ग्रहणे: मेटोनचे चक्र :

चांद्रमास (Lunar Month) आणि ऋतुवर्ष (Tropical Year) यांचा मेळ घालण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून अगदी बॅबिलोनियन काळापासून केले जात होते. परंतु त्यातून विविध प्रकारे मेळ घालण्याचे प्रयत्न करूनही योग्य निष्कर्ष हाती लागले नव्हते. अथेन्स शहरात राहणाऱ्या मेटोन या एका ग्रीक तत्वज्ज्ञाने इ.स.पूर्व ४३३ च्या सुमारास यामधून एक गोष्ट शोधून काढली. ती ही, की एका विशिष्ट तारखेला जी तिथी असेल, तीच तिथी पुन्हा त्याच तारखेला १९ वर्षांनी येते. या कालावधीत कधी चार लीप वर्षे (Leap Year) येतात, तर कधी पाच लीप वर्षे येतात. त्यामुळे त्यात एका दिवसाचा फरक पडू शकतो.

उदाहरणार्थ पुढे दिलेल्या तारखा पाहा :

२१ जुलै १९५२, २२ जुलै १९७१, २२ जुलै १९९०, २२ जुलै २००९, या तारखांना अमावास्या होती, आणि २२ जुलै २०२८, २२ जुलै २०१७ आणि २२ जुलै २०६६ या पुढील तारखांनाही अमावास्या असेल. याचे कारण आता पाहू. ऋतुंचे वर्ष (आर्तव वर्ष) ३६५.२४२२ इतक्या सरासरी दिवसांचे असते. अशी १९ वर्ष झाली, म्हणजे ६९३९.६०१८ दिवस होतात. एका अमावास्येपासून त्यानंतर लगेच येणाऱ्या अमावास्येपर्यंतचा कालावधी म्हणजे चांद्रमास (Lunar Month). अशा २३५ चांद्रमहिन्यांचे एकूण ६९३९.६८९ दिवस होतात.

थोडक्यात ऋतूंची १९ वर्षे (१९ tropical years) = २३५ चांद्रमहिने= ६९३९ दिवस असे म्हणता येईल. म्हणूनच १९ वर्षांनी त्याच तारखेला तीच तिथी येते. यात अपूर्णांकाचाही काही भाग असल्यामुळे, ती विशिष्ट स्थिती पूर्ण होण्याच्या कालावधीमध्ये सुमारे २ तासांचा फरक पडतो.

मेटोनच्या चक्राचा उपयोग करून सूर्यग्रहणे किंवा चंद्रग्रहणे त्या त्या तारखेला संभवनीय आहेत का हे ही समजू शकते.

वर दिलेल्या अमावास्यांच्या काही तारखांना सूर्यग्रहण झाले आहे. पुन्हा एकदा त्या तारखा ग्रहणाच्या संदर्भात पाहू.

१]  २१ जुलै १९५२,  अमावास्या होती मात्र ग्रहण नव्हते.

२]  २२ जुलै १९७१, खंडग्रास सूर्यग्रहण होते.

३] २२ जुलै १९९०, खग्रास सूर्यग्रहण होते.

४] २२ जुलै २००९, खग्रास सूर्यग्रहण होते.

५] २२ जुलै २०२८, खग्रास सूर्यग्रहण असणार.

६] २२ जुलै २०४७, खंडग्रास सूर्यग्रहण असणार.

७] २२ जुलै २०६६, अमावास्या असेल, परंतु सूर्यग्रहण होणार नाही.

सूर्यग्रहण होण्यासाठी दोन अटींची पूर्तता व्हावी लागते. त्यांपैकी,

१]  अमावास्या असावी लागते,

२] सूर्याचे पातबिंदूंपासूनचे (Nodes) अंतर एका विशिष्ट मर्यादेत असावे लागते.

या १९ वर्षानंतरच्या चक्रक्रमात प्रत्येक अमावास्येला सूर्य आणि पातबिंदू यांच्यातील अंतर समान राहत नाही. ते सुमारे ७ अंशाने वाढत जाते. हे अंतर त्या त्या ग्रहणासाठी असलेल्या मर्यादेच्या बाहेर गेले, तर अमावास्या असली, तरी ग्रहण होत नाही. वर दिलेल्या अमावास्येच्या सात तारखांपैकी पाचच तारखांना सूर्यग्रहण झाले आहे. या कारणामुळे मेटोनचे चक्र, ग्रहणाची तारीख निश्चित करण्यासाठी सॅरोस चक्राएवढे (Saros Cycle) विश्वसनीय नाही. मेटोनच्या चक्रात ४ ते ५ आवर्तनांनंतर सूर्यग्रहणाची निश्चिती नसते.

चंद्रग्रहणाच्या बाबतीतही मेटोनच्या चक्राची विश्वसनीयता ३-४ ग्रहणापर्यंतच टिकते. उदाहरणार्थ, चंद्रग्रहणांच्या पुढील तारखा पाहा:

१) १० डिसेंबर १९७३ खंडग्रास चंद्रग्रहण.

२) १० डिसेंबर १९९२ खग्रास चंद्रग्रहण.

३) १० डिसेंबर २०११ खग्रास चंद्रग्रहण.

 समीक्षक : आनंद घैसास