भारतातील लक्षद्वीपमध्ये करण्यात आलेले जहाजबुडीचे पुरातत्त्वीय संशोधन. लक्षद्वीप बेटांचा समूह प्राचीन व्यापारी सागरी मार्गावरचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. ही बेटे इ. स. च्या प्रारंभापासूनच दर्यावर्दी लोकांना माहीत होती. आणीबाणीच्या प्रसंगी जहाजांचे कप्तान तेथे आसऱ्यासाठी जात असत.

लक्षद्वीप : बंगारम बेटापाशी पाण्याखालील अवशेषांचे संशोधन.

इ. स. पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी (Periplus Maris Erithrei) या दर्यावर्दी लोकांसाठीच्या माहितीपुस्तकात लक्षद्वीप बेटांचा उल्लेख आहे. तसेच कदमत (Kadmat) या बेटावर इ. स. पहिल्या शतकातील रोमन नाणी मिळाली आहेत. याच बेटावर व्हेनिसचा प्रमुख न्यायाधीश डोजे अल्विसो मोसेनिगो याची सन १५७० मध्ये पाडलेली सोन्याची तीन नाणी (Ducat) मिळाली आहेत. पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिका आणि पूर्वेकडे श्रीलंका व आग्नेय आशिया यांना जोडणाऱ्या जलमार्गात अन्नपाणी घेण्यासाठी आणि डागडुजी करण्यासाठी जहाजे नियमितपणे थांबत असत, हे यावरून स्पष्ट होते. कोरीव लेखांच्या पुराव्यांवरून दिसते की, इ. स. सातव्या-आठव्या शतकापासून ही बेटे भारताचा भाग आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (NIO) यांच्या पुरातत्त्वज्ञांनी १९८४ ते १९९९ दरम्यान केलेल्या संशोधनात कावारट्टी, मिनिकॉय, अगाट्टी (Agatti), अमिनी (Amini), बंगारम (प्रिन्सेस रॉयलचे उत्खनन) व अंद्रोथ (Androth) या ठिकाणी मिळालेल्या पुरातत्त्वीय अवशेषांमध्ये भारतीय वस्तूंचा समावेश आहे.

लक्षद्वीप बेटांकडे जहाजांची नियमित वर्दळ असे. दीपगृहे नसल्यामुळे बेटांच्या परिसरातील प्रवाळांच्या भित्तीखडकांमध्ये (रीफ) अडकून जहाजे बुडणे स्वाभाविक होते. विशेषतः पावसाळ्यात अरबी समुद्रात येणारी चक्रीवादळे व खराब हवामानामुळे जहाजे भरकटून उथळ पाण्यात शिरत असत; तथापि एकोणिसाव्या शतकाआधीच्या जहाजबुडीची फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.

मिनिकॉय येथे बुडलेल्या जहाजाचे अवशेष.

ईस्ट इंडिया कंपनीचे चीनहून मुंबईकडे रेशीम व चांदी घेऊन येणारे बायरमगोर (Byramgore) हे मालवाहू जहाज ७ ऑगस्ट १८२७ रोजी लक्षद्वीपमधील चेरियापानी रीफ (Cheriyapani Reef) परिसरात बेपत्ता झाले. याच रीफला पुढे बायरमगोर असे नाव पडले. सन १९९० मध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमधील सागरी पुरातत्त्वज्ञांनी ‘आयएनएस संध्यकʼ हे जहाज वापरून बायरमगोर जहाजबुडीचे सर्वेक्षण केले. त्यात बुडलेल्या बायरमगोरचे अवशेष, धातूचे तुकडे आणि मातीची भांडी मिळाली. याच संस्थेतील सागरी पुरातत्त्वज्ञांनी १९९४ मध्ये ‘आर. व्ही. गवेषणीʼ हे संशोधनासाठीचे विशेष जहाज वापरून मिनिकॉय व सुहेली पार रीफ या ठिकाणी संशोधन केले. सुहेली पार रीफ या कावारट्टीपासून ४७ किमी. अंतरावरील परिसरात ६ ते १५ मी. खोलीवर अनेक चिलखती वाहने, गाड्या व तोफा यांचे अवशेष मिळाले. म्यानमारमध्ये (पूर्वीचा ब्रह्मदेश) दुसऱ्या महायुद्धात उरलेले लष्करी साहित्य घेऊन जाणारे ग्रीक कंपनीचे जहाज डिसेंबर १९५५ मध्ये सुहेली पार रीफपाशी बुडले होते. हे अवशेष त्याच जहाजाचे असल्याचे दिसून आले.

मिनिकॉय हे लक्षद्वीप बेटांमधील सर्वांत दक्षिणेकडचे बेट असून एडन ते कोलंबो मार्गावरील जहाजे या बेटाजवळून जातात. येथे संशोधनात तीन जहाजे बुडल्याचे आढळले. यांमधील एक वाफेवर चालणारे असून त्याच्या यंत्रसामग्रीचे अनेक भाग किनाऱ्याजवळ २०० मी. अंतरावर ४ ते १५ मी. खोलीवर विखुरलेले दिसले. हे जहाज १०० मी. लांबीचे असल्याचे निदर्शनास आले. इतर दोन जहाजांचे लाकडी खांब, फळ्या, तांब्याचे खिळे, दरवाजांच्या चौकटी, बिजागऱ्या व इतर अवशेष मिळाले. या तिन्ही जहाजांची नेमकी ओळख पटलेली नाही; तथापि ही तिन्ही जहाजे मिनिकॉय येथे १८८५ मध्ये दीपगृह बांधण्याच्या आधीची होती. मिनिकॉय भागात १८६२ ते १९१० या दरम्यान अशी पाच जहाजे बुडल्याची नोंद आहे; परंतु त्यांचा पुरातत्त्वीय दृष्टीने अभ्यास अद्याप झालेला नाही.

संदर्भ :

  • Gaur, A. S.; Vora, K. H.; Sundaresh; Tripati, Sila; Gudigar, P. & Bandodker, S. N. ‘Exploration of steam engine wrecks off Minicoy Island, Lakshadweep, Indiaʼ, International Journal of Nautical Archaeology, 27 (3): 225-236, 1998.
  • Tripati, Sila & Gudigar, P. ‘Lakshadweep Shipwreck Archaeology of the Lakshadweep Islands, West Coast of Indiaʼ, The International Journal of Nautical Archaeology, 30(1): 37-47,  2001.
  • Tripati, Sila, ‘An Overview of Shipwreck Explorations in Indian Watersʼ, Shipwrecks around the World, pp. 783-810, Delta Bookworld, Delhi, 2015.
  • Vora, K. H. Marine Archaeological Explorations in Lakshadweep Waters, Technical Report No : NIOITR-9194, National Institute of Oceanography, Goa, 1994.
  • छायाचित्रे सौजन्य : डॉ. शिल त्रिपती, गोवा.

                                                                                                                                                                                  समीक्षक : भास्कर देवतारे