बोडो स्त्री-पुरुष

भारताच्या ईशान्य भागात विशेषत: आसाम राज्यात आढळणारी सर्वांत प्राचीन आदिवासी जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने आसामच्या उदलगुरी, चिराग, बक्सा, सोनितपूर, गोआलपुरा,धेमाजी, लखीमपूर, कोकराज्हर या भागांमध्ये तसेच ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर खोऱ्यात आढळते. त्यांची लोकसंख्या सुमारे १५,७९,००० इतकी आहे (२०११ – २०२१).

बोडो हा शब्द ‘बॉड’ या शब्दावरून घेतला असून त्याचा ‘तिबेट’ असा अर्थ होतो. ते स्वत:ला ‘बोरोसा’ असे म्हणतात. त्याचा अर्थ बोडोचा पुत्र असा होतो. बोडो-काचारी या मूळ जमातीचे रूपांतर आता बोडो असे झाले आहे. आसामच्या धरतीचा व तेथील संस्कृतीचा या जमातीवर मोठा प्रभाव आहे. बंगालच्या उत्तर भागातील बोडो व नेपाळ याठिकाणच्या बोडोंना मेच किंवा म्लेंच्छ किंवा रानटी म्हणतात. तराईच्या प्रदेशातील बोडोंना कचारी (काचारी) म्हणतात. भारतीय संविधानामध्ये बोडो जमातीचा सहाव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला आहे.

बोडो-काचारी ही बोडोची मूळ जमात होय. हे पूर्वी चीनच्या पश्चिमेस (तिबेट, हिमालय) राहात होते. या प्रदेशाला ते बोड म्हणजे जन्मभूमी म्हणत व स्वत:ला ते बोडो देशाची मुले (बोरोसा). काचारीचे बोडो-मेक, दिमाछा (दिमासा), धिमाल, गारो, हजोंग, कोच, लालुंग, मेक, मोरान, मोहाडी, फुलगारीया, चुतियाज व देऊरी, रंभा, सोनोवाल, सरानिया, सोलामिया, थेंगल आणि तिप्रासा ही १८ वेगवेगळे गट प्रचलित आहेत. त्यांपैकी दिमाछा ही आसाम प्रदेशात, तर गारो ही शाखा गारो व त्रिपुरा टेकड्यांमध्ये राहतात. मोरान ही सर्वांत पूर्वेकजील शाखा आता आसाममध्ये आहे.

‘बोरो’ ही बोडो लोकांची बोलीभाषा असून ती तिबेटो-बर्मन भाषाकुलातील आहे. तीमध्ये काही अंशी आसामी भाषेचाही वापर केला जातो. मूळ सिनो-तिबेटन किंवा तिबेटो-चायनीज या भाषांतून बोरो भाषा निर्माण झाली आहे. भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांच्या यादीमध्ये तिचा आठवा क्रमांक आहे. १९६३ पासून बोरो भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामध्ये लॅटिन लिपीसुद्धा काही प्रमाणात वापरात आहे.

बोडो लोकांचा मूळ व्यवसाय भातशेती करणे व रेशीम किड्यांचे पालन करणे हा आहे. त्याचबरोबर ते वराहपालन, कुक्कुटपालन, बांबूच्या कलात्मक वस्तू बनविणे इत्यादी व्यवसाय करतात. ही जमात आजही आर्थिक दृष्ट्या मागास असून ती दारिद्र्य रेषेखालीच दिसून येते. ते आपापल्या व्यवसायांत व कलाकुसरीमध्ये व्यस्त असतात. काही बोडो शेती करतात, काही बोडो मासे पकडून उदरनिर्वाह करतात; मात्र आता काही बोडो लोक शिक्षणाचे महत्त्व जाणले असून ते आपल्या पाल्यांना शिक्षण देत आहेत. त्यामुळे काही बोडो युवक-युवती सरकारी नोकरी करताना दिसून येतात.

सगळ्या बोडोंची लग्नाची एकच पद्धत आहे. एखाद्या शुभदिनी मुलाचे आई-वडील मुलीला पारखायला तिच्या घरी जातात. ती आवडली, तर चांदीच्या बांगड्या तिच्या घराच्या छताला चिकटवून जातात. मग मुलगा मुलीला बघायला जातो. तिला जर मुलगा पसंत असेल, तर ती त्याला रुमाल भेट देते व त्याला नमस्कार करते. त्यांच्यात जातीबाहेर विवाह मान्य नाही. तसेच बहुपत्निकत्व, बालविवाह मान्य नाही. लग्न शक्यतो रविवारच्या दिवशीच केली जातात. हुंडा देणे, घरजावई होणे या प्रथा त्यांच्यात दिसून येतात. वराकडून वधुमूल्य दिले जाते. जर परिस्थिती नसेल, तर मुलगा सासऱ्याकडे नोकरी करतो.

बोडो लोक निसर्गपूजक आणि ‘बथुइझम’ म्हणजेच पूर्वजांचे पूजक आहेत. ‘शिजुओ’ नावाच्या फांदीला पूर्वज मानून ते तिची पूजा करतात. तिला ते महादेव असे म्हणतात. ते देवाने निर्मिलेल्या पंचतत्त्वांना मानतात. धरणी, पाणी, वायू, अग्नी व आकाश ही पाच तत्त्वे आणि पाच हा शुभ क्रमांक मानतात. सृष्टीच्या अस्तित्वाच्या आधी एका गुरूंचे अस्तित्व होते व ते अशा एकाकी अवस्थेत राहायला कंटाळले व मग त्यांनी मनुष्य रूप घेतले. त्यांना ते पुराण पुरुष मानतात.

‘बैशागु’ या वसंतातील सणाच्या दिवशी ते नवीन वर्षाचे स्वागत गाईची पूजा व ‘गोरु बिहू’ करून करतात. या दिवशी मुले आपल्या घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडतात व शंकराची आराधना करतात. ते कोंबडे व तांदुळाची दारू (झोऊ) यांचा नैवेद्य दाखवतात. ‘बागारुंबा’ हा नाच ते करतात. गावाबाहेर असलेल्या ‘गरजासाली’ या दैवताला वंदन करून ‘बैशागु’ हा सण संपतो.

बोडो जमातीत अंत्यविधीला फार महत्त्व आहे. मृताचे पार्थिव घराबाहेर अंगणात ठेवण्यात येते. तत्पूर्वी बाहेरची जागा शेणाने सारवली जाते. नंतर त्यावर ‘संग्रा’ म्हणजे बांबूची चौकट व चौकटीवर सतरंजी व त्यावर चादर अंथरून पार्थीव ठेवतात. नंतर त्याला अंघोळ घालतात. पुरुष असेल, तर त्याला कोऱ्या कपड्यात म्हणजेच ‘गामोचात’ गुंडाळतात. स्त्री असेल, तर तिच्या अंगावर ‘दोखाना’ म्हणजेच नवीन कपडा पांघरतात. तिच्या केसांना तेल लावून ते विंचरतात. मृताच्या तोंडात बांबूची नळी ठेवतात. त्यामुळे त्याचा आत्मा श्वासोच्छवास करतो, अशी बोडोंची समजूत आहे. कोंबडीचा रस्सा व तांदुळाची दारू मृत व्यक्तीजवळ ठेवतात. त्याच्या तोंडाजवळ घास नेऊन प्रत्येकजण त्याला भरविल्यासारखे करतात. नंतर ते सर्व अन्न टाकून देतात. ‘बाढी’ म्हणजे तिरडी हे ‘ग्वठ्वी बांगरा’ म्हणजे जवळचे नातेवाईक स्मशानात नेतात. मृताला अग्नी किंवा माती दिली जाते. मृताला शक्यतो नदीकाठीच पुरतात. मृताच्या आवडीचे पदार्थ त्याच्या थडग्याजवळ ठेवले जाते. अंत्यविधी झाले की, सर्वजण त्याच्या घरी जातात व घरामध्ये नदीचे पवित्र पाणी शिंपडतात. त्याच्या घराजवळ त्याच्या नावाने एक दगड ठेवतात. ज्या ठिकाणी मृताला अग्नी दिली, त्या ठिकाणी एक छत तयार करून तेथे सुपारीचे झाड लावतात व त्याच्या आजुबाजूला बिया पेरतात. काही गटांमध्ये तीन ते चार दिवस तेलकट व खारट जेवण वर्ज्य करतात, तर काही दारू वर्ज्य करतात. भुतखेत व पुनर्जन्म यांवर त्यांचा विश्वास आहे.

आज बोडो जमातीचे लोक शिक्षण घेत असून ते आधुनिक पद्धतीचे जीवन जगताना दिसत आहेत; मात्र त्यांनी आपली संस्कृती व परंपरा आजही जपून ठेवली आहे.

संदर्भ : Sing, K. S., The people of India, 1997.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर