एम. टी. वासुदेवन नायर : (१५ जुलै १९३३). मल्याळम साहित्यातील विख्यात लेखक. पटकथाकार, चित्रपट दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म कुटल्लुर, जिल्हा पालक्काट, केरळ इथे एका गरीब कुटुंबात झाला. ब्रिटीश राज्यात ते गाव मद्रास प्रेसिडेन्सीत मालाबार जिल्ह्यात होते. त्यांच्या वडिलांचे नांव टी. नारायणन नायर असे होते. तर आईचे नाव अम्मुल अम्मा असे होते. चार भावंडात ते सगळ्यात छोटे होते. त्यांचे वडील सिलोन मध्ये असत. त्यांनी प्राथमिक शिक्षण मालव्कावु एलिमेंटरी स्कूल आणि कुमार नेलोर हायस्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला. १९४९ मध्ये त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी १९५३ मध्ये विक्टोरिया कॉलेज, पलक्कड इथून रसायन शास्त्रात पदवी मिळवली. त्यांनी पट्टाम्बि बोर्ड हायस्कूल आणि चार्वाक बोर्ड हायस्कूल इथे एक वर्ष गणित हा विषय शिकवला. १९५५-५६ मध्ये त्यांनी ट्युटोरियल कॉलेज पलक्कड इथे प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांनी १९६५ मध्ये लेखिका आणि अनुवादिका प्रमेला यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर ११ वर्षांनी ते दोघे विभक्त झाले. त्या लग्नापासून त्यांना एक सीथारा नावाची मुलगी आहे. ती अमेरिकेत व्यावसायिक आहे. १९७७ मध्ये त्यांनी नृत्य कलाकार कालामंडलम् सरस्वती यांच्याशी लग्न केले. त्या लग्नापासूनही त्यांना आसवती नायर ही एक मुलगी आहे.
एम. टी. वासुदेवन नायर हे ‘ एम. टी.’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ते आधुनिक मल्याळम साहित्यातील एक विपुल लिहिणारे बहुमुखी लेखक आहेत. एम. टी. यांनी मल्याळम मध्ये जेंव्हा कथालेखन करायला सुरुवात केली, त्यावेळी या साहित्यप्रकारात प्रगतीवादी लेखकांचे वर्चस्व होते. त्यांचा संबंध जातीयतेने पिडल्या गेलेल्या समाजाशीच होता. आपल्या भोवतीच्या समाजाविषयी आस्थेने लिहिणारे बैक्कम मोहम्मद बशीर हेच एकमात्र याला अपवाद होते. एम. टी. यांनी काही प्रेरणा बशीर यांच्याकडून आणि काही प्रेरणा आपल्यापेक्षा वरिष्ठ साहित्यिक कोविलम, उरुब आणि एस. के. पोट्टेकाट यांच्या सारख्या साहित्यिकांकडून घेतली. या लेखाकांशिवाय एम. टी. यांनी आपल्या समवयस्क असलेल्या लेखिका श्रीमती कमलादास आणि टी. पद्मनाभन इत्यादी साहित्यिकांच्या बरोबरीने मल्याळम कथासाहित्याला एका निर्णायक वळणावर आणले. त्यानंतरच साहित्यातून आत्म्पपरकता मुखर होऊन समोर येऊ लागली.
विद्यार्थीदशेत असतानाच त्याना विश्वलघुकथा स्पर्धेत मल्याळममध्ये सर्वश्रेष्ठ लघुकथेसाठीचा पुरस्कार मिळाला होता. ‘वळस्तु मृगगळ’ (पाळीव प्राणी) ह्या त्यांच्या सुरवातीच्या कथेत पुढे त्यांच्या साहित्याची ओळख बनलेली सगळी वैशिष्टे आहेत. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांचा पहिला कथासंग्रह रक्तम पुरण्टा मणतरीकळ हा प्रकाशित झालेला होता. त्यांची पहिली कादंबरी नालुकेट्टू (१९५४) ही त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी लिहिली. या कादंबरीत केरळ मधील नायर समुदायात शेवटाला आलेल्या मातृसत्ताक समाजव्यवस्थेचे चित्रण आहे. अपमान, आक्रोश आणि बदला घेण्याची भावना याचे सजीव चित्रण त्यात होते, जे ग्रामीण मध्यमवर्गातील तरुणांच्या अनुभवाच्या अत्यंत जवळचे होते. त्यामुळे ती कादंबरी केवळ लोकप्रियच झाली नाही तर त्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांची दुसरी कादंबरी असुरवित्तु ही नालुकेट्टु ही कादंबरी जिथे संपते तिथेच सुरू होते. पहिल्या कादंबरीत अप्पुण्णि आपल्या पूर्वजांचे घर उध्वस्त करू इच्छितो. तर दुसऱ्या कादंबरीत गोविंदकुट्टि नावाचा प्रतिनायक आपले वडील, कुटुंब आणि जातीतील लोक यांना एक एक करून सोडून जातो. आणि एक पूर्ण व्यवस्था उध्वस्त करतो. स्त्री किंवा पुरुषांमध्ये असलेली एकाकीपणाची मुलभूत भावना ते मंजू (१९६४) या कादंबरीतून चित्रित करतात. त्याविषयी नवा दृष्टीकोन देतात. रंटामषम (१९८४) ही कादंबरी महाभारतातून घेतलेली आहे. यातील मिथकीय पात्रे ही आपली अनैसर्गिक अनैतिकता सोडून पूर्ण मानवीय होऊन आपल्यासमोर येतात. यात लेखकाने पौराणिक पात्रांना पार्थिवाच्या पातळीवर आणले आहे असा त्यांच्यावर आरोप आहे. पण या कादंबरीचा उद्देशच मूर्तीभंजन हा आहे. एम. टी. हे केवळ कथाकार किंवा कादंबरीकार नाहीत. त्यांनी गोपुरनटयिल सारखे नाटक, निर्माल्यम्, पेरूम्तच्चन, ओरुवट्कन वीरगाथा आणि वैशाली या सारख्या चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. त्यात सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांना ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
आज केरळात एम. टी. यानीं आराध्यदेवतेसारखा मान आहे. त्यांच्या कथालेखनाला आधुनिक, उत्तर आधुनिक अशी प्रतिमाने चिकटवली गेली. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीप्रमाणे त्यांचे साहित्य या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. त्यापैकी काही इथे नोंदवीत आहे. मातृभूमी या वृत्तपत्राद्वारे आयोजित विश्व लघुकथा स्पर्धेतत त्यांच्या ‘वलस्तु मृगंगल’(पाळीव प्राणी) यासाठी प्रथम पुरस्कार, कालम (कादंबरी) साठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९७०), रंटामूषम ( दुसरे वळण-१९८४) या कादंबरीसाठी वलयार पुरस्कार, १९७५ ते ९४ या कालावधीत मल्याळम साहित्य लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार, १९९५ मध्ये मल्याळम साहित्यातील त्यांच्या समग्र योगदानासाठी त्यांना भारतातील सर्वोच्य साहित्य पुरस्कार नजन पेडियम त्यांना प्राप्त झाला. वल्लथोल पुरस्कार, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार तसेच २०१३ मध्ये त्यांच्या मल्याळम चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी जी. सी. डॅनियल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
संदर्भ :
- http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/m_t_vasudevan_nair.pdf