व्यायाम म्हणजे शरीराची अशी विशिष्ट हालचाल जी केल्यामुळे शरीराचे बल वाढते व सोबतच शरीराचे संतुलन साधले जाते. व्यायामाचे हे लाभ मिळविण्यासाठी व्यायाम योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. आवश्यक प्रमाणात व्यायाम केल्यामुळे शरीरात हलकेपणा जाणवतो, शरीराची तरतरी वाढते, वेदना सहन करण्याची क्षमता वाढते, प्रमाणाबाहेर वाढलेल्या दोषांचा क्षय होतो व जाठराग्नी प्रदिप्त होतो.

आयुर्वेदाने व्यायामाचा अंतर्भाव दिनचर्येत केला आहे व त्यापूर्वी अभ्यंग करण्यास सांगितले आहे. अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावण्याची क्रिया. तसेच व्यायाम केल्यानंतर संपूर्ण शरीराला हळूवार दाबण्यास सांगितले आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायामासारखा दुसरा उपाय नाही. नियमित व्यायामामुळे शरीर लवकर म्हातारे होत नाही. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीने एखादवेळेस विरुध्द भोजन म्हणजेच परस्पर विरोधी पदार्थांचा समावेश असणारे हानीकारक जेवण जरी खाल्ले तरी त्यामुळे त्याला काही बाधा होत नाही. तसेच एखादवेळेस अतिशय चमचमीत किंवा शरीरात दाह निर्माण करणारे जेवण जरी खाल्ले तरी ते पचविले जाते. योग्य प्रमाणात व्यायाम झाल्याची लक्षणे म्हणजे व्यायाम करताना घाम येणे, श्वासाचा वेग वाढणे, दम लागणे ही आहेत. प्रमाणाबाहेर व्यायाम केल्यामुळे शरीर थकते, मानसिक दुर्बलता येते, रसादी धातूंचा ऱ्हास होतो, वारंवार तहान लागते. तसेच रक्तपित्त, दमा, खोकला, ज्वर, सर्दी यांसारखे आजार होतात.

अधिक प्रमाणात संभोग करणाऱ्या, वजनदार सामान उचलणाऱ्या व वाहून नेणाऱ्या, काबाडकष्ट करून कृश झालेल्या व्यक्तींनी व्यायाम करू नये, असे चरकाचार्य म्हणतात. तसेच अतिशय चिडलेल्या, घाबरलेल्या, दु:खी, कष्टी व्यक्तींनी सुध्दा व्यायाम करू नये. वात-पित्त प्रकृतीचे बालक, म्हातारे, वातज प्रकृतीची व्यक्ती, जे जोराने व सतत बोलतात किंवा त्यांना तसे बोलावे लागते अशा व्यक्ती, तहानलेले, उपाशी व अपचन झालेले व्यक्ती यांनी सुध्दा व्यायाम करू नये असे ग्रंथांत वर्णन आहे.

पहा : आतुर व चिकित्सा, व्यायाम.

संदर्भ :

  • अष्टांगहृदय — सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक १०, ११, १२. 
  • चरक संहिता — सूत्रस्थान, अध्याय ७, श्लोक ३१, ३२, ३३-३५ १ व २. 
  • सुश्रुत संहिता — चिकित्सास्थान, अध्याय २४, श्लोक ४१, ४६.

समीक्षक – जयंत देवपुजारी