एक आसनप्रकार. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकृतिबंध पर्वताप्रमाणे तळाशी विस्तृत पाया व वर निमुळते शिखर असा दिसतो म्हणून या आसनाचे नाव पर्वतासन आहे.
कृती : पद्मासनात बसावे. दोन्ही हातांचे तळवे छातीसमोर नमस्कार मुद्रेत जोडावेत. दोन्ही हातांचे अंगठे व बोटे ही एकमेकांना स्पर्श करतील असे हात जोडावेत. मनगट ते कोपर हा हाताचा भाग जमिनीला समांतर ठेवावा. जोडलेले हात एका लयीत सावकाशपणे शरीराच्या मध्यरेषेवरून छाती, हनुवटी, नाक व कपाळ यांच्या समोरून माथ्यावर आणावेत. हात सरळ होईपर्यंत वर आणावेत. कोपरामध्ये हात ताठ राहतील याकडे लक्ष द्यावे व दोन्ही हाताचे पंजे एकमेकांना चिकटून राहतील याची काळजी घ्यावी. तसेच दोन्ही दंड कानांना चिकटून राहतील याकडे लक्ष द्यावे. नंतर हातांना वरच्या बाजूस ताण द्यावा व कमरेपासून ते हाताच्या बोटांपर्यंत याचा अनुभव घ्यावा. श्वासोच्छ्वास नैसर्गिक असावा व दृष्टी डोळ्यांच्या रेषेत सरळ ठेवावी. पापण्या बंद करून शरीरातील ताणाचा सुखकारक अनुभव घ्यावा. यथाशक्ती आसनाची स्थिर स्थिती प्राप्त करावी. ही अंतिम स्थिति आहे. आसन सोडताना सर्वप्रथम डोळे उघडावे व हात हळूहळू मस्तकावर आणावेत. पुन्हा एकदा दोन्ही हात शरीराच्या मध्यरेषेवरून कपाळ, नाक, हनुवटी व छाती समोर आणत खाली घ्यावे. जोडलेले हात सोडून पूर्वस्थितीत यावे.
लाभ : या आसनामुळे कमरेपासून वरील अंगावर ताण निर्माण होतो. मणक्यांमधील भागात रक्ताभिसरण चांगले होते व तेथील नाड्यांच्या जोड्या कार्यक्षम व बळकट होतात. मेरुदंडातील दोष दूर होण्यास मदत होते. छातीचा पिंजरा लवचिक होतो व श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते. स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर व वयात येणाऱ्या मुलींमध्ये, उरोजात उचित ताणस्थिति निर्माण होऊन तेथील दोष दूर होण्यास मदत होते. उंची वाढण्याच्या वयात, उंची वाढण्यास या आसनाची मदत होते.
विधिनिषेध : कुबड असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. मेरुदंडाचे आजार व दोष असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. गरोदर महिलांनी हे आसन काळजीपूर्वक करावे.
बऱ्याच संस्थांमध्ये अधोमुख श्वानासन या आसनाला पर्वतासन असे संबोधले जाते. या आसनाचे पोटभेद नाहीत.
संदर्भ :
- Swami Satyananda Saraswati, Asana Pranayama Mudra Bandha, Yoga Publications Trust, Munger, 2008.
समीक्षक : नितीन तावडे