पेरैरा, आंतॉनियू : (९ मे १८८३–१६ मार्च १९५५). विख्यात कायदेतज्ज्ञ व इतिहास संशोधक. ए. बी. द. ब्रागांस परैरा म्हणूनही परिचित. त्यांचा जन्म गोवा राज्यातील उत्तडे (ता. साष्टी) या गावी एका क्षत्रिय कॅथलिक जमीनदार घराण्यात झाला. पणजी येथे लिसेवचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते पोर्तुगालला गेले. तेथील प्रख्यात कोइंब्रा ह्या प्राचीन विद्यापीठात कायद्याची एम. ए. पदवी प्राप्त करून ते भारतात परतले.

पेरैरा यांची वयाच्या २६ व्या वर्षी मुरुगावच्या म्युनिसिपल न्यायाधीश पदावर नेमणूक झाली (१९०९–१५). ही जागा तात्पुरती असल्याने पुढे त्यांची डिचोली (Bicholim) येथे पोर्तुगीज रिपब्लिकचे प्रतिनिधी (सरकारी वकील) म्हणून नेमणूक झाली (१९१५). येथे ते एक वर्षच होते. पुढे त्यांची प्रथम श्रेणीचे न्यायाधीश म्हणून दमणला बढतीवर बदली झाली (१९१६). दमणमध्ये चार वर्षे न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर त्यांची डिचोलीला बदली करण्यात आली, तिकडून ते बार्देश तालुक्यात आले. त्यांचे बदलीचे सत्र सुरू असताना त्यांची आफ्रिकेत मोझांबिक येथील न्यायालयात वरिष्ठ न्यायमूर्ती म्हणून बढतीवर नेमणूक झाली (१९२४-३१). आफ्रिकेतील काम चालू असताना पुन्हा त्यांची पणजी, गोवा येथील न्यायालयात बदली झाली (१९३१). ९ मे १९४८ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी ते वरिष्ठ न्यायमूर्ती या पदावरून सेवानिवृत्त झाले.

पेरैरा इतिहास संशोधकही होते. पोर्तुगीज सरकारने त्यांची विद्वता लक्षात घेऊन त्यांच्याकडे अनेक कामे सोपविलेली होती. पोर्तुगालच्या सर्वोच्च विधी सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती (१९२९). ते पणजी येथील पुराभिलेखागार व संग्रहालयाचे अध्यक्ष होते (१९३१–५१). पणजीच्या न्यायालयात काम करत असताना त्यांनी गोवा पुराभिलेख आणि संग्रहालयाची पुनर्रचना करून विपुल संशोधन केले. याच संशोधनातून पोर्तुगीज ओरिएंटल (Arquiro Portugues Oriental) ही दहा खंडांची ग्रंथमाला त्यांनी संपादून प्रकाशित केली. या ग्रंथमालेत बहुमोल अशा हजारो अस्सल कागदांचा समावेश आहे. त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथांची आणि त्यांच्या संशोधनाची ख्याती यूरोपपर्यंत पसरली. स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील आंतरराष्ट्रीय इतिहास संस्थेने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आयोजित एका मोठ्या परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला (१९५०).

पेरैरा यांनी अनेक पोर्तुगीज नियतकालिकांतून इतिहास आणि कायदा या दोन्ही विषयांवर विपुल लेखनकार्य केले. पोर्तुगीज ओरिएंटल या ग्रंथमालेखेरीज पेरैरा यांचे मौलिक ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : चातुर्वर्ण्याचा इतिहास, अरब लोकांचे दहाव्या शतकांतील हिंदुस्थानातील वास्तव्य, गोमंतकाचा राजा गुहल्लदेव याची सोमनाथची तीर्थयात्रा, पोर्तुगीज आणि वसई, पौर्वात्य देशांतील पोर्तुगीज राजनीतीचा इतिहास, दीव येथील पोर्तुगीज राजवट, प्राचीन गोमंतक इत्यादी. त्यांचा मराठ्यांच्या इतिहासाची साधने, पोर्तुगीज दफ्तर-खंड तिसरा आशिया विभाग (भाग १ ते ५; १६६३–१७३९) हा संपादित ग्रंथ भारतातील पोर्तुगीजांचा विशेषत: मराठा-पोर्तुगीज संबंध अभ्यासण्यासाठी महत्त्वाचा आहे. पेरैरा यांनी एकूण ३४ ग्रंथांचे लेखन केले. त्यांचे हे सर्व लेखन पोर्तुगीज भाषेत आहे.

पोर्तुगीज सरकारच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर ते बंगलोर येथे स्थायिक झाले. तेथेच त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • डिसोझा, टिटॉनियो, हेराल्ड ओपिनियन, गोवा, ४ जुलै २००९.
  • पिसुर्लेकर, पां. स. संपा., मराठ्यांच्या इतिहासाची साधने, पोर्तुगीज दफ्तर, खंड दूसरा, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७४.

                                        समीक्षक : अवनीश पाटील