एक कॅथलिक प्रार्थना. ‘क्रेडो’ (Credo) ह्या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ ‘मी श्रद्धा ठेवतो’ असा होतो. या लॅटिन शब्दावरून ‘मतांगिकार’ (क्रीड), म्हणजे ख्रिस्ताचा अनुयायी नक्की कशावर विश्वास ठेवतो त्या कलमान्वये तयार करण्यात आलेली प्रार्थना. ह्या प्रार्थनेला ख्रिस्ती धर्मात अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते; कारण ‘मी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतो’ अशी स्वच्छेने दिलेली मान्यता ह्या प्रार्थनेतून व्यक्त केली जाते.
ख्रिस्ती धर्मात ही प्रार्थना पायरी-पायरीने तयार झाली. सुरुवातीला ‘ख्रिस्ती असण्याचे वैशिष्ट्य’ कशात आहे, ह्याविषयी ठोस अशी जाणीव ख्रिस्ती व्यक्तीला नव्हती. म्हणून निरनिराळी आणि परस्परविरोधी मते तिसऱ्या-चौथ्या शतकांत पुढे आली. त्यामुळे मूलभूत श्रद्धेविषयी गोंधळ निर्माण झाला व कधी त्या मूलभूत श्रद्धेला फुटीरवादी वळण लागण्याचा धोकादेखील निर्माण झाला.
प्रभू येशूने स्वत: निवडलेल्या पहिल्या बारा प्रेषितांना (ज्यूदासने धोका दिल्यावर त्याच्या जागी परमेश्वराच्या साक्षीने मथियास ह्याला घेण्यात आले) ख्रिस्ती श्रद्धासिद्धांताचे आधारस्तंभ म्हणून गणले जाते. संक्षिप्त रूपात प्रेषितांनी शिकविलेल्या श्रद्धासिद्धांतानुसार तयार करण्यात आलेला ‘प्रेषितांचा विश्वासांगिकार’ ख्रिस्ती श्रद्धावंतांत प्रचलित झाला, तरीही महत्त्वाच्या काही मुद्द्यांवरील गोंधळ चालू राहिला, म्हणून या मुद्द्यांवर विचार-विमर्श करण्यासाठी इ. स. ३२५ मध्ये कॉन्स्टँटिनोपलजवळ नायसिया शहरात कॉन्स्टंटीनने एक धर्मसभा भरवली. ह्या सभेला ‘नायसियन धर्मसभा’ म्हणतात. सगळ्या चर्चमधील नेत्यांना (३१४ बिशपांना) एकत्रित आणणारे हे पहिलेच संमेलन होय. ह्या सभेमध्ये पुनरुत्थान पाळण्याचा दिवस व श्रद्धासिद्धांत वा मतांगिकार निश्चित करण्यात आला. ह्या मतांगिकाराला ‘नायसियन मतांगिकार’ म्हणतात. ‘नायसियन मतांगिकार’ बिशपांच्या परिषदेत एकमुखाने मान्य करण्यात आला. आज ह्या दोनपैकी एक मतांगिकार किंवा विश्वासांगिकार ख्रिस्तसभेत प्रत्येक रविवारी व मोठ्या सणाप्रसंगी चर्चच्या मुख्य प्रार्थनेवेळी (विधीमध्ये) जाहीरपणे सर्व ख्रिस्ती जनांकडून अभिमानाने घोषित केला जातो.
‘बिलीफ’ व ‘फेथ’ हे दोन शब्द इंग्रजीमध्ये काहीशा सूक्ष्म फरकाने वापरले जातात. ‘बिलीफ’ ह्या शब्दाचा अर्थ भरवसा, विश्वास किंवा ‘एखाद्याचे धार्मिक मत’ असा केला जातो; ‘फेथ’ ह्या शब्दाचा अर्थ प्रामाणिक, बिनचूक, एकनिष्ठ, श्रद्धा किंवा ‘दिलेल्या वचनानुसार वागणे’ असा लावला जातो. ख्रिस्ती धर्मात ‘फेथ’ हा शब्द जो ‘दिलेल्या वचनानुसार वागतो’ त्या संदर्भात वापरला जातो. म्हणजेच, माणसाच्या प्रयत्नाने, इच्छेने व अकलेने तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्याला सर्वसाधारण ‘बिलीफ’ ह्या शब्दाने संबोधिले जाते; तर परमेश्वराच्या प्रेरणेने, कृपेने व प्रेमाने माणूस जेव्हा परमेश्वराच्या वचनानुसार वागतो, तेव्हा त्याला ‘फेथ’ ह्या शब्दाने ओळखले जाते.
‘श्रद्धा’ (बिलीफ) ही परमेश्वराची निखळ देणगी; ‘विश्वास’ (फेथ) हा माणसाने त्याच्या परीने परमेश्वराला जाणून घेण्यासाठी व परमेश्वराकडे पोहोचण्यासाठी केलेला प्रयत्न. ख्रिस्ती श्रद्धेनुसार परमेश्वराकडे पोहोचण्यासाठी व त्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भक्तांकडे खुद्द परमेश्वरच श्रद्धेची देणगी घेऊन येतो. श्रद्धेमध्ये विश्वासाचा अंतर्भाव जणू गृहित धरला जातो. मात्र, विश्वासात श्रद्धा असतेच असे नाही.
ख्रिस्ती शिकवणुकीनुसार श्रद्धा ही वस्तुनिष्ठ मजकूर असलेली बाब आहे. श्रद्धा ही माणसाने प्रदर्शित केलेली फक्त इच्छाच नाही, तर श्रद्धेचा वस्तुनिष्ठ मजकूर स्वत: परमेश्वराने ख्रिस्तसभेला व तिच्याकडून बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येक व्यक्तीला बहाल केलेली ईश्वरी देणगी समजली जाते. श्रद्धेचा ख्रिस्ती धर्माने लावलेला हा अर्थ गृहित धरूनच आपण उपर्निदिष्ट उल्लेखिलेल्या दोन शब्दांत फारकत करू शकतो.
स्वत:ला ख्रिस्ती समजणारी व्यक्ती मन मानेल तशी, स्वत:च्या कल्पनेनुसार किंवा मतांप्रमाणे किंवा त्या व्यक्तीने ठरविल्याप्रमाणे विश्वास ठेवत नसते. खुद्द परमेश्वराने मनुष्य झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे शिष्यांना अनुभव दिलेल्या वस्तुनिष्ठ मजकूर असलेल्या श्रद्धेवर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जगत असते. ती श्रद्धेची देणगी नेहमी परमेश्वराने जशी चर्चच्या हाती हवाली केली व प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला जगता यावी म्हणून ती शुद्धस्थितीत प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडून उक्तीने व कृतीने घोषित केली जावी आणि आजही आध्यात्मिक जीवन देत राहावी म्हणून समजावून दिली जाते.
कॅथलिक श्रद्धेचा संपूर्ण सार ह्या श्रद्धा निवेदनामध्ये सामावलेला आहे. ‘‘मी एकच एक परमेश्वरावर विश्वास ठेवतो. तो परमेश्वर स्वर्गातील परम पिता, माणसाला अस्सल व विपुल जीवन देण्यासाठी स्वत: पृथ्वीवर अवतरून मरिया (मेरी) माऊलीच्या उदरी जन्म घेतलेला परम पित्याचा पुत्र आणि जगाच्या अंतापर्यंत अदृश्य रूपाने प्रत्येक व्यक्तीला सोबत देणारा परम आत्मा आहे’’, अशी ह्या श्रद्धा प्रकटनाची सुरुवात होते. पाप प्रवृत्तीत जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाप क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशूने बाप्तिस्मा साक्रामेंताची स्थापना केली. परमेश्वराची नजर प्रत्येक व्यक्तीवर केंद्रित असते–त्या व्यक्तीला सर्व ऐहिक मर्यादा पार करून ‘पूर्णत्व’ प्राप्त व्हावे अशी परमेश्वराची इच्छा असली, तरी एकेकट्या व्यक्तीला जणू अलग रीत्या परमेश्वर बघत नसतो, तर पृथ्वीवर तीर्थयात्रेकरू प्रजा म्हणून ती एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांबरोबर पूर्णत्वाकडे जात असते म्हणून चर्चची स्थापना प्रभू येशूने केली. चर्च परमेश्वराच्या अभिवचनाचा वारस आहे. त्या अभिवचनाला विश्वासू राहून सर्व ख्रिस्ती पूर्णत्वाकडे झेप घेतात. भौतिक जगातील वास्तव्य महत्त्वाची बाब असली, तरी शाश्वत, अविनाशी, चिरंतन जीवनावर ख्रिस्ती माणसाची श्रद्धा असते. ते मृत्यूपलीकडील जीवन सार्वकालिक पुनरुत्थान दिवशी विजयी होऊन सर्व आत्मे परमेश्वराशी तादात्म्य पावतील व पूर्णत्वास जातील. चर्चचा घनिष्ठ संबंध स्वर्गाशी जोडलेला आहे. म्हणून येणाऱ्या जगाची (स्वर्गाची) वाट पाहात प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जगत असते.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया