
रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मप्रमुख पोप ह्यांचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय. येशू ख्रिस्ताचा सर्वांत प्रमुख शिष्य प्रेषित संत पीटर ह्याने जेथे हौतात्म्य स्वीकारले, त्याच भूमीवर व्हॅटिकनची उभारणी करण्यात आली असून ते व्हॅटिकन सिटीच्या केंद्रस्थानी आहे.
‘व्हॅटिकन’ हे नाव मुळात रोमजवळच्या एका टेकडीचे होते. टायबर नदीच्या उजव्या बाजूस असलेल्या ह्या टेकडीजवळच संत पीटरला हौतात्म्य प्राप्त झाले, तिथेच त्याला पुरले. या संत पीटरच्या थडग्यावर रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन द ग्रेट ह्याने बॅसिलिकाची उभारणी केली. बॅसिलिकाचा आशीर्वादविधी व समर्पणविधी इ. स. ३२६ मध्ये झाला. ह्या चर्चच्या एका बाजूस पोपचे निवासस्थान असल्याचा निर्देश इ. स. पाचव्या शतकात मिळतो. इ. स. १३७८ पासून पुढे व्हॅटिकन हे पोपचे स्थायी निवासस्थान बनले. पंधराव्या शतकापासून व्हॅटिकनमध्ये ‘व्हॅटिकन पॅलेस’ ह्या नावाने ओळखले जाणारे मोठे संकुल उभारण्यास प्रारंभ झाला. ह्या संकुलातील खोल्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांपैकी बऱ्याचशा खोल्या कार्यालये, ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालये म्हणून वापरल्या जातात. ह्या संकुलातील काही विशेष उल्लेखनीय दालने अशी : पेपल अपार्टमेंट्स, बोर्जा अपार्टमेंट्स, सिस्टाइन चॅपेल, रॅफेएल लॉगिआज, पायोक्लेमेंटाइन म्यूझीयम, चिआरामॉती म्यूझीयम, व्हॅटिकन ग्रंथालय आणि चित्रसज्जा. ह्या संकुलात मोठमोठ्या कलावंतांच्या कलाकृती पाहावयास मिळातात. उदा., ‘सिस्टाइन चॅपेल’मध्ये मायकेल अँजेलोचे ‘लास्ट जज्मेंट’ ह्या नावाने विख्यात असलेले भित्तीचित्र आहे. ‘व्हॅटिकन ग्रंथालया’त साठ हजारांहून अधिक हस्तलिखिते, एक लाखावर उत्कीर्णने आणि नकाशे आणि सुमारे नऊ लाख ग्रंथ आहेत.
पोप दुसरे जूलियस (१५०३–१३) ह्यांनी व्हॅटिकन म्यूझीयम सुरू केले. जगातल्या इतर कोणत्याही वस्तुसंग्रहालयापेक्षा येथील वस्तुसंग्रह मोठा आहे. ‘व्हॅटिकन अर्काइव्हज’ची स्थापना पोप पाचवे पॉल ह्यांनी १६१२ मध्ये केली. येथे चर्चच्या प्रशासनाशी संबंधित असलेले कायदे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली आहेत. पोप तेरावे लिओ ह्यांनी ही कागदपत्रे जिज्ञासू अभ्यासकांना खुली केली. कॉन्स्टंटाइन द ग्रेट ह्याने बांधलेल्या सेंट पीटर बॅसिलिकाची कालौघात पडझड झाल्यानंतर इ. स. १५०६ पासून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यातूनच विद्यमान सेंट पीटर्स चर्च उभे राहिले. ह्या चर्चच्या उभारणीशी संबंधित असलेल्या महनीय व्यक्तींत ब्राबांते, रॅफेएल, मायकेल अँजेलो आणि जोव्हान्नी लोरेत्सो बेर्नीनी ह्यांचा समावेश होतो. हे सेंट पीटर्स चर्च जगातले सर्वांत मोठे चर्च आहे.
व्हॅटिकन सिटीत रोमन कॅथलिक चर्चच्या दोन सर्वसाधारण वैश्विक धर्मपरिषदा (१८६९-७० व १९६२–६५) भरल्या. विवेकवाद, संशयवाद तसेच धर्मप्रवृत्तीच्या विरोधात जाणाऱ्या काही उदारमतवादी विचारसरणी ह्यांचा जोर वाढलेला असतानाच्या वातावरणात पहिली धर्मपरिषद भरली. परमेश्वरी साक्षात्कार, ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व ह्यांसारख्या ख्रिस्ती धर्माच्या मूलतत्त्वांनाच विरोधी वातावरणामुळे धक्का पोहोचण्याची शक्यता विचारात घेऊन ह्या धर्मपरिषदेने त्याविरुद्ध आवाज उठविला. संपूर्ण चर्चचा आध्यात्मिक नेता आणि गुरू म्हणून पोप हे ख्रिस्ती धर्मश्रद्धेविषयी एखादा धर्मसिद्धांत जाहीर करतात, तेव्हा तो प्रमादरहितच असतो, असे प्रतिपादन ह्या धर्मपरिषदेत करण्यात आले.
व्हॅटिकन येथील दुसरी धर्मपरिषद पोप तेविसावे जॉन ह्यांनी बोलावली होती आणि पोप सहावे पॉल ह्यांच्या कारकिर्दीत ती चालू राहिली. ह्या धर्मपरिषदेत अधिकृतपणे भाग घेणाऱ्या २,५०० धर्माधिकाऱ्यांमध्ये व धर्मपंडितांमध्ये भारतातून आलेल्या धर्माधिकाऱ्यांची संख्या ७८ असून त्यांपैकी ६ व्यक्ती महाराष्ट्रातून आलेल्या होत्या (मुंबईहून ३, पुण्याहून १, अमरावतीहून १ आणि नागपूरहून १). ख्रिस्ती धर्माची शिकवणूक आधुनिक मानवाशी संबद्ध करावी, ही भूमिका येथे मांडली गेली. चर्चच्या नूतनीकरणाचा, आधुनिकीकरणाचा, व संस्कृतीकरणाचा हा विचार होता.
१९६४ मध्ये पोप सहावे पॉल हे जेव्हा मुंबईला आले, तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्यांची भेट घेतली. इतका आदरभाव भारताच्या हृदयात व्हॅटिकनबद्दल व पोपबद्दल आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.