बाल्यावस्था ही मानवी जीवनातील इतरांवर अवलंबून असणारी अवस्था आहे. हळूहळू बालक आपल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास शिकते. परंतु जेव्हा त्यांच्या सभोवतालचे वातावरण जुळवून घेण्यास कठीण असते तेव्हा या मुलांच्या वर्तनात दोष निर्माण होतात, म्हणजेच ते समाज मान्यतेनुसार वागण्यास असमर्थ ठरतात. हे टाळण्याकरिता बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक गरजा योग्य वेळी भागविल्या पाहिजेत. यामुळे बालक सुदृढ रहाण्यास मदत होते. या सर्व गरजा पालकांनी भागविणे जरुरी असते, कारण बालके ही पालकांवर अवलंबून असतात. या कामात परिचारिका पालकांना समुपदेशन करते.
विविध वयोगटानुसार बालकांमधील वर्तणुकीच्या समस्या :
एक वर्षापर्यंतचा वयोगट : स्तनपान नाकारणे किंवा भूक मंदावणे, पोटात कळ येवून दुखणे, अपरिचित व्यक्तीबद्दलची तसेच मातेपासून दूर होण्याची भीती, इ. समस्यांमध्ये शारीरिक उपायांबरोबरच बालकास माता-पित्याकडून किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींकडून प्रेमळ वागणूक मिळणे गरजेचे असते हे पालकांना परिचारिकेने समजावून सांगावे.
१ वर्ष ते शालेय अवस्था वयोगट :
- आक्रस्ताळेपणाने वागणे (temper tantrums) : तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आक्रस्ताळेपणाचे प्रमाण अधिक असते. अशावेळी पालकांनी मुलांना शांतपणे समजून सांगावे व त्यांचे लक्ष इतर गोष्टींकडे वळवावे. त्यांच्या वागण्यावर हसू नये तसेच इतरांसमोर त्यांची मस्करी करू नये. मुलांना त्यांच्या कलेने घेत समजावून सांगावे परंतु त्यांचे चुकीचे हट्ट न पुरवता आपल्या निर्णयावर ठाम रहावे.
- श्वास रोखुन धरणे : (६ महीने ते ५ वर्षे वयोगट) मुलांच्या अशा वर्तणुकीस कारणीभूत घटक परिचारिकेने वेळीच ओळखून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे, पालकांनी घाबरून न जाता धीराने व शांततेने यास तोंड देण्यास सांगणे. अतिसंरक्षण देणे, लाड करणे किंवा शिक्षा करणे टाळण्यास सांगावे.
- अंगठा चोखणे : (४ ते ८ वर्षे वयोगट) मुलांच्या या सवयीमुळे तोंडातील दातांची रचना बदलून चावणे, गिळणे, बोलणे या सारख्या क्रियांमध्ये बाधा येवू शकते, अंगठा बारीक होणे, चेहेऱ्याची ठेवण बदलणे, इ. बदल दिसू शकतात. मुलांमध्ये या सवयी थांबविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, योग्य बदलासाठी मुलांना शाबासकी द्यावी, हे परिचारिकेने समजावून सांगावे.
- नखे खाणे : (५ ते ७ वर्षे वयोगट) मुलांमधील असुरक्षिततेची भावना, मनामधील द्वंद्व, पालकांप्रती असलेली भीती इ. यास कारणीभूत असतात. मानसोपचार तज्ञांच्या मदतीने परिचारिकेने पालकांना याचे कारण समजावून देणे व ही सवय घालविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करणे.
- नैसर्गिक विधींवर नियंत्रण नसणे : (४ ते ५ वर्षांपुढील वयोगट) हे एखाद्या भावनिक ताणतणाव किंवा आजारपणामुळे व दवाखान्यात दाखल झाल्यामुळे मुलांमध्ये दिसुन येते. परिचारिकेने बालकाची संपूर्ण माहिती घेऊन त्याचे निश्चित कारण शोधुन त्यावर उपाय योजना करणे आवश्यक असते. जसे ही समस्या आजारपणामुळे होत असल्यास त्यावर औषधोपचार करणे, भावनिक कारणाने असल्यास पालकांना व बालकाला भावनिक आधार देणे, झोपण्यापूर्वी बालकास लघवीस जाऊन येण्यास सांगणे, बाल मानसोपचारतज्ञांच्या मदतीने अशा बालकातील कारणे शोधुन बालकाचे व पालकांचे समुपदेशन करणे, चांगल्या सवयी लावणे, आवश्यकतेनुसार आहारातील बदल करणे, चांगल्या सवयींसाठी बालकास शाबासकी देणे इ. सर्व मार्गदर्शन परिचारिका करते.
- पायका : (२ वर्षांपुढील वयोगट) यामध्ये मुले न खाण्याच्या वस्तु खातात. उदा., माती, खडू, भिंतीचे रंगाचे पापुद्रे, इ. याचे कारण पालकांचे दुर्लक्ष, अपुरे प्रेम इ. असू शकते. याशिवाय जंतांचा प्रादूर्भाव, जीवनसत्त्वांची कमतरता, शिशाचा विषारी परिणाम इ. मानसोपचार पद्धतींचा वापर करून यावर उपाय केले जातात.
- टिक : (११ वर्षांपुढील वयोगट) या प्रकारात मुलांमध्ये अचानक, अस्वाभाविक व अनियंत्रित शारीरिक हालचाल अशी लक्षणे दिसून येतात. याकरिता विशिष्ट प्रकारचे वर्तणूक उपचार, औषधोपचार (haloperidol), समुपदेशन इ.चा वापर केला जातो.
- बोलण्याच्या समस्या : (शालेय वयोगट) तोतरेपणा, बोबडेपणा, उशीरा बोलणे, इ. चा यात समावेश होतो. कौटुंबिक वातावरणात सुधार करण्यास पालकांना सांगणे, समुपदेशन करणे, मतिमंदत्व, गतिमंदत्व असल्यास योग्य त्या उपचारांकरिता बालकास संदर्भ सेवा दिली जाते.
- झोपेची समस्या : (शालेय वयोगट) औषधोपचार व मानसोपचार पद्धतींचा वापर करून यावर उपाय केले जातात. पालकांनी भीतीदायक गोष्टी रात्रीच्या वेळी मुलांना सांगू नये किंवा दाखवू नये हे समजावून सांगितले जाते.
- शाळेची भिती : (शालेय वयोगट) शालेय वातावरणातही मुलांना मनोरंजन व खेळ उपलब्ध होणे गरजेचे असते, शालेय वातावरण सुधारणे, नियमित शाळेत जाण्याची मुलांना सवय लावणे यांचा उपाययोजनेत समावेश होतो.
- एकाग्रता न करता येणे (Attention Deficit Disorder) : (शालेय वयोगट) यात शिकण्याच्या समस्यांचा समावेश होतो. यावरील उपायांकरिता सांघिक उपचारांची गरज असते, ज्यात लहान मुलांचे वैद्य, मानसोपचार तज्ञ, मनोरुग्णतज्ञ, लहान मुलांची परिचर्या करणारी परिचारिका, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पालक या सर्वांचा समावेश असतो. बालकाचे योग्य शिक्षण, संवर्धन, समुपदेशन, मार्गदर्शन व औषधोपचार या सर्वांचा यात समावेश होतो.
किशोरवयीन मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या :
- जननेंद्रीये हाताळणे (Musturbation) : मनोरंजन, मन गुंतविणेसाठी उपाय, लैंगिक शिक्षण, समुपदेशन, पालकांचे प्रेम इ. उपाय यासाठी केले जातात.
- बालगुन्हेगारी (Juvenile Delinquency) : हे टाळण्यासाठी बाल मार्गदर्शन सत्रात सांघिक उपाय केले जातात.
- अमली पदार्थांचे सेवन : याची कारणे शोधुन ती टाळण्यासाठी उपाय करतात. अशा मुलांना मानसोपचार, व्यसनमुक्ती उपाय व पुनर्वसन सेवा पुरविल्या जातात.
- खाण्याच्या समस्या (Anorexia Nervosa) : मानसोपचार, उदासीनता विरोधी औषधोपचार, वर्तन सुधाराचे उपाय व पोषण विषयक सुधारणा, यांचा या उपाययोजनेत समावेश होतो.
मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या हाताळतांना परिचारिकेची जबाबदारी :
परिचारिका ही मुलांमधील असे दोष लवकरात लवकर शोधून त्यांचा प्रतिबंध करणे किंवा त्यावर उपाययोजना करण्याचे काम करते. याकरिता तीला स्वतःला अशा वर्तनातील दोषांचे ज्ञान असणे व त्यावरील उपाय करण्याचे कौशल्य आत्मसात असणे गरजेचे असते. त्या अशा मुलांना, त्यांच्या पालकांना व कुटुंबातील व्यक्तींना या कामात मदत करतात.
- बालकातील समस्येविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊन त्यामागील कारण शोधून काढणे.
- संबंधित बालकाच्या पालकांना सर्व माहिती देऊन समस्येच्या कारणांविषयी अवगत करावे.
- बालकाचे घर, शाळा व इतर सामाजिक वातावरणात आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी पालक, शिक्षक व कुटुंबातील इतर व्यक्ती यांना मदत करणे.
- गरजेनुसार बालकास वर्तनातील बदल करण्यास प्रोत्साहीत करणे.
- योग्य अशा शारीरिक, मानसिक व सामाजिक आधाराने बालकातील आरोग्यदायी भावनिक विकासाला चालना द्यावी.
- वाढीच्या विविध अवस्थांमध्ये वर्तनातील दोषांना कारणीभूत असलेल्या मनो-सामाजिक अडथळ्यांविषयी जागृती निर्माण करणे.
- योग्य बालसंगोपनाकरिता व समस्या सोडविण्याकरिता पालकांना व त्यांच्या मुलांना समुपदेशन सेवा देणे.
- समस्या असलेल्या बालकांना सेवा देण्यासाठी बाल रोग परिचारिका आरोग्य संघाचा एक घटक म्हणुन बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ व सामाजिक कार्यकर्ता यांच्या सोबत कार्य करणे.
- सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे बाल मार्गदर्शन सत्र भरवणे (child guidance clinic).
- आवश्यकतेनुसार वर्तनातील दोष असलेल्या बालकांना अधिक आधुनिक आरोग्य सेवेसाठी तसेच इतर मदतीसाठी सामाजिक संस्था व साहाय्यकारी संस्थेकडे संदर्भ सेवा देऊन पाठवणे.
संदर्भ :
- Dorothy R. Marlow; Barbara A. Redding, Textbook of Pediatric Nursing.
- Parul Datta, Pediatric Nursing, 3rd Ed.
समीक्षक : सरोज वा. उपासनी