस्ताकरता आत्मबलिदान करणारा व रोम दरबारी ज्याला ‘संतपद’ बहाल करण्यात आले त्यांतला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा पहिलावहिला रक्तसाक्षी. वसई ही या संताची जन्मभूमी असल्यामुळे व ते भारताचे पहिलेवहिले ‘संत’ म्हणून जाहीर झाल्यामुळे, वसई नगरीत त्यांच्या जन्मभूमीला आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले. वसई किल्ल्याच्या छायेत ते लहानाचे मोठे झाले होते व तेथील जेज्वीट फादरांच्या विद्यालयात त्यांनी आपले शिक्षण घेतले होते. म्हणून ते विद्यालय व चर्च आज ‘संत गोन्सालो गार्सिया तीर्थक्षेत्र’ म्हणून गणले गेले आहे. एका ‘रक्तसाक्षी’ची ही भूमी असल्यामुळे स्थानिक ख्रिस्ती लोकांच्या दृष्टीने हे तीर्थक्षेत्र महत्त्वाचे असून त्याचे दर्शन घेण्याची इच्छा साहजिकच त्यांच्या मनात येते. शिवाय, वर्षाकाठी नाताळच्या सणानंतर इथे एक मोठा सोहळा देखील घडवून आणतात.

संत गोन्सालो गार्सिया यांचा चतुर्थ जन्मशताब्दी सोहळा इ.स. १९५७ ह्या वर्षी वसई किल्ल्यातील संकुलात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे इ.स. १९९७ या वर्षी चतुर्थ शताब्दी स्मृतिदिनदेखील इथे तितक्याच थाटामाटात साजरा करण्यात आला. १८६२ या साली वसईच्या या भूमिपुत्राचे नाव संतपदाच्या मालिकेत रोवले गेल्यामुळे २०१२ हे वर्ष संतपदाचे १५० वे वर्ष या किल्ल्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. या विविध घटनांमुळे ख्रिस्ती लोक वसई किल्ल्यातील संत गोन्सालो गार्सिया तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा मनात बाळगत असतात.

संदर्भ :

  • कोरिया, फ्रान्सिस, सामवेदी ख्रिस्ती समाज (सांस्कृतिक इतिहास), मुंबई, १९९८.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रेटो