सॉफ्टवेअरचे घटक आणि त्यांना साहाय्य करणाऱ्या इतर वस्तू यांची आवश्यकता पूर्ण करण्याचे किंवा कोणतेही सॉफ्टवेअर उत्पादन वापरासाठी योग्य आहे की नाही याला तपासण्याचे कार्य म्हणजे सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण होय. यालाच सॉफ्टवेअरची चाचणी करणे असे सुद्धा म्हणतात. तसेच दुसऱ्या भाषेत याला ग्राहकाला सर्वोत्तम मूल्य प्राप्त करण्याकरिता सॉफ्टवेअर उत्पादन त्याच्या गुणवत्तेची लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी संस्थांकडून वापरल्या जाणार्‍या कार्यपद्धतींचा एक संच आहे असे सुद्धा म्हणता येते. यामुळे भविष्यात सॉफ्टवेअर उत्पादनांची निर्मिती करण्याची संस्थेची क्षमता सुधारत राहते.

सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण कार्यात्मक गरजा आणि अकार्यात्मक गरजा या दोन स्तरावर कार्य करते. कार्यात्मक गरजा मुख्यत: वापरकर्त्यांच्या दृष्टीकोनातून सॉफ्टवेअरच्या व्यावहारिक वापरावर लक्ष केंद्रित करते. सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये, कामगिरी, वापरणी सुलभता, दोषांची कमी इत्यादींचा या स्तरावर विचार करण्यात येतो. म्हणजेच वापरकर्त्यांच्या गरजांचे विश्लेषण करून सॉफ्टवेरचे विविध वैशिष्ट्यांसह आरेखन करण्यात येते. तर अकार्यात्मक गरजांमध्ये सॉफ्टवेरमधील आतील वैशिष्ट्यांवर आणि आरेखनावर कार्य करते. समर्थनक्षमता (Supportability), कार्यप्रदर्शन  (Presentation) आणि उपयोगिता (Utility) यांचा समावेश अकार्यात्मक गरजा यांमध्ये होतो. या स्तरांचा वापर सॉफ्टवेरच्या क्षमतेला प्रतिकूल परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यास आणि तुलनेने कमी दोष दर ठेवण्यात होतो. निर्दिष्ट कार्यपद्धती आणि गरजांचे विश्लेषण यांमुळे सॉफ्टवेअरची पडताळणी, प्रमाणीकरण आणि चाचणी करण्याची कल्पना येते.

सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण हे सॉफ्टवेअर गुणवत्ता हमी (Software Quality Assurance) यांपेक्षा वेगळे आहे. सॉफ्टवेअर गुणवत्ता हमी यामध्ये उत्पादनांच्या उच्च गुणवत्तेच्या सतत देखभालीसाठी प्रक्रिया आणि मानकांचा समावेश करते, उदा. सॉफ्टवेअर मधील दोष टाळून त्यांचे वितरण, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रिया करणे. तर सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण हे सॉफ्टवेअर मधील दोष शोधून स्थापित मानदंडांविरूद्ध मानव निर्मित अनुपालनचे प्रमाणीकरण करते.

गुणवत्ता नियंत्रण उपक्रम :  डेटाच्या निवडीसाठी गृहीतके, निकष आणि त्या संबंधित भिन्न घटकांचे दस्तऐवजीकरण करण्याचे तपासणे. आवक डेटा आणि संदर्भातील लिप्यंतर करतांना त्रुटी असल्याचे तपासणे. डेटाबेस फाइल्सची अखंडता तपासणे. डेटामधील सुसंगतता तपासणे. प्रक्रियेच्या टप्प्यांमधील यादीतील डेटाची हालचाल योग्य आहे का ते तपासणे. डेटा, डेटाबेस फाइल्स इ. मधील अनिश्चितता तपासणे. अंतर्गत दस्तऐवजीकरणाचा आढावा घेणे. पुनर्गणनांमध्ये परिणामी पद्धतशीर आणि डेटा बदल तपासणे. पूर्णता तपासणी करणे. मागील परिणामांशी तुलना करणे.

सॉफ्टवेअर नियंत्रण पद्धती : सॉफ्टवेअर मधील गुणवत्ता सुधारण्याकरिता आणि नियंत्रित करण्याकरिता पुढील पद्धतींचा वापर करण्यात येतो : रोम लॅबोरेटरी सॉफ्टवेअर फ्रेमवर्क (Rome laboratory Software Framework), गोल क्वशन मेट्रीक पॅराडीगम (Goal Question Metric Paradigm), रिस्क मॅनेजमेंट मॉडेल (Risk Management Model), द प्लान-डू-चेक-ॲक्शन मॉडेल ऑफ क्वालिटी कंट्रोल (The Plan-Do-Check-Action Model of Quality Control; याेजना-करा-तपासा-क्रिया), टोटल सॉफ्टवेअर क्वालिटी कंट्रोल (Total Software Quality Control), स्पायरल मॉडेल ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स (Spiral Model Of Software Developments), कंट्रोल मॅनेजमेंट टूल (Control Management Tool).

सत्यापन आणि प्रमाणीकरण : सत्यापन आणि प्रमाणीकरण यांमुळे सॉफ्टवेअर प्रणाली ही वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करते याची खात्री देते. सत्यापन : “आम्ही उत्पादन बरोबर बनवित आहोत काय ” सॉफ्टवेअरने त्याचे तपशील सुसंगत केले पाहिजे. प्रमाणीकरण : “आम्ही योग्य उत्पादन तयार करीत आहोत ” सॉफ्टवेअरला वापरकर्त्यास खरोखरच पाहिजे ते करावे. प्रणालीमधील दोष शोधणे आणि क्रियाशील परिस्थितीत प्रणाली वापरण्यायोग्य आहे की नाही याचे मूल्यांकन करणे ही दोन प्रमुख उद्दीष्टे याअंतर्गत आहेत.

स्वतंत्र सत्यापन आणि प्रमाणीकरण (आयव्ही आणि व्ही; Independent Verification And Validation; IV & V), ट्रेसिबिलिटी मॅट्रिक्सची आवश्यकता (रिक्वारमेंट ट्रेसिबिलिटी मॅट्रिक्स;  आरटीएम; Requirement Traceability Matrix; RTM), पडताळणी मॅट्रिक्सची आवश्कता (रिक्वारमेंट व्हेरिफिकेशन मॅट्रिक्स; आरव्हीएम; Requirement Verification Matrix; RVM), सॉफ्टवेअर गुणवत्ता हमी (Software Quality Assurance) या सत्यापन आणि प्रमाणीकरणाच्या काही पद्धती आहेत.

सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण चाचणी : सॉफ्टवेअरची गुणवत्ता ठरविण्यासाठी पुढील विविध चाचण्यांमधून सॉफ्टवेअरला पारीत करावे लागते : घटक चाचणी; कार्यात्मक चाचणी; एकत्रीकरण चाचणी; प्रणाली चाचणी; उपयोगिता चाचणी; सॉफ्टवेअर कामगिरी चाचणी; भार चाचणी; स्थापना चाचणी;  उलटतपासणी चाचणी;  ताण चाचणी; स्वीकृती चाचणी; बिटा चाचणी; आकारमान चाचणी; पुन:प्राप्य चाचणी इत्यादी.

 पहा  : सॉफ्टवेअर.

कळीचे शब्द : #सत्यापन #प्रमाणीकरण

संदर्भ :

समीक्षक : अक्षय क्षीरसागर