उन्नतांश :
उन्नतांश ( उन्नत+अंश = वरच्या दिशेने स्थानाची कोनात्मक उंची दर्शविणे). उन्नतांश हा क्षितिज किंवा स्थानिक सहनिर्देशक पद्धतीतील एक सहनिर्देशक आहे. दुसरा सहनिर्देशक दिगंश हा आहे. दिलेल्या आकृतीत (X) तारा दिसत आहे. तो क्षितिजाच्या वर आहे. क्षितिजापासून तो किती उंचीवर आहे, हे निरीक्षक-सापेक्ष अंशात्मक स्वरूपात सांगणे, म्हणजे त्या ताऱ्याचे उन्नतांश (Altitude) सांगणे.
आकृतीत (Z) उर्ध्वबिंदूपासून काढलेले आणि (X) ताऱ्यातून जाणारे ऊर्ध्वमंडल (Vertical Circle) क्षितिजाला A बिंदूत छेदते. कोन ACX म्हणजे ताऱ्याचे उन्नतांश होतात. येथे C हे निरीक्षकाचे स्थान दर्शविते. उन्नतांश आपण उर्ध्वमंडलावर A पासून Z च्या दिशेने मोजले आहेत, म्हणून याला उन्नतांश म्हणतात. जर तारा (Z) बिंदूपाशी असेल तर त्याचे उन्नतांश ९० अंश असतील. ऊर्ध्वबिंदू आणि क्षितिज या दरम्यान अन्य कोणत्याही ठिकाणी तारा असेल तर त्याचे उन्नतांश नेहमीच ० अंशापेक्षा जास्त आणि ९० अंशांपेक्षा कमी असतील.
समीक्षक : आनंद घैसास.