मोबाइलवर कार्यरत असणारी परिचालन प्रणाली. मोबाइल परिचालन प्रणाली हे सॉफ्टवेअरचे व्यासपीठ असून त्यावर इतर प्रोग्राम कार्यरत असतात. याला मोबाइल ओएस (Mobile OS) असेही म्हणतात. प्रामुख्याने ही परिचालन प्रणाली मोबाइलसम साधनावर कार्यरत राहण्यासाठीच तयार करण्यात आलेली आहे. उदा., मोबाइल फोन (Mobile), स्मार्टफोन (Smartphone), पीडिए (PDA), टॅबलेट संगणक (Tablet Computer) आणि इतर हाताळण्यायोग्य उपकरणे इत्यादी.
डेस्कटॉप किंवा लॅपटॉप संगणकावर ज्याप्रमाणे लिनक्स (Linux) किंवा विंडोज (Windows) परिचालन प्रणाल्या नियंत्रण करतात, त्याचप्रमाणे मोबाइल परिचालन प्रणाली ही मोबाइलवरसम साधनांवर नियंत्रण करते. ती मोबाइलवर कार्य आणि वैशिष्ट्ये निर्धारित करण्याकरिता जबाबदार असते. उदा., किबोर्ड, डब्ल्युएपी, अनुप्रयोगाचे अद्ययावतीकरण, ई-मेल, टेक्सट मॅसेज आणि इतरही काही. मोबाइल परिचालन प्रणाली ही तृतीय-पक्ष अनुप्रयोग वापरले जाणार अथवा नाही, हे सुद्धा निर्धारित करतात.
सामान्यत: आधुनिक मोबाइल साधनांवर स्पर्शपटल (टचस्क्रीन; Touchscreen), ब्लुटूथ (Bluetooth), वाय-फाय (Wi-fi), ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (Global Positioning System), कॅमेरा (Camera), व्हॉइस रेकॉर्डर (Voice recorder), संगीत प्लेअर (Music Player), इन्फ्रारेड ब्लास्टर (Infrared Blaster) इत्यादीसारखे कार्ये आवश्यक मानले जातात, ते नियंत्रित करण्याचे कार्य परिचालन प्रणालीमार्फत होते.
मोबाइल परिचालन प्रणालीचे प्रकार : अँड्रॉइड (Android) : अँड्रॉइड परिचालन प्रणाली ही गुगलचे (Google) खुले आणि विनामूल्य सॉफ्टवेअरची रास आहे, ज्यामध्ये परिचालन प्रणाली, मिडलवेअर आणि इतर महत्त्वाचे अनुप्रयोग मोबाइल साधनांवर विशेषत : स्मार्टफोनवर वापरांसाठी समाविष्ट असतात. अँड्रॉइड मोबाइल परिचालन प्रणालींच्या नवीन आवृत्त्यांची नावे मिष्टान्नावर आधारित विकसित करण्यात आलेली आहेत. जसे की, कपकेक (Cupcake), डोनट (Donut), इक्लेअर (Eclair), जिंजरब्रेड (Gingerbread), हनीकॉम्ब (Honeycomb), आइस क्रीम सँडवीच (Ice Cream Sandwich) इत्यादी. प्रत्येक नवीन आवृत्ती इंग्रजी वर्णानुक्रमे असून सुधारित आणि वाढीव वैशिष्ट्यांसह आहे. [अँड्रॉइड].
बाडा (Bada) : बाडा हि सॅमसंग मोबाइल परिचालन प्रणालीच्या मालकीची आहे. ती 2010 मध्ये प्रथम सुरू करण्यात आली. ही परिचालन प्रणाली वापरण्यासाठी सॅमसंग वेव (Samsung wave) हा पहिला स्मार्टफोन होता. बाडा मोबाइल परिचालन प्रणालीचे बहुबिंदू-स्पर्शपटल (मल्टीपॉईंट-टच; Multipoint-touch), त्रिमितीय ग्राफिक्स (3D Graphics) आणि अनुप्रयोग डाउनलोड आणि स्थापित करणे ही वैशिष्ट्ये आहेत.
ब्लॅकबेरी (Blackberry) : ब्लॅकबेरी परिचालन प्रणाली ही रिसर्च इन मोशनने कंपनीच्या लोकप्रिय ब्लॅकबेरी हाताळण्यायोग्य साधनांवर वापरण्यासाठी तयार केलेली मोबाइल परिचालन प्रणाली आहे. ब्लॅकबेरी हे खासगी वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे. [ब्लॅकबेरी].
आयफोन (IPhone) : (आय-ओएस; iOS). ॲपलची आयफोन परिचालन प्रणाली ही सुरूवातीला आयफोन साधनांवर वापरण्यासाठी विकसित करण्यात आली होती. आता ती आयफोन, आयपॅड (iPad), आयपॅड-2 आणि आयपॅाड-टच (iPod Touch) सह अनेक ॲपलच्या साधनांना कार्यरत आहे. आय-ओएस मोबाइल परिचालन प्रणाली ही फक्त ॲपलनी बनविलेल्या साधनांवरच उपलब्ध आहे, कारण कंपनीने तृतीय-पक्षी परिचालन प्रणालीला याचे परवाना दिलेले नाही. ॲपलचे आय-ओएस परिचालन प्रणाली ही ॲपलच्या मॅक ओएस एक्स (Apple’s Mac OS X) प्रणालीपासून विकसित करण्यात आली आहे. [आयफोन].
मीगो (MeeGo) : मीगो ही संयुक्त मुक्त स्रोत मोबाइल परिचालन प्रणाली आहे. ती मुक्त स्रोत तंत्रज्ञानावर आधारित माइमो (Maemo; Nokia) आणि मोबलिन (Moblin; Intel) या दोन उत्पादकाचा परिणाम आहे. मीगो ही मोबाइल परिचालन प्रणाली स्मार्टफोन, नोटबुक, टॅबलेट, वाहनअंतर्गत माहिती प्रणाली इत्यादींसाठी इंटेलची वैशिष्ट्ये आणि एआरएमव्ही 7(ARM v7) चा आराखडा वापरून विविध उपकरणांवर कार्य करण्यासाठी तयार केलेली आहे.
पाम (Palm OS) : पाम परिचालन प्रणाली ही एक मालकी हक्क असलेली मोबाइल परिचालन प्रणाली आहे. ती सर्वप्रथम 1996 ला पायलट 1000 हँडहेल्डवर प्रकाशित झाली. पाम परिचालन प्रणालीच्या नवीन आवृत्त्यांमध्ये विस्तारित पोर्ट, नवीन प्रोसेसर, बाह्य मेमरी कार्ड, सुधारित सुरक्षा आणि एआरएम प्रोसेसर आणि स्मार्टफोनसाठी समर्थन समाविष्ट केले आहे. पाम परिचालन प्रणाली 5 (Palm OS 5) ही पडद्याच्या व्यापक पृथ्थकरणासोबतच, वायरलेस जोडणी आणि मल्टीमिडीया वाढीव क्षमतेला साहाय्य करते, त्यालाच गारनेट ओ-एस अथवा गारनेट परिचालन प्रणाली (Garnet OS) असे म्हणतात. [पाम परिचालन प्रणाली].
सिंबियन (Symbian) : सिंबियन मोबाइल परिचालन प्रणाली ही संप्रेषण आणि वैयक्तिक माहिती व्यवस्थापन (PIM) या कार्यक्षमतेवर उच्च-स्तरीय समाकलन करते. सिंबियन परिचालन प्रणाली ही समाकलित मेलबॉक्स, जावा आणि पीआयएम कार्यांच्या समाकलनासह यांद्वारे मिडलवेअरला वायरलेस संप्रेषणाला संयुक्तित करते. नोकियाने काही ओइएम आणि छोट्या समुदायांसह एकत्रित काम करण्याकरिता सिंबियन या परिचालन प्रणालीला पर्यायी, मुक्त आणि थेट प्रतिकृती अंतर्गत उपलब्ध करून तयार केले. परंतु नोकिया सिंबियनची मुक्त स्रोत विकसित प्रकल्प म्हणून देखभाल करत नाही.
वेब परिचालन प्रणाली (WEBOS/PALM/HP; webOS) : (वेब-ओएस). वेब परिचालन प्रणाली ही लिनक्स कर्नलवर (Linux kernel) आधारित एक मोबाइल परिचालन प्रणाली आहे. पाम परिचालन प्रणालीच्या विकसनानंतर पाम कंपनीने वेब-ओए ही त्यांची उत्तराधिकारी म्हणून विकसित केली होती. मोबाइल ओएस ची मालकी असलेली त्यानंतर एचपी (HP) आणि त्यानंतर वेब-ओएस (webOS) म्हणून एचपीच्या लेखनात आढळते. [वेब परिचालन प्रणाली].
विंडोज मोबाइल परिचालन प्रणाली (Windows Mobile OS) : विंडोज मोबाइल ही मायक्रोसॉफ्टची मोबाइल परिचालन प्रणाली स्मार्टफोन आणि मोबाइल उपकरणांमध्ये वापरली जाते. मोबाइल परिचालन प्रणाली ही विंडोज सीइ 5.2 कर्नल वर आधारित आहे. 2010 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज फोन 7 या नवीन स्मार्टफोन व्यासपीठाची घोषणा केली.
कळीचे शब्द : #परिचालनप्रणाली #mobile #microsoft #windows #iphone #palm #google #
संदर्भ :
समीक्षक : विजयकुमार नायक