खाँ, मुश्ताक हुसेन : (१८७८ – १९६४). भारतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रामपूर – सहस्वान या घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यामधील सहस्वान या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये पारंपरिक संगीताचे वातावरण होते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांचे वडील उस्ताद कल्लन खाँ यांच्याकडे त्यांच्या संगीताच्या प्रारंभिक शिक्षणाची सुरुवात झाली. त्यांनी त्यांचे आजोबा उस्ताद हैदर खाँ यांच्याकडूनही संगीताचे शिक्षण घेतले. पुढे मुश्ताक हुसेन यांनी रामपूर-सहस्वान घराण्याचे संस्थापक उस्ताद ईनायत हुसेन खाँ यांच्याकडे जवळपास अठरा वर्षे संगीताचे शिक्षण घेतले. तत्कालीन रामपूर संस्थानचे उस्ताद वजीर खाँ यांच्याकडून त्यांनी धृपद-धमारची तालीम घेतली. ईनायत हुसेन खाँ हे मुश्ताक हुसेन खाँ यांचे सासरेही होते.

वयाच्या ३५ व्या वर्षी हुसेन खाँ यांना रामपूर संस्थानातील एक दरबारी गायक म्हणून सन्मान मिळाला होता (१९१३). पुढे ते रामपूर संस्थानचे मुख्य दरबार गायकही झाले. १९५६ मध्ये ते तेथून निवृत्त झाले. यानंतर ते दिल्लीमधील श्रीराम भारतीय कला केंद्र या संगीत, नृत्य आणि वादन या कलांसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेत संगीताचार्य म्हणून रुजू झाले. हुसेन खाँ यांना विविध संगीत संमेलनांतून सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले जात असे. तत्कालीन बहुतांशी संगीत संमेलन, संगीत परिषदांमध्ये त्यांचा सहभाग होता.

उस्ताद मुश्ताक हुसेन खाँ यांचे रामपूर संस्थानच्या दरबारात आणि भारतातील विविध आकाशवाणी केंद्रांमध्ये अनेक गायनाचे कार्यक्रम झाले आणि ते गाजले. ग्रेट मास्टर ग्रेट म्युझिक (भारतीय आकाशवाणीतील कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण), ख्याल गुंकारी (भारतीय आकाशवाणी), ख्याल अँड तराना-बिहाग, (भारतीय आकाशवाणी), रामपूर सहस्वान घराना, क्लासिक गोल्ड रेअर जेम्स, क्लासिक गोल्ड  या नावाने त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण त्या आता दुर्मीळ आहेत. त्यांची गायकी चतुरंगी होती. आपल्या विशिष्ट “टप्पा” शैलीसाठी ते प्रसिद्ध होते. त्याचबरोबर धृपद, धमार, ख्याल, तराना आणि ठुमरी हे गीतप्रकार ते अत्यंत उत्तम पद्धतीने व स्वतःच्या विशिष्ट शैलीने सादर करत असत.

उस्ताद मुश्ताक हुसेन खाँसाहेबांची ओळख रामपूर-सहस्वान घराण्यातील एक नावाजलेले आणि प्रख्यात गायक अशी होतीच. त्याचबरोबर त्या काळातील एक कुशल, निष्कलंक आणि उत्कृष्ट गुरु म्हणूनही ते ओळखले जात असत. त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांचे सुपुत्र उस्ताद ईश्तक हुसेन खाँ, उस्ताद इस – हक हुसेन खाँ, उस्ताद गुलाम हुसेन खाँ व उस्ताद गुलाम ताकी खाँ यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांचे जावई उस्ताद गुलाम सादिक खाँ, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, शन्नो खुराणा, नयना देवी, सुमती मुटाटकर, सुलोचना बृहस्पती इत्यादी त्यांच्या प्रमुख शिष्यपरिवारामध्ये गणले जातात. त्यांना शेर – ए – मौसिकी या पदवीने ओळखले जात असे.

उस्ताद मुश्ताक हुसेन खाँ यांना त्यांच्या सांगीतिक कार्यासाठी विविध मानसन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांमध्ये पुढील पुरस्कारांचा समावेश होतो. भारत सरकारतर्फे उत्कृष्ट कलाकाराच्या सन्मानार्थ दिला जाणारा पहिला राष्ट्रपती पुरस्कार त्यांना देण्यात आला (१९५२), ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळवणारे पहिले गायक कलावंत होत (१९५२), भारत सरकारतर्फे पद्मभूषण प्राप्त करणारे पहिले गायक कलावंत (१९५७) इत्यादी.

मुश्ताक हुसेन खाँ यांना एका खाजगी गायनाच्या मैफलीमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दिल्ली येथील इस्पितळात निधन झाले.