यू. आर. अनंतमूर्ती : (२१ डिसेंबर १९३२ – २२ ऑगस्ट २०१४). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कन्नड साहित्यिक. त्यांचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील मेलिगे या छोट्या गावात झाला होता. योगायोग असा की, कन्नडमधील एक प्रमुख लेखक महाकवी कुवेंपु (कुप्पलि वेंकटप्प पुट्टप्प) हे देखील याच तालुक्यातील होते. त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरूवात दूरवासपुरा मधील एका संस्कृत विद्यालयातून केली होती. त्यानंतर त्यांनी इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्य या संबंधातील शिक्षण म्हैसूर आणि बर्मिंघम (इंग्लंड) येथून घेतले. १९६६ मध्ये त्यांनी बर्मिंघम विश्वविद्यालयातून ‘१९३० मधील राजकारण आणि साहित्य’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून पी. एच. डी. ही पदवी प्राप्त केली होती. १९८० मध्ये म्हैसूर विश्वविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९८२ मध्ये शिवाजी विश्वविद्यालयात तसेच १९८५ मध्ये आयावो विश्वविद्यालयात ते व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून म्हणून त्यांनी कार्य केले. महात्मा गांधी विश्वविद्यालय, कोट्टमचे कुलपती, नॅशनल बुक ट्रस्ट नवी दिल्ली आणि साहित्य अकादमी नवी दिल्लीचे ते अध्यक्षही होते. त्यांचे लग्न १९५६ मध्ये इस्तर अनंतमूर्ती यांच्याशी झाले होते. त्या दोघांची भेट १९५४ मध्ये झाली होती. त्यांना अनुराधा आणि शरत अशी दोन मुले आहेत.

अनंतमूर्ती यांची साहित्य संपदा : कथाएन्देन्दु मुगियद कथे (१९५५), प्रश्ने (१९६४), मौनी (१९७२), आकाश मट्टू बेक्कु (१९८१), एरडु दशकदा कथेगळु (१९८१); कादंबरीसंस्कार (१९६५), भारतीपुरा (१९८३), अवस्थे (१९७८), भव (१९७७); कवितासंग्रहमिथुन (१९९२); समीक्षासन्निवेश (१९७४), प्रज्ञे मत्तु परिसर (१९७४), पूर्वापार (१९८९) इत्यादी. अनंतमूर्ती यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, बांग्ला, मराठी, मल्याळम, गुजराती अशा अनेक भारतीय भाषांव्यतिरिक्त इंग्रजी, रूसी, फ्रेंच, हंगेरियन इत्यादी विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींवर चित्रपट आणि नाटके सादर करण्यात आली आहेत.

त्यांची पहिली कादंबरी संस्कार एक अशी विलक्षण साहित्यकृती आहे की, जिला आधुनिक भारतीय साहित्यातील एक चिरंतन रचना म्हणून मान्यता मिळाली. त्या कादंबरीने त्यांना भारतीय विचारवंतांमध्ये अग्रस्थान प्राप्त करून दिले. धर्म आणि मान्यता हे अंतर्द्वंद या कादंबरीत मांडून त्यांनी साहित्य विश्वात खळबळ उडवून दिली. त्यांचा पहिला कथासंग्रह एन्देन्दु मुगियद कथे  प्रकाशित झाला आणि आधुनिकतावादी विचारधारेतील महत्वाचे लेखक म्हणून त्यांना प्रश्ने  या त्यांच्या दुसऱ्या कथासंग्रहापासून मान्यता मिळाली. समकालीन स्थितीवर आपल्या बहुआयामी अभिजात दृष्टीने, तसेच सूक्ष्म अध्यात्मिक चेतनेच्या माध्यमातून अनंतमूर्ती यांनी आधुनिक जीवनातील अंतर्विरोध आणि तणाव यावर मौलिक चिंतन आणि संशोधन केले आहे. जे त्यांच्या साहित्यातून प्रकट झाले.  कवीच्या रूपातील अनंतमूर्ती यांची अंतर्दृष्टी अगाध आहे. त्याचे प्रमाण त्यांच्या सर्व कवितासंग्रहातून मिळते. एक समीक्षक म्हणून अनंतमूर्ती यांनी साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक अंगावर भर देऊन कन्नड समीक्षेची दिशा बदलण्याची भूमिका पार पाडली आहे.

कुवेंपु आणि यू. आर. अनंतमूर्ती या दोघांनी वेगवेगळ्या कालखंडात या शतकातील कन्नड साहित्याच्या महान परंपरेला एक विशिष्ट स्वरूप प्रदान केले. हाही योगायोग आहे की, नवोदय अभियानाच्या संस्थापकापैकीच कुवेंपु हे एक होते. नव आधुनिकतावादाला आपल्या कथा साहित्यातून आणि सांस्कृतिक गुणदोषांच्या विश्लेषणाच्या माध्यमातून अभिजात रूप अनंतमूर्ती यांनी प्रदान केले. दुसऱ्या बाजूने असेही म्हणता येईल की, अनंतमूर्ती हे कुवेंपु आणि शिवराम कारंथ या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित यशस्वी साहित्यिकांनी निर्माण केलेल्या आधुनिक कन्नड साहित्याच्या महान परंपरेचे खरे उत्तराधिकारी होते. आधुनिक कन्नड साहित्याची गौरवशाली परंपरा निर्माण करण्यासंबंधी दोन परस्पर विरोधी मते आहेत. जसे वैज्ञानिक बुद्धिवाद आणि रहस्यात्मक अंत:प्रज्ञावाद, आक्रमक अतिवाद आणि मानवतावादी रूढीवाद. गंमतीची गोष्ट अशी की, विरोधी दृष्टीकोन एकाच लेखकाच्या सृजनात्मक आयुष्यामध्ये आपल्याला पहायला मिळतात. आणि हेच एक मोठ्या परंपरेचे सार देखील आहे. पण आश्च्यर्याची गोष्ट अशी की, कोणत्याही परमतत्वावर विश्वास न ठेवणाऱ्या अनंतमूर्ती यांनी या परंपरेचे कवच त्याच्या सगळ्या गुणदोषांसहित धारण केलेले होते. त्यांचा संपूर्ण सृजनात्मक प्रवास एका रागीट विद्रोही तरूणापासून सुरु होऊन, पारंपरिक रुढींनी युक्त अशा मानवतावादी लेखकापर्यंतचा महान रचनात्मक प्रवास होता.

अनंतमूर्ती यांना अनेक पुरस्कारांनी, सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. संस्कार  या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार (१९७०); घटश्राद्ध (१९७८) आणि बारा साठी श्रेष्ठकथा पुरस्कारा, कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९८३), मास्ति प्रशस्ती (१९९४), शिखर सन्मान, हिमाचल प्रदेश सरकार (१९९८), रचना समग्र सन्मान, भारतीय भाषा परिषद कोलकाता (२००३), तसेच इतर अन्य साहित्यिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.  या व्यतिरिक्त रवींद्र भारती विश्वविद्यालय कोलकाता यांच्याकडून डी. लीट. या मानद उपाधीने सन्मानित (१९९५), पद्मभूषण (१९९८), १९७४ ते ९३ या कालावधीतील भारतीय साहित्यातील योगदानासाठी साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

बंगळुरू येथे त्यांचे निधन झाले.