परदेशी भांडवली बाजारात गुंतवणुकीसाठी भारतीय रुपयांत लागू केलेल्या रोख्यांना मसाला रोखे असे म्हणतात. परकीय बाजारातील परकीय चलनाची जोखीम दूर करण्यासाठी भारतीय संस्थांद्वारे मसाला रोखे लागू केले जातात. हे रोखे परदेशात लागू केले असले, तरी ते तेथील चलनाऐवजी भारतीय चलनातच नामांकित केले जाते.

उद्योगधंद्याची स्थापना तसेच विकास विस्तार विविधीकरणासाठी भांडवलाची गरज भासते. असे भांडवल अल्प मुदत (एक ते दीड वर्षांपर्यंत), मध्यम मुदत (चार ते पाच वर्षांपर्यंत) आणि दीर्घ मुदत (पंधरा ते वीस वर्षांपर्यंत) अशा कालावधींसाठी असू शकते. बँका, वित्तीय संस्था, रोखे, ऋणपत्रे, मुदत ठेवी अशा मार्गाने उद्योगांना असा वित्तपुरवठा होऊ शकतो; समभागांद्वारे शाश्वत भांडवल मिळू शकते. हे सर्व भांडवल जसे देशामधून मिळू शकते, तसेच विदेशांतूनही औद्योगिक कंपन्या ते उभारू शकतात. भांडवल उभारणे, त्याची वेळेवर व ठरलेल्या अटीनुसार परतफेड करणे यांत काही धोके असतात. उदा., बदलणारी आर्थिक धोरणे, तेजी-मंदीमुळे होणारे अर्थव्यवस्थेतील चढ-उतार अशा परिस्थितीत भांडवल उभारणे व परतफेड करणे यांत अडचणी येऊ शकतात. देशातून भांडवल उभारण्याबरोबर परदेशातूनही विदेशी चलनात भांडवल उभारले जाऊ शकते. त्यातील मोठी जोखीम म्हणजे विदेशी चलनाचा तरल असा विनिमय दर. उदा., एखाद्या भारतीय कंपनीने परदेशातून १ लाख डॉलर्स इतके कर्ज घेतले. त्या वेळेस विनिमय दर १ अमेरिकन डॉलर म्हणजे ५५ रुपये इतका असेल; पण परतफेड करते वेळी तो दर १ अमेरिकन डॉलर = ६२ रुपये इतका झाला, तर या व्यवहारात या भारतीय कंपनीचे मोठे भांडवली नुकसान होणार; कारण कर्ज उभारणी वेळी रुपयातील मूल्यानुसार कर्ज रकम रु. ५५ लाख इतकी होती आणि परतफेडीच्या वेळी मात्र ती त्या वेळच्या दरानुसार रु. ६२ लाख इतकी झाली. या अनपेक्षित व बाह्य घडामोडींमुळे मोठे भांडवली नुकसान झाले असे आढळते. यावर उपाय म्हणून परदेशातील गुंतवणूकदारांना रुपयातील कर्जरोखे विकण्याची कल्पना पुढे येऊन ती २०१३ नंतर वेगाने घडून आलेली दिसते.

परदेशी गुंतवणूकदारांनी परदेशात खरेदी केलेल्या रुपयांतील कर्जरोख्यांना मसाला रोखे असे नाव प्राप्त झाले आहे. जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळामार्फत मसाला रोखे प्रथम नोव्हेंबर २०१४ मध्ये विकण्यात आले. भारतासारख्या इतर अनेक देशांनीही आपापल्या चलनातील कर्जरोखे आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारात विकून भांडवल उभारणी केलेली आढळते. हा मार्ग २०१६ नंतर अधिकच लोकप्रिय झालेला आहे. या पतपत्रांची खरेदी-विक्री आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारात होत असते. विशेष करून त्यांना रोखता व हस्तांतरणीयता असल्याने हे कर्जरोखे लोकप्रिय झालेले दिसतात. भारताची स्थिर आर्थिक प्रगती, आकर्षक अटी व सुलभ हस्तांतरणीयता यांमुळे या पतपत्रांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे. अशा परदेशी भांडवली गुंतवणुकीचा देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागतो. रुपया या चलनातील पतपत्रांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील खरेदी विक्रीमुळे भारतीय रुपया या चलनाची आंतरराष्ट्रीय चलन अशी प्रतिमा निर्माण होण्यास मदत झाली आहे. या मसाला रोख्यांवरील काही नियम व निर्बंध २०१८ मध्ये शिथिल करून भारतीय प्रशासनाने ते अधिक आकर्षक केले आहेत. तसेच या रोख्यांवरील कर २०% वरून ५% पर्यंत उतरविल्याने हे रोखे अधिक लोकप्रिय झाले आहेत. जुलै २०१६ मध्ये ‘हाउसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन’ या वित्तीय संस्थेने रु. ३,००० कोटी रकमेच्या कर्जरोख्याची विक्री करून भांडवल उभारणी केली. मसाला रोखे विकणारी खासगी क्षेत्रातील ही पहिली कंपनी ठरली. तसेच केरळ राज्य मसाला रोखे लागू करणारे भारतातले पहिले राज्य ठरले आहे (२०१९). केरळमधील ‘केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डा’ने (केआयआयएफबी) ‘लंडन स्टॉक एक्सचेंज’ या विदेशी बाजारपेठेत २,१५० कोटी रुपये निधी उभारण्यासाठी मसाला रोखे जारी केले होते.

रिझर्व्ह बँकेने मसाला रोख्यांबाबत काही नियम व विनिमय स्थापित केले आहे. (१) या रोख्यांमार्फत उद्योगाला प्राप्त झालेली रक्कम पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरावी, असे बंधन घालण्यात आले आहे. (२) कोणतीय भारतीय बँक व सहकारी क्षेत्रे परदेशांत रुपया मूल्याचे रोखे लागू करण्यास पात्र असेल. (३) या रोख्यांद्वारे जमा केलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला जाऊ शकत नाही; परंतु याचा वापर एकात्मिक टाउनशिप किंवा परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी केला जाऊ शकतो. (४) मसाला रोख्यांद्वारे उभारलेला पैसा भांडवली बाजारात गुंतवला जाऊ शकत नाही इत्यादी.

लंडन भांडवल बाजाराबरोबरीने राष्ट्रीय भांडवल बाजारातही मसाला रोख्यांची नोंदणी व्हावी, असा करार करण्यात आला आहे.

समीक्षक : विनायक गोविलकर