रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. रायगड-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून पुण्याकडे जाताना १० किमी. अंतरावर, तसेच पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाट उतरल्यानंतर निझामपूर गाव आहे. निझामपूरपासून एक रस्ता रायगड पायथ्याच्या पाचाड गावाकडे जातो. या रस्त्यावर सु. ३ किमी. अंतरावर बोरवाडी गाव आहे. बोरवाडीपासून सु. २ किमी. अंतरावर मानगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मशीदवाडी नावाचे एक छोटे गाव आहे. गावाला लागूनच मानगड किल्ल्याचा डोंगर आहे. किल्ल्याचा डोंगर फार उंच नसून समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची सु. २३५ मी. आहे. किल्ल्याचा डोंगर हा बाजूच्या डोंगररांगेपासून सुटावलेला असून तो या मुख्य डोंगररांगेशी एका छोट्या खिंडीने जोडला गेला आहे.
मशीदवाडी गावातून एक प्रशस्त आणि फरसबंदी वाट मानगड किल्ल्यावर जाते. सु. १५ मिनिटांच्या छोट्या चढाईनंतर ही वाट मुख्य डोंगररांग व मानगड यांच्यामधील खिंडीत येते. या खिंडीत विंझाई देवीचे मंदिर आहे. सदर मंदिर जिर्णोद्धारीत आहे. मंदिर कौलारू आणि बाजूने बंदिस्त आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विंझाई देवीची मूर्ती आणि समोर एक छोटी दगडी समई आहे. मंदिर परिसरात काही देवतांच्या छोट्या दगडी मूर्ती विखुरलेल्या दिसून येतात. बाजूला दाट झाडी आहे. मंदिराच्या मागील बाजूने एक छोटी वाट किल्लावर जाते. ही वाट अरुंद आणि कातळात खोदलेली आहे. वाटेवर अनेक ठिकाणी कातळात पायऱ्या बांधलेल्या आहेत. सु. १० मिनिटांच्या खड्या चढाईनंतर किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. सदर दरवाजा हा पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचा आहे. मुख्य दरवाजा हा बाजूच्या दोन बुरुजांमध्ये असून त्याची कमान ढासळलेली आहे. कमानीचे दगड जवळच पडलेले दिसून येतात. कमानीच्या दगडावर एक कमळ आणि माशाचे शिल्प कोरलेले आहे. या दरवाजातून आत आल्यावर बाजूलाच कोनाड्यात वीर हनुमानाचे शिल्प आहे. उजवीकडे दगडावर एका स्त्रीचे शिल्प कोरलेले आहे. पुढे डाव्या बाजूला काटकोनात गडाचा दूसरा दरवाजा आणि काही बांधीव पायऱ्या लागतात. हा दूसरा दरवाजा आज पूर्णपणे उद्ध्वस्त अवस्थेत आहे. या ठिकाणाहून थोड्या अंतरावर कातळात खोदलेली एक प्रशस्त चौकोनी गुहावजा खोली आहे. या खोलीसमोर दोन पाण्याची टाकी आहेत. यांपैकी एक टाके खोलीला अगदी लागून, तर दुसरे टाके थोडेसे पुढे बुरूज आणि तटबंदीला चिकटून आहे. या गुहावजा खोलीला धान्यकोठार असे म्हणतात. या कोठारापासून वरती चढून गेल्यावर अगदी ५ मिनिटांत गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. ही चढण खडी असल्याने चढताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. अन्यथा दरवाजाकडे येऊन उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने गडमाथा गाठावा.
गड माथ्यावर दगडी जोते दिसून येते. ही गडाची दक्षिणेकडील बाजू आहे. पुढे उत्तरेकडे जाताना डाव्या बाजूला म्हणजेच मशीदवाडीच्या बाजूला कड्यामधे ठरावीक अंतरावर पाण्याची तीन टाकी दिसून येतात. गड माथ्यावरती एक पीराचे ठिकाण आहे. गडाच्या मध्यावरती काही दगडी जोती दिसून येतात. आणखी थोडे उत्तरेला एका उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आढळून येतात. येथे काही देवतांची शिल्पे आहेत. गडाच्या उत्तर टोकावर एक चोर दरवाजा आहे. या दरवाजात उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. पायऱ्या आणि दरवाजा चांगल्या स्थितीत आहेत. मुख्य दरवाजाकडे परत येताना गडाच्या पूर्वेला, डाव्या बाजूला कड्यामध्ये एकापाठोपाठ एक अशी पाण्याची सात कोरलेली टाकी आहेत. यांपैकी दोन खांब टाकी आहेत. पुढे थोड्या अंतरावर गडाचा मुख्य दरवाजा आहे. या ठिकाणी गडफेरी पूर्ण होते.
मानगड किल्ल्याचा विस्तार अगदी छोटा असून माथ्यावरती सपाटी आहे. त्यामुळे विशेषकरून पावसाळ्यात गडावर फिरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. संपूर्ण गड पाहणीसाठी अडीच ते तीन तास पुरेसे आहेत. गडावर एकूण १२ पाण्याची टाकी, ५ बुरूज, एक महादरवाजा, एक चोर दरवाजा तसेच माथ्यावर एक पिराचे ठिकाण, एका देवळाचे अवशेष, काही दगडी जोती आणि गडाला काही ठिकाणी तुरळक तटबंदी असे अवशेष आढळून येतात. तसेच मशीदवाडीपासून काही अंतरावर एका भव्य पुरातन शिवमंदिराचे अवशेष आढळून येतात. या मंदिराचे भक्कम जोते, त्यावर असलेला नंदी आणि काही वीरगळ व कोरीव दगड दिसून येतात.
स्वराज्याची राजधानी रायगडपासून वायव्येला सु. १५ किमी. अंतरावर हा मानगड किल्ला आहे. रायगडच्या संरक्षक फळीच्या किल्ल्यांमधील हा महत्त्वाचा किल्ला आहे. मानगडपासून मुरुड-जंजीर जवळ आहे. जंजिरेकर सिद्दीच्या आक्रमणाचा विचार करून हे आक्रमण रोखून धरणे, हेच मानगड किल्ल्याचे मुख्य काम होते. मानगड किल्ल्याचा विस्तार मोठा नसला, तरी गडावरील अवशेष पाहता पूर्वी हे एक महत्त्वाचे लढाऊ टेहळणी केंद्र असण्याची शक्यता आहे. शिवभारत या ग्रंथात मानगडचा उल्लेख महानगड असा येतो. पूर्वी मानगडचे सरनौबतीचे अधिकार फुले घराण्याकडे, तर हवालदार पद मोरे घराण्याकडे होते. १६६५ साली पुरंदर येथे झालेल्या मोगल मराठा तहामध्ये जे २३ किल्ले मोगलांना दिले, त्यात मानगडचा समावेश होता. १८१८ मध्ये ब्रिटिश कॅप्टन सॉपीट याने मानगड किल्ला जिंकून किल्ला आणि परिसरावर ब्रिटिश अमंल कायम केला.
संदर्भ :
- घाणेकर, प्र. के. भटकंती रायगड जिल्ह्याची, स्नेहल प्रकाशन, पुणे, २००७.
- जोशी, सचिन विद्याधर, रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव, बुकमार्क पब्लिकेशन, पुणे, २०११.
समीक्षक : सचिन जोशी